तुमच्या मुलाला झोपेत लघवी
करण्याचा त्रास आहे का ? मग डॉ. पुष्कर वाघ यांचा हा लेख नक्की वाचा.
ती फुलराणी
फुलराणी परवाच येऊन
गेली. तसं आईबाबांनी तिचं नाव ‘सायना’ ठेवलेलं म्हणून माझ्यासाठी ती फुलराणी. आता
पुष्कळ बरी आहे. गोड हसत होती. मस्त वाटलं. फुलणारी फुलं आणि हसणारी मुलं बघून
आनंद होणारच. पण चार महिन्यांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. इवल्याशा डोळ्यात
अविश्वास साठवत आईबाबांसोबत ती माझ्या कन्सल्टिंगमध्ये शिरली. लहान मुलं आली कि मी
आईबाबांशी न बोलता डायरेक्ट त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला डॉक्टर
काका महत्त्व देतात हे समजले कि हि मुलंही आपणहून व्यवस्थितपणे हिस्ट्री देतात. पण
फुलराणी काही मला दाद देईना.
मी दोन तिनदा
प्रयत्न करूनही ती काही बोलली नाही हे पाहिल्यावर तिच्या आईने स्ट्राईक स्वतःकडे
घेतला. “मी सांगते डॉक्टर, आता ही तिसरीत आहे आणि अजूनही गादी ओली करते. कधी कधी
तर एका रात्रीत दोनदोन वेळा. मी पण जॉब करते त्यामुळे सारख रात्री उठायचा कंटाळा
येतो हो. हिचा लहान भाऊ आहे चार वर्षांचा त्याचा काही प्रॉब्लेम नाही आणि हिची ही
तऱ्हा. कुठे बाहेरगावी जायचं म्हटलं कि रात्री अजूनही हिला डायपर घालून झोपवावं
लागतं.” मी एकटीच सांगतेय तू पण बोल काहीतरी.
हे वाक्य आयफोनमध्ये
डोकं घालून बसलेल्या फुलराणीच्या बाबासाठी होतं हे मी बरोब्बर ओळखलं. “ ऑ हो हो
म्हणजे बरोबर आहे हिचं. आता तुम्ही हिला फुलराणी म्हणालात. बालकवींच्या कवितेत आहे
ना
हिरवे हिरवे गार गालिचे हरित
तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी
ती खेळत होती
तसेच आमच्या घरचे
गाद्या आणि गालिचे नेहमी गारेगार असतात आणि त्यावर आमची ही फुलराणी लोळत असते.”
लाजलाजली त्या वचनांनी
फुलराणीचा हा
प्रॉब्लेम प्रातिनिधिक आहे. आज ७ ते १२ या वयोगटातील अनेक मुलांमध्ये ‘बेड वेटिंग’
म्हणजे झोपेत शू होण्याचा आजार दिसून येतो. मुलं साधारणपणे
४ ते ५ वर्षांची झाली कि त्यांचे गादीत शू करणे जवळपास बंद होते. काही मुलं मात्र
७ वर्षांची झाली तरी गादीत शू करतात अशा वेळी त्यामागे खालीलपैकी एखादे कारण
सापडते.
१) मुलांच्या एकंदर
शरीराचा आकार लहान असल्याने त्यांचे मूत्राशय (Urinary Bladder) सुध्दा आकाराने
लहान असते त्यामुळे ते अधिक प्रमाणात लघवी साठवून ठेवू शकत नाही.
२) काही मुलांमध्ये
मूत्राशयापर्यंत संवेदनांचे वहन करणारे चेतातंतू (Nerves) पुरेशा विकसित झालेल्या
नसतात त्यामुळे त्यांना मूत्राशय भरल्याची संवेदना नीटपणे होत नाही.
३) ज्या मुलांना
वारंवार Tonsils किंवा Adenoids वाढण्याचा त्रास असतो अशा मुलांना श्वास
नीट न घेता आल्यामुळे त्यांची सारखी झोपमोड होते आणि त्यामुळे हा त्रास उद्भवू
शकतो.
४) मुलं बऱ्याचदा
खेळात किंवा मोबाईल, टीव्हीवरचे कार्टून बघण्यात गुंग असल्याने लघवीला आलेले
असूनसुध्दा ती दाबून ठेवतात त्यामुळे वारंवार युरीन इन्फेक्शन होण्याची प्रवृत्ती अशा
वेळीही हा त्रास दिसून येतो.
५) लघवी आणि संडासाची
संवेदना रोखून धरण्यासाठी वापरले जाणाऱ्या मांसपेशी (Muscles) सारख्याच असतात
त्यांना Pelvic Floor Muscles असे म्हणतात. त्यामुळे ज्या मुलांना बद्धकोष्ठतेचा
त्रास असतो त्यांना बऱ्याचदा गादीत शू होते. हल्ली बहुसंख्य मुलं लहानपणापासून
नेहमीच डायपरमध्ये गुंडाळून ठेवलेली
असतात. लहानपणापासून सतत डायपरमध्ये शू आणि शी करण्याची सवय असल्यास मोठे झाल्यावर
शी शू आली कि नेमके काय करायचे? कसे बसायचे ? हे अनेक मुलांना समजत नाही मग ते
उभ्या उभ्याच शी शू करायला लागतात. ‘बेसिक टॉयलेट ट्रेनिंग’ दिलेलेच नसते.
बाळाला दोन्ही पायावर उकिडवे बसून (म्हणजे इंडियन स्टाईल संडासात बसतात तसे) शी
करायची सवय लावणे ही यातील खरी ट्रीटमेंट असते.
६) आयुर्वेदाने
शरीरातील द्रव रूप मळाला ‘क्लेद’ असे नाव दिलेले आहे. हा क्लेद मुत्रावाटे
शरीरातून बाहेर टाकला जातो. म्हणजेच
शरीरात क्लेद वाढला कि त्यामुळे लघवीच्या तक्रारींना सुरुवात होते. आयुर्वेदानुसार
गोड, आंबट आणि खारट चवीचे आणि चिकट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील
क्लेद वाढतो. अशा प्रकारचे पदार्थ मुलं सर्रास खात असतात. गुळ, साखर, कोल्ड
ड्रिंक, जॅम, चॉकलेट, केक, पेस्ट्री, क्रीम बिस्कीट, गुलाब जाम, आईस क्रीम, बोर्नव्हिटासारखी
‘सो कॉल्ड’ हेल्थ ड्रिंक अशी गोडाची न संपणारी यादी आहे. नियमितपणे दिवसाला दोन चॉकलेट खाणारी कित्येक
मुलं बघायला मिळतात. यासोबतच सॉस, वेफर्स, खारी बिस्किटे,
पाव ब्रेड सारखे बेकरी प्रॉडक्ट, चीझ, मेयॉनीझ, चायनीज असे मोठ्या प्रमाणात मीठ असलेले
पदार्थ मुलं सतत खात असतात. या खाण्यातून अति प्रमाणात क्लेद तयार होतो आणि तो
मुत्रावाटे बाहेर पडतो. त्यामुळे मुलांच्या खाण्यातून हे पदार्थ कमी केल्याशिवाय
त्यांचे ‘बेड वेटिंग’ सुधारत नाही. घाम हा सुध्दा शरीरातील क्लेदाला बाहेर
टाकण्याचा एक मार्ग आहे. त्यामुळे व्यायाम किंवा शारीरिक हालचाल क्लेद कमी करण्यास
मदत करते. हल्लीची मुलं खूप खेळतात पण मोबाईलवर. मग त्यांचा क्लेद कसा कमी होणार ?
७) क्लेद आणि कृमी
यांचा जवळचा संबंध आहे. बऱ्याचदा कृमी आणि बेड वेटिंग अशी जोडी बघायला मिळते.
कृमींसाठी एकदा ‘डिवर्मिंग’ (Deworming) केले कि झाले अशी समजूत असते पण जोपर्यंत
क्लेद वाढवणारे पदार्थ आहारात आहेत तोपर्यंत हे दुष्टचक्र थांबत नाही.
८) थंड वातावरणात
लघवीला जास्त प्रमाणात होते हे आपण अनुभवतोच. हल्ली बरीच मुलं त्यांच्या
जन्मापासून सतत एसीमध्ये असतात. थंडी आणि पावसाळ्याच्या दिवसात सुध्दा दिवसरात्र
एसी चालू ठेवणारी मंडळी आहेत. हल्ली तर एसी क्लास रूम असलेल्या शाळांची चलती आहे.
या शाळा सुटल्यावर बाहेर पडणाऱ्या मुलांना हात लावला तर ती मुलं आहेत कि फ्रीजमधून
नुकतीच बाहेर काढलेली सफरचंद ? असा प्रश्न पडतो. पण खर सांगायचं तर हि मुलं खरच ‘सफर’
(suffer) करत असतात. मग त्यांचे बेड वेटिंग कसे थांबणार ?
९) आधी बेड वेटिंग न
करणाऱ्या मुलामध्ये अचानक हा त्रास उद्भवल्यास अशा वेळी त्या मुलाला टाईप वन
डायबेटीस असण्याची शक्यता असू शकते.
१०) बेड वेटिंग
करणाऱ्या मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना बऱ्याचदा बघायला मिळते. दुसऱ्या भावंडाशी
केली जाणारी तुलना, अभ्यासाचा अतिरेकी ताण, शिक्षकांची भीती, भीतीदायक स्वप्न
पडणे, आई वडीलांसोबत पुरेसा वेळ न मिळणं हि कारणं
खुपदा बघायला मिळतात. सतत अशा
वातावरणात राहिल्याने ही मुलं एकलकोंडी, अबोल आणि क्वचित प्रसंगी हायपर ॲक्टीव्ह होतात.
फुल बडे नाजूक होते है
१) मुलं जर सतत थंड पाणी पीत असतील तर ते बंद करणे आवश्यक आहे तसेच सायंकाळ
नंतर या मुलांना कमीत कमी पाणी देणे आवश्यक आहे.
२) बाजारात नागरमोथा नावाचे सहज उपलब्ध होणारे औषध आहे. २० ग्रॅम नागरमोथा एक
लिटर पाण्यात घालून ते पाणी आटवून अर्धा लिटर करावे. गाळून घेऊन मग हