शिक्षणविश्वातील ‘ग्लोबल वॉर्मिंग’
शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या कुठल्याही
विद्यार्थ्याला जाऊन विचारा त्याचा किंवा तिचा ‘नावडता’ महिना कोणता ? ९०% जण
‘मार्च’ हे उत्तर देतील. कारण मार्च हा परीक्षेचा महिना. (उरलेल्या १०% लोकांना
ऑक्टोबरसुध्दा आवडत नाही.) थंडी संपत आल्याने उन्हाचा ताप वाढत असतो आणि सोबत हा परीक्षेचा
ताप सुरु होतो. मग वर्षभर ‘विषयांपासून लांब’ राहिलेले विद्यार्थी अभ्यास ‘सिरीयसली’
घ्यायला लागतात. त्यातूनच सुरु होतात जागरणं आणि ‘जागता पहारा’ देण्यासाठी मदत
करणारे चहा, कॉफीसारखे पेय. भरीस भर म्हणून परीक्षेचे पेपरही दुपारच्या वेळेतच
असतात. आधीच वाढलेल्या उष्णतेत हे उन्हातून जाणं येणं अजून तापदायक ठरतं.
वरील सर्व कारणांमुळे
शरीरात उष्णता आणि कोरडेपणा वाढतो म्हणजेच आयुर्वेदाच्या भाषेत वात आणि पित्त दोष
वाढतात. त्याचे परिणाम शरीर व मनावर दिसायला लागतात. वेळेवर भूक न लागणे, तोंड
येणे, पोटात आग होणे, डोळे चुरचुरणे, डोळ्यांची आग होणे, हातपाय गरम वाटणे, ताप
आल्यासारखे वाटणे, दिवसा झोप येणे, उत्साह न वाटणे, चिडचिड होणे, अभ्यासावर ‘फोकस’
करता न येणे, केलेला अभ्यास विसरायला होणे अशी लक्षणे दिसायला लागतात. अखिल
शिक्षणक्षेत्रात या monthमध्ये निर्माण होणाऱ्या ‘ग्लोबल वॉर्मिंग’साठी आयुर्वेदाचे
उत्तर आहे ‘मंथ’.
मंथ for the exam month
विशिष्ट औषधी ठराविक
काळापर्यंत पाण्यामध्ये भिजत ठेवून त्यानंतर त्याचे मंथन (Churning) करून तयार होणारे पेय म्हणजे मंथ. अधिक तहान लागणे, अधिक प्रमाणात
मद्यपान केल्याने निर्माण होणारी लक्षणे (Withdrawal Symptoms), उलटी होणे, उष्माघात,
उष्णता वाढल्यामुळे होणारा रक्तस्राव, डायबेटीस, त्वचारोग इ. विविध आजारांवर
उपयुक्त मंथ आयुर्वेदात सांगितलेले आहेत. आयुर्वेदातील ग्रंथात मंथ करण्याच्या
वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत. यापैकी खजुरापासून बनवलेला ‘खर्जुरादी मंथ’
आज आपण पहाणार आहोत.
खर्जुरादी मंथ
खाद्यपदार्थ – काळी खजूर, डाळिंब दाणे, काळ्या मनुका, आवळा,
चिंच, फालसा – प्रत्येकी १० ग्रॅम
सैंधव मीठ – चवीपुरते
माठात थंड केलेले पाणी – २५० मि.ली.
(* फालसा हे गोड आंबट चवीचे
एक फळ आहे. सगळी फळे न मिळाल्यास जी उपलब्ध असतील ती फळे घ्यावीत. फक्त फळ आणि
पाणी यांचे १ : ४ हे प्रमाण लक्षात ठेवावे.)
उपकरणे – लाकडी रवी, तांब्या किंवा
उभट आकाराचे भांडे, गाळणी, मातीचा छोटा माठ
कृती –
१) सर्वप्रथम खजूर आणि
काळ्या मनुका २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्याव्यात.
२) खजूर, चिंच, फालसा आणि
आवळा यातील बी काढून घ्यावी.
३) सुरीच्या सहाय्याने खजूर
आणि आवळ्याचे बारीक काप करून घ्यावेत.
४) माठामध्ये सांगितलेल्या
प्रमाणात पाणी घेऊन हे सर्व पदार्थ त्या पाण्यात टाकावेत आणि २ ते ३ तास
झाकून ठेवावे.
५) त्यानंतर पाणी एका
भांड्यात घेऊन सर्व फळे हाताने व्यवस्थितपणे कुस्करून घ्यावीत. चवीप्रमाणे सैंधव
घालावे.
६) लाकडाच्या रवीने ३ ते ५
मिनिटे घुसळून तयार मंथ गाळण्याने गाळून घ्यावा.
एनर्जी ड्रिंक
अभ्यासाचे टेन्शन, जागरण,
वाढणारे ऊन यामुळे शरीरातील उष्णता वाढून त्याचा शरीर आणि मनावर परिणाम होतो हे
आपण वर पाहिलेच. आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून वात आणि पित्त वाढून त्यामुळे
शरीरातील रसधातू कमी झाल्याने ही लक्षणे निर्माण होतात. शरीरातील रसधातूची कमतरता
त्वरित कमी करणारे औषध म्हणजे मंथ. मंथ शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो तसेच
गोड आंबट चवीमुळे मन प्रसन्न करतो. म्हणूनच पेपरला जाण्यापूर्वी किंवा पेपर लिहित
असताना हा मंथ घेतल्यास थकवा येत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळा मंथ
एकाच वेळी न पिता थोडा थोडा (Sip by sip) घ्यावा. थोडक्यात मंथ म्हणजे त्वरित रिचार्ज
करणारे ‘एनर्जी ड्रिंक’ आहे.
उन्हाळ्यातील विकार
ऊन वाढायला लागल्यानंतर
काही व्यक्तींना अधिक तहान लागणे, हातापायांची आग होणे, डोळ्यांची आग होणे अशी
लक्षणे दिसायला लागतात त्यांच्यासाठी हा मंथ ‘आयडियल’ आहे. उन्हाळाच्या दिवसात
काही जणांच्या नाकाचा घोळणा फुटून रक्त येते अशा व्यक्तींनी उन्हाळाच्या
सुरवातीपासून हा मंथ घेण्यास सुरुवात करावी. पोस्टमन, कुरियर बॉय, डिलिव्हरी बॉय
यांना कामानिमित्त सतत उन्हातून फिरावे लागते त्यांनी सकाळी हा मंथ तयार करून
दिवसभर थोडा थोडा घेतल्यास उन्हाचा सामना करणे बऱ्याच प्रमाणात सोपे होते.
शिक्षक, पूजा सांगणारे
गुरुजी, टेलिफोन ऑपरेटर यासारख्या व्यक्तींना कामाच्या स्वरूपामुळे दिवसातून बराच
काळ बोलावे लागते. सततच्या बोलण्यामुळे देखील थकवा आणि चिडचिड होत असेल तर ती हा
मंथ घेतल्याने कमी होते.
कावीळ
आयुर्वेदानुसार शरीरातील
पित्त वाढल्याने कावीळ होते. काविळीच्या रुग्णांमध्ये लिव्हरला सूज येत असल्यामुळे
भूक लागत नाही, पचनक्षमता खालावते. त्यामुळे काविळी झालेल्या बऱ्याच रुग्णांचे वजन
कमी होते. काविळीच्या बऱ्याच रुग्णांना सुरवातीला डार्क ब्राऊन रंगाचा मळ बाहेर
पडतो. ही सुरवातीची अवस्था जाऊन मळाचा रंग सुधारल्यानंतर काविळीच्या
रुग्णात हा मंथ देता येतो. त्यामुळे थकवा कमी होते व रुग्णाचे बळ टिकून राहते.
मद्यपानाचे दुष्परिणाम
मंथ हे जास्त प्रमाणात
मद्यपान केल्यामुळे निर्माण होणाऱ्या Withdrawal Symptoms वरचे उत्कृष्ट औषध आहे. या
रुग्णांमध्ये असंबद्ध बडबड करणे, खूप घाम येणे, अधिक लघवी होणे, पोटात आग होणे,
मळमळणे, नाडी गती वाढणे हि लक्षणे दिसतात. आधुनिक शास्रानुसार या रुग्णांना Dextrose आणि Glucose सलाईनवाटे दिले जाते.
आयुर्वेदातील मंथसुध्दा गोड चवीला गोड असल्याने त्यातून शरीराला काही प्रमाणात
ग्लुकोज मिळते. तसेच मंथ पित्तशामक असल्याने पोटात आग होणे. मळमळणे हि लक्षणे कमी
करण्यातही मदत करतो.
डायबेटीस
डायबेटीस असलेल्या अनेक
रुग्णांनाही लवकर थकवा येणे, खूप तहान लागणे ही लक्षणे असताना मंथ देता येतो.
यामध्ये खजूर आणि काळ्या मनुका हे चवीला गोड पदार्थ असले तरी खजुराचा ग्लायसेमिक
इंडेक्स ४२ तर काळ्या मनुकांचा ग्लायसेमिक इंडेक्स ४९ – ६० इतका कमी असल्याने हा
मंथ घेतला तरी रक्तातील साखर विशेष वाढत नाही.
मित्रांनो परीक्षेचा महिना
सुरु झालाय. मग काय तुम्हीही घेणार का हे आयुर्वेदिक एनर्जी ड्रिंक ?
मंथ for the exam
month
Thank you for sharing such a healthy natural drink
ReplyDelete