मागच्या दोन लेखात उपवास आणि सण ही श्रावण महिन्याची दोन वैशिष्ट्ये आपण
पाहिली. श्रावण संपता संपता श्रावणात केला जाणारा अजून एक उपक्रम पाहूया तो म्हणजे
सत्यनारायणाची पूजा. हा विषय सध्या कमालीचा वादग्रस्त ठरला आहे म्हणून जपून बोलयला
हवे. मी अनुभवलेल्या अशाच
एका ‘सत्यनारायणाची सत्यकथा’.
सत्यनारायणाची सत्यकथा
आटपाट नगर होतं; सॉरी चुकलो खड्ड्यांनी सुशोभित असं एक नगर होतं. त्याचं नाव
डोंबिवली. या नगरात डॉ. वाघ नावाचे एक डॉक्टर होते. रविवारी एका पेशंटने त्यांना
सत्यनारायणाच्या प्रसादासाठी बोलावलं. सायंकाळी सांगितलेल्या वेळी डॉक्टर वाघ तिथे
पोचले; देवाला रीतसर नमस्कार केला. कुणी आपल्याकडे पाहत नाहीये याची काळजी घेऊन
‘आठवणीने खिशात घालून आणलेली’ दहाची नोट त्यांनी देवासमोर ठेवली आणि “उद्या भरपूर
पेशंट येऊ देत” अशी मनोभावे प्रार्थना केली. प्रसादासाठी हात पुढे केला आणि घात
झाला. डार्क ब्राऊन कलरचा चिकट पदार्थ त्यांच्या हातावर पडला.
डॉ. वाघ – काय आहे हे ?
यजमान – ओळखा पाहू ?
डॉ. वाघ – नाही बुवा ओळखता येत.
यजमान – वाटलंच होतं मला. “चॉकलेट फ्लेवर्ड पंचामृत” आमच्या हिची आयडिया. त्याच्यामुळे तर आमच्या आर्याने
पहिल्यांदा पंचामृत टेस्ट केलं. अगं इकडे ये, डॉक्टर पण फसले बघ. आता पुढची मजा
बघा. हा घ्या “महाप्रसाद इन व्हॅनिला फ्लेवर”
डॉ. वाघ – अरे वा, भलत्याच मजेशीर आहेत वहिनी.
यजमान – म्हणजे काय डॉक्टर. बदलत्या काळासोबत बदलायला नको. हीच्या चुलतबहिणीचं
लग्न झालं गेल्या वर्षी केळवणाला हिने खास “केळवणाचा केक” केला होता.
डॉक्टरांना आता देवाला सोडून या ‘गृहलक्ष्मी’ला साष्टांग दंडवत घालावासा
वाटतो.
कशा काय सुचतात मंडळीना या अचाट कल्पना
? बदल हा सृष्टीचा नियम आहे अगदी मान्य पण कुठल्या गोष्टी किती प्रमाणात बदलाव्यात
याला काही लिमिट आहे की नाही ? जीवनातल्या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत काही अलिखित
नियम असतात. पिकनिकला कुणी नऊवारी साडी नेसून गेलं किंवा ऑफिसमधल्या मिटिंगला
लग्नातली शेरवानी घालून गेलं तर कसं वाटेल? गेल्या २५ – ३० वर्षात आपल्या आहाराच्या
बाबतीत अशीच काहीशी गडबड झालेली आहे ? जगातले सगळे खाद्यपदार्थ चॉकलेट फ्लेवर्ड असलेच पाहिजेत का ? काही
वर्षांपूर्वी एका कंपनीने “चॉकलेट फ्लेवर्ड च्यवनप्राश” आणला होता. अशाने कदाचित च्यवनप्राशचा खप वाढेल पण
त्याचे अपेक्षित गुण कसे मिळणार ?
स्लो फूड मुव्हमेंट
आपण भारतीय अमेरिकेचे अनुकरण करत असल्याने बऱ्याचदा असं बघायला मिळतं तिथे ५०
वर्षांपूर्वी ज्या समस्या होत्या त्याच आज आपल्या समस्या बनलेल्या आहेत. फास्ट फूड
हा शब्द सगळ्यांच्या परिचयाचा आहे. पटकन तयार होणारं, येता जाता कधीही खाता येणारं
अन्न म्हणजे फास्ट फूड. या फास्ट फूडमधून आपल्या शरीराला केवळ कॅलरीज मिळतात पण पोषणद्रव्ये (Nutrition) मिळत
नाही म्हणूनच त्याला ‘जंक फूड’ असेही म्हणतात. १९२० च्या दशकात अमेरिकेत फास्ट
फूडची क्रेझ वाढू लागली. ‘मॅक्डोनाल्ड’सारख्या रेस्टॉरंटच्या चेन्स पसरायला सुरुवात झाली. १९८६मध्ये
ईटलीमध्ये मॅक्डोनाल्डल्सचे पहिले
आऊटलेट सुरु झाले. त्याला विरोध म्हणून ‘कार्लो पेट्रीनी’ या सद्गृहस्थाने ‘स्लो
फूड’ चळवळ सुरु केली. आज ही चळवळ १३२ देशात पसरली असून हळूहळू तिने भारतातही
चंचुप्रवेश केला आहे. ‘गार्डियन’ इंग्लंडमधील सुप्रसिध्द वृत्तपत्राने ’50 People
who could save the planet’ या यादीत कार्लो पेट्रीनी यांचा समावेश केलेला आहे.
फास्ट फूडमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी सुरु झालेल्या या चळवळीत साध्या, सकस
आणि प्रांतीय आहारपद्धतीवर भर दिला जातो. या चळवळीची पुढील प्रमुख उद्दिष्ट्ये
आहेत.
१) त्या त्या प्रांतातील आहारपद्धतीचे जतन व संवर्धन करणे.
२) स्थानिक प्रजातीच्या बियाण्यांची ‘सीड बँक’ तयार करणे.
३) लोकांना स्वतः लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
४) जनुकीय तंत्रज्ञान वापरून बनवलेले बियाणे न वापरणे.
५) सर्व प्रकारच्या आहारासाठी लोकांची ‘टेस्ट’ डेव्हलप करणे.
६) फास्ट फूडच्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे.
बारकाईने पाहिल्यास सुमारे ५० - ६० वर्षांपूर्वी कुठलंही नाव न देता ही चळवळ भारतात
चालू होतीच.
Eat Local Think Global
पंजाबसारख्या उत्तरेकडील भागात वातावरण थंड असल्याने लस्सी, पनीर, पराठे, छोले
यासारखे पचायला जड पदार्थ खाल्ले जातात. तर दक्षिणेकडील राज्यात दमटपणा आणि
पावसाचे प्रमाण जास्त असल्याने वात वाढू नये म्हणून इडली, डोसा, सांबर यासारखे
आंबट पदार्थ खाल्ले जातात. महाराष्ट्रात भाकरी आणि भाजी, वरण भात हा प्रमुख आहार
आहे. आता महाराष्ट्रीय माणसाने आठवड्यात तीन तीन वेळा इडली आणि पराठ्यासारखे
पदार्थ खाल्ले तर आजार वाढणार हे उघड आहे. आता तर केवळ भारतीय नाही तर जगभरातले
पदार्थ मोबाईल वरच्या एका ‘टच’वर मिळतात. पिझ्झा, बर्गर, फ्रॅन्की, पास्ता, चीझ, चायनीज, इटालियन, थाई, कॉंटीनेण्टल अशी न संपणारी यादी आहे. हे झाले रेडीमेड पदार्थ
ओट्स, सोयाबीन सारखे पदार्थ, ब्रोकोली, लेट्युस, सेलेरी यासारख्या भाज्या, किवी,
लीची, ड्रॅगन फ्रुट यासारखी फळे, मोझरेला, चेडार यासारखे चीझचे प्रकार आपल्या
घराचे अविभाज्य कधी झाले कळले सुध्दा नाही.
आपण ज्या प्रदेशात राहतो तिथली एक खाद्यसंस्कृती असते; जी त्या प्रदेशाची
भौगोलिक रचना, वातावरण या गोष्टी लक्षात घेऊन विकसित झालेली असते. यालाच आयुर्वेदाने
‘देशसात्म्य’ असे म्हटले आहे. तुमचा आहार तुम्ही राहत असलेल्या प्रदेशाशी जितका
सुसंगत असेल तितके तुम्ही निरोगी राहण्याची शक्यता जास्त. चवीत बदल म्हणून कधीतरी
हे पदार्थ खायला हरकत नाही पण अपवादात्मक परिस्थितीत. पण अपवाद हाच नियम झाला तर
त्याचे दुष्परिणाम शरीरावर झाल्याशिवाय कसे राहतील ?
२५ – ३० वर्षांपूर्वी सर्वसामान्य मराठी कुटुंबात रात्रीच्या जेवणात भाकरी
असायची. कोकणात नाचणी किंवा तांदळाची भाकरी आणि देशावर ज्वारी किंवा बाजरीची भाकरी
एवढाच फरक असायचं. भाकरी करताना पीठ चाळून घेत नाहीत त्यामुळे पीठातली सर्व पोषकद्रव्य
मिळतात शिवाय भाकरी पचायला हलकी होते. पण आता भाकरी हे गरीबांचे खाणे समजले जाते. आज
पंचविशीत असलेल्या अनेकांनी कधी भाकरी खाल्लेलीच नाहीये. पण ते पिझ्झा मात्र
आठवड्यातून दोनदा खातात. मग कसे मिळणार आरोग्य ? आता तर गरिबांच्या आहारातूनही
भाकरी बाद होत चालली आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी १ रुपयात झुणका भाकर देणारी
केंद्रं महाराष्ट्रात सुरु झाली
होती. अनेक गरिबांच्या पोटाला त्याचा आधार होता. आताचा रस्त्यावर काम करणारा
मजूरदेखील वडापाव खातो आणि मग आम्ही मात्र बद्धकोष्ठता, डायबेटीस हे श्रीमतांचे
आजार गरिबांमध्ये कसे वाढतायत यावर आश्चर्य व्यक्त करतो. रिसर्च मधून असे लक्षात
आले आहे गावात राहणाऱ्या गरिबांपेक्षा शहरात राहणाऱ्या गरीबांमध्ये डायबेटीसचे
प्रमाण जवळपास दुप्पट आहे. आता तरी ‘देशसात्म्य’ हा विचार पटायला हरकत नसावी.
डॉक्टर वाघांनी इतकी शाळा घेतल्यावर यजमानांनी खास पूजेनिमित्त बनवलेली
पावभाजी त्यांना दिली गेली नाही. मात्र डॉक्टर निघताना यजमान पुन्हा उद्गारले,
“डॉक्टर गणपतीत हिच्या हातचे स्वीट मोमोज खायला या नक्की.” “म्हणजे आपले उकडीचे
मोदक हो” डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील प्रश्नार्थक भाव पाहून यजमान म्हणाले.
डॉक्टरांना उगाचच सत्यनारायण “तथास्तु” म्हणाल्याचा भास झाला.
© डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
आयुष आयुर्वेद क्लिनिक,
A – 5, पाम व्ह्यू, RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827
हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता शेअर करावा ही विनंती.
Comments
Post a Comment