डोंबिवली रिटर्न आणि
अम्लपित्त
डोंबिवली रिटर्न
काही गोष्टी शब्दात पकडता येत नाहीत; त्या अनुभवाव्याच लागतात त्यापैकीच एक म्हणजे लोकलचा
प्रवास. खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणं हि काय चीज आहे हे
मुंबईबाहेरच्या लोकांना कळणे अशक्य आहे. डोंबिवलीसारख्या गर्दीच्या स्टेशनवर तर
लोकलमध्ये चढणे म्हणजे वर्ल्ड कपच्या टीममध्ये स्थान मिळण्याइतकेच अवघड आहे. अशा
वेळी काही चतुर मंडळी एक युक्ती करतात. समजा एखादी ट्रेन कल्याणहून सुरु होणारी
असेल तर ती CST हून कल्याणला जात असतानाच डोंबिवलीला तिच्यात चढायचे आणि कल्याणला परत जायचे.
ट्रेन कल्याणला पोचली कि विंडो सीट पकडून आरामात बसून यायचे. या सर्व प्रकारात
थोडा वेळ जातो पण हमखास बसायला मिळते. डोंबिवलीकरांच्या अशा पद्धतीने ‘रिटर्न’
जाण्याचा त्रास कल्याणवाल्यांना होतो. त्यांची हक्काची जागा डोंबिवलीहून रिटर्न
आलेल्यांनी घेतल्याने सुरु झालेली भांडणं ‘बा’चा‘बा’ची पर्यंत जातात. अशीच
परिस्थिती वेस्टर्न लाईनवर पण उद्भवते. तिकडे नालासोपारा, वसईचे प्रवासी विरार
लोकलने रिटर्न जातात. फक्त तेथे हिंदी भाषिक जास्त असल्याने ‘बाचाबाची’ऐवजी ‘हमरी तुमरी’ होते
एवढाच काय तो फरक. थोडक्यात माणसं रिटर्न जायला लागली कि होणारा संघर्ष अटळ असतो.
Local Global phenomenon
लोकलमध्ये घडणारी हि घटना तुमच्या माझ्या शरीरातसुध्दा घडू शकते. गंमत म्हणजे अशाच
पद्धतीने पुढे गेलेले अन्न रिटर्न आल्यास शरीरातही संघर्ष होतो. असाच एक आजार आपण
आजच्या लेखात बघणार आहोत.
आपण खाल्लेला घास तोंडातून पुढे अन्ननलिकेत जातो. त्यानंतर अन्ननलिकेतून अन्न पुढे जठरामध्ये नेऊन टाकले जाते. जठरामध्ये
आलेले अन्न किमान अडीच ते तीन तास तिथेच राहते. या काळात या अन्नावर जठरात स्रवणाऱ्या
‘हायड्रोक्लोरिक ॲसिड’ची (HCL) प्रक्रिया
होते. अन्नामध्ये ॲसिड नीट मिसळले जावे म्हणून
अन्न घुसळले जाते. हि प्रक्रिया साधारणपणे वॉशिंग मशीनमध्ये जसे कपडे फिरतात त्या स्वरुपाची असते.
जठरातील ॲसिड अत्यंत तीक्ष्ण असते.
या ॲसिडमुळे जठराच्या आतील
भागाला ईजा होऊ नये म्हणून जठराच्या आतील भागातील त्वचा विशिष्ट पद्धतीच्या संरक्षक
पेशींनी बनलेली असते.
आधी सांगितल्याप्रमाणे आपण खाल्लेले अन्न तोंडातून
अन्ननलिका आणि नंतर जठर असा प्रवास करत जाते. जठरात गेलेले अन्न पुन्हा अन्ननलिकेत
परत येऊ नये यासाठी तेथे एक झडप (नॉन रिटर्निंग व्हॅाल्व) असते. ज्याला ‘लोअर
इसोफेजीयल स्फिंक्टर’ (LES) असे म्हणतात. काही कारणाने या LES च्या कामात बिघाड
होतो. त्यामुळे जठरात गेलेले ॲसिडमिश्रित अन्न पुन्हा अन्ननलिकेत येते. जठराच्या आतील भागात असणाऱ्या ॲसिडपासून संरक्षक देणाऱ्या पेशी अन्ननलिकेमध्ये
नसतात. त्यामुळेच ॲसिडमिश्रित अन्न आल्यानंतर
अन्ननलिकेच्या आतील भागाला ईजा पोचते. छातीत जळजळ होणे, खाल्लेले अन्न वरवर येणे,
उलटीची भावना होणे अशी लक्षणे दिसू लागतात. अशाप्रकारे जठरातील अन्न परत येऊन
होणाऱ्या आजाराला आधुनिक वैद्यकशास्रात Gastro Esophageal Reflux
Disease (GERD) असे म्हणतात.
GERD या विकाराची लक्षणे आयुर्वेदात सांगितलेल्या ‘ऊर्ध्वग
अम्लपित्त’ या आजाराशी बहुतांश जुळणारी आहेत. किंबहुना वैद्यकशास्रात सर्वप्रथम
अम्लपित्ताचे विस्तृत वर्णन करण्याचे श्रेय आयुर्वेदातील ‘काश्यपसंहिता’ ग्रंथास
जाते.
लक्षणे
१) सर्वाधिक आढळणारे लक्षण म्हणजे जेवणानंतर छातीत जळजळ
होणे आणि वेदना होणे. अमेरिकेतल्या साधारणपणे ३०% लोकांना आठवड्यातून २ ते ३ वेळा
हे लक्षण जाणवते. ॲसिडीटी कमी करणारे औषध (ॲण्टासिड) घेतले कि हे लक्षण लगेच कमी
होते म्हणून बरेच जण याला फारसे गांभीर्याने घेत नाहीत.
छातीत दुखले कि बऱ्याच जणांना पहिल्यांदा हृदयविकाराची शंका
येते. त्यामुळे GERD च्या पेशंटचे अनेक वेळेला ECG काढून झालेले असतात. नुकत्याच
झालेल्या काही अभ्यासानुसार हृदयविकार असलेल्या रुग्णांना अम्लपित्त झाल्यास
त्यांच्या हृदयावर अतिरिक्त ताण येतो. यावरूनच अम्लपित्त आणि हृदयरोग यांच्यामधला
जवळचा संबंध लक्षात येईल.
२) खाल्लेले अन्न वरवर येऊन उलटीसारखी भावना होणे हे अजून
एक त्रासदायक लक्षण. जेवणानंतर लगेच झोपल्यास किंवा पोटावर दाब पडेल अशी कामे
केल्यास हे अधिक लक्षण जाणवते. काही जणांना उलटी होऊन आंबट किंवा कडू चवीचे पित्त
बाहेर पडते.
३) काही रुग्णांना गिळताना घास अडकल्यासारखे वाटते विशेषतः
कोरडे पदार्थ खाताना अधिक त्रास होतो. तर काही रुग्णांना अन्न गिळताना वेदनादेखील
होतात. बऱ्याचदा सतत वर येणाऱ्या ॲसिडमुळे अन्ननलिकेच्या आतल्या भागास सूज (Oesophgitis) येऊन हि लक्षणे
निर्माण होतात.
४) वारंवार कोरडा खोकला होणे, छातीत घरघर होणे, घसा बसणे
(विशेषतः झोपेतून उठल्यावर), थुंकीतून रक्त पडणे, दम लागणे यासारख्या
श्वसनसंस्थेच्या तक्रारीसुध्दा GERD च्या रुग्णांमध्ये बघायला मिळतात. काही
रिसर्चनुसार श्वसनसंस्थेच्या सुमारे ३० % आजारांचे कारण GRED असू शकते.
५) रात्रीच्या वेळी वारंवार ॲसिड घशाशी येण्याची प्रवृत्ती
असल्यास रात्री झोपमोड होते म्हणून झोप पूर्ण न दिवसा झोप येते. तसेच काही
रुग्णांमध्ये रात्रीच्या घोरण्याचे कारण अम्लपित्त असू शकते.
ते देखे कवी
‘जे न देखे रवी ते देखे कवी’ असं म्हणतात. अनेक मराठी
चित्रपटांतून उतमोत्तम गाणी लिहिलेले आणि महाराष्ट्राला सुपरिचित असलेले कवी
प्रवीण दवणे यांनीसुद्धा त्यांच्या एका कवितेत लोक उलटा प्रवास करतात तेव्हा काय
होते ? याचे वर्णन केलेले आहे.
लोक
करतात उलटा प्रवास
जगणे म्हणजे होतो
प्रयास
सोनचाफ्याच्या
बागेतसुद्धा
कुठे बिलगत
नाही सुवास
म्हणजेच नियम पाळले नाहीत तर जगणे ‘प्रवास’ न ठरता ‘प्रयास’
बनते. अम्लपित्त आणि GERD असलेल्या रुग्णांचे जगणे सोपे व्हावे म्हणून त्यांनी कोणते
नियम पाळावेत. हे पुढच्या लेखात शिकूयात. तेव्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी !
© डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
आयुष आयुर्वेद क्लिनिक,
A – 5, पाम व्ह्यू, RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827
हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता शेअर करावा ही विनंती.



Comments
Post a Comment