आपली तुपली गोष्ट
गेल्या आठवड्यात तरुणांमधील वाढत्या आत्महत्या या विषयावर लिहिलेल्या
“शब्दावाचून अडले सारे” या पोस्टला भरभरून प्रतिसाद मिळाला. या आठवड्यात याच
विषयाशी संबंधित एका निराळ्या पैलूवर प्रकाश टाकणार आहे. इंटरनेट आणि सोशियल
मिडियाची आभासी दुनिया आजच्या तरुणाईला कशी जीवघेणी ठरतेय हे आपण पाहिले. आपण घेत
असलेला आहार आपल्या मनावर परिणाम करत असतो. गेल्या ५० वर्षात आपल्या
खाण्यापिण्याच्या सवयी खूप मोठ्या प्रमाणात बदलल्या. हा बदल आपल्या विचारांवर कसा
प्रभाव टाकतोय याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. तत्पूर्वी पहिल्यांदा आपण मेंदू या
अवयवाची ओळख करून घेऊ.
मेंदू – मेंदूला मुंग्या आणणारा अवयव
एका वयस्क व्यक्तीच्या मेंदूचे वजन सुमारे १४०० ग्रॅम असते. मेंदूमध्ये सुमारे १०००० कोटी चेतापेशी (न्युरॉन्स) असतात. सेकंदाला एक या गतीने आपण हे न्युरॉन मोजायला सुरुवात केली तर फक्त एका मेंदूतील
न्युरॉन मोजण्यासाठी ३१७१ वर्ष
लागतील. प्रत्येक न्युरॉन सुमारे १०००० इतर न्युरॉन्सशी जोडलेला असतो. माणसाच्या मेंदूचं वजन
शरीराच्या फक्त २.५ % असूनही हृदयातून बाहेर पडणाऱ्या रक्तापैकी १५ ते २० % रक्त
मेंदूकडे पाठवलं जातं. यावरून मेंदू हा एक खादाड अवयव आहे असं लक्षात येईल. मेंदूमध्ये
सुमारे ७७ % पाणी, १२ % स्निग्ध पदार्थ (फॅट), ८ % प्रोटिन्स, १ % कार्बोहायड्रेट असतात. म्हणजेच पाण्यानंतर ‘फॅट’ हा मेंदूच्या संरचनेतील अत्यंत महत्त्वाचा
घटक आहे.
डोक्यात जाऊ नको
हा वाक्प्रचार आपल्या दैनंदिन जीवनात आपण सर्रास वापरत असलो तरी खऱ्या अर्थाने
मेंदूत शिरणे तितके सोपे नाही. मेंदू हा एक अत्यंत महत्त्वाचा अवयव असल्यामुळे
रक्तात असणारे विषारी घटक मेंदूत जाऊन त्याला ईजा होऊ नये म्हणून मेंदूमध्ये असणाऱ्या सूक्ष्म
रक्तवाहीन्या रक्तातील ठराविक घटकांनाच मेंदूच्या पेशींपर्यंत जाऊ देतात. म्हणजेच
मेंदू आणि रक्ताच्या मध्ये एक अदृश्य भिंत असते. त्याला Blood Brain Barrier (BBB) असे म्हणतात. ही
अदृश्य भिंत फॅटसारख्या पदार्थांपासून
बनलेली असते आणि त्यामुळे “Only lipid
soluble drugs, therefore are able to penetrate and have action on central
nervous system” असा संदर्भ Dr K.D. Tripathi यांनी ‘Essentials of Medical Pharmacology’ या पुस्तकात मिळतो.
हे औषधनिर्माण शास्र या विषयातील एक नामांकित पुस्तक आहे. यावरून कोणत्याही औषधाला
मेंदूत प्रवेश मिळवून देण्यात स्निग्ध पदार्थ महत्त्वाची भूमिका बजावतात हे लक्षात
येईल.
तुपात पडली माशी
सुमारे ५० वर्षांपूर्वीपर्यंत साजूक तूप हा भारतीय आहारपद्धतीतील अत्यंत
महत्त्वाचा घटक होता. पण जसजसे आधुनिक विज्ञानाचे वारे वाहू लागले तसतसे तूप
म्हणजे कोलेस्टेरॉल, तूप म्हणजे हृदयरोग, तूप म्हणजे मरण असा प्रचार व्हायला
लागला. त्यामुळे या तुपात जी माशी पडली ती काही केल्या निघायला तयार नाही. तूप
खाता का ? असे विचारले की लोकांची तोंड वाकडी होतात. “आम्ही डाएट कॉन्शियस आहोत
असलं तूप बिप खात नाही”. अशी उत्तर ऐकायला मिळतात. पण हीच मंडळी डालडामध्ये तळलेले
बेकरी प्रॉडक्ट, एक्स्ट्रा चीझ
पिझ्झा, मेयॉनीझ, फ्रोझन डेझर्ट यासारखे
“हेल्दी” पदार्थ खाण्यासाठी हॉटेलच्या बाहेर तासनतास रांगा लावून असतात. या सर्व
पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्स फॅट असतात. हे ट्रान्स फॅट मेंदूच्या पेशींवर विपरीत परिणाम घडवतात हे अनेक संशोधनातून सिद्ध झालेले
आहे. तरी त्याविषयी विशेष ओरड होताना दिसत नाही. या तुलनेत आपलं साजूक तूप कुठे
आहे ते पाहूयात.
इसमे है DHA
दोनेक वर्षांपूर्वी लहान मुलांच्या एका हेल्थ ड्रिंकची जाहिरात
टीव्हीवर लागायची त्यात “xxxx इसमे है DHA जो आपके बच्चेके दिमागी विकासमें मदत करता
है” असा उल्लेख असायचा. DHA हा ओमेगा ३ फॅटी अॅसिडचा प्रकार असून तो विशेषतः मेंदू आणि
डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या पध्दतीनुसार दुधाचे
दही लावून त्यापासून बनवलेल्या तुपात हे DHA मोठ्या प्रमाणात आहे असे
संशोधन समोर आलेले आहे. (https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4061595/) त्याचवेळी
दही न लावता डायरेक्ट दुधातुन फॅट काढून तूप
बनवल्यास त्यात DHA चे प्रमाण कमी असते हेही निष्पन्न झाले आहे. यावरून साजूक तूप Blood Brain
Barrier (BBB) पार करून सहजपणे मेंदूपर्यंत पोचते आणि मेंदूचे
पोषण करण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावते हे सिद्ध होते. गंमत म्हणजे साजुक
तूप स्मृती, मेधा, बुद्धिच्या विकासासाठी उपयुक्त आहे हे
आयुर्वेदातील चरक, सुश्रुत यासारखे ऋषी २५०० वर्षांपासून सांगत आहेत. फक्त आमचाच
विश्वास नव्हता.
आज २० – २५
वर्षांच्या असणाऱ्या ज्या मुलांनी तूप खाल्लेले नाही त्यांच्या
मेंदूचे पोषण अर्धवट झाले तेव्हा त्यांच्या मनाला स्थैर्य कसे मिळणार ? त्यामुळे *जोपर्यंत आम्ही आपण साजूक
तुपासारखे मनाला स्थैर्य देणारे स्निग्ध
पदार्थ खात होतो तोपर्यंत आत्महत्या कमी प्रमाणात होत्या आणि जेव्हापासून या तुपात
अपप्रचाराची माशी पडली तेव्हापासून आत्महत्यांचे सत्र वाढायला सुरुवात झाली. याचाच
अर्थ गेल्या लेखात सांगितलेल्या इतर कारणांसोबतच खाण्यातून बाद झालेले तूप हे
आत्महत्या वाढण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. म्हणूनच आपल्या मेंदूचे आरोग्य
राखण्यासाठी प्रत्येकाने दिवसाला दोन चमचे साजूक तूप खाणे आवश्यक आहे.
हाती धुपाटणे आले
आयुर्वेदात अनेक मानसिक (Psychological) तसेच मेंदूशी संबधित
(Neurological) आजारांवर ब्राह्मी, वेखंड, शंखपुष्पी या
औषधांनी सिद्ध केलेली तूपं वापरायला सांगितली आहेत. कल्याणक घृत, कुष्मांड घृत, सारस्वत घृत ही त्यापैकी
काही उदाहरणं. या आजारांमध्ये ही सिद्ध तूपच वापरावीत हे आचार्यांनी असे ठरवले
असेल ? त्यांना Blood Brain Barrier (BBB) माहित होतं ? याचे
उत्तर असे आहे की या औषधांच्या रस, चूर्ण, काढा, सिद्ध घृत, अर्क अशा वेगवेगळ्या प्रकारांचा
वापर अनेक वर्ष अनेक रुग्णांवर करून पाहिला गेला असणार आणि त्यातूनच तुपातून सिद्ध
केलेले औषध अधिक उपयुक्त होते याचे ज्ञान झाले असणार. सांगण्याचा भाग इतकाच की आयुर्वेदातील
औषधांच्या बाबतीत झालेल्या या सुधारणा अनेक वर्षांच्या संशोधनातून पुढे आलेल्या
आहेत. म्हणूनच आयुर्वेदाचा आधार ‘चमत्कार’ नसून ‘साक्षात्कार’ आहे हे सर्वांनी
ध्यानात घेण्याची गरज आहे. नाही तर तेलही गेले तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले अशी
परिस्थिती व्हायची. तेव्हा ही आपली “तुपली” गोष्ट स्वतःपुरतीच
मर्यादित न ठेवता जास्तीत जास्त लोकांसमोर नेऊया आणि ‘आयुर्वेदाचे शास्रीयत्व’
जगापुढे अभिमानाने मांडूया.
© डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
A – 5, पाम व्ह्यू, RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827
हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता शेअर करावा ही विनंती.
2table spoons of home made ghee
ReplyDeleteEvery day will save us from any mental illness
True sir
Deleteआज जे बाजारात तूप उपलब्ध आहेत ते घातक आहेत की उपयुक्त? त्यातल्या त्यात कोणतं वापरावं? घरी तूप बनवायचं म्हटलं की शुद्ध दुधापासून प्रश्न आहे.
ReplyDelete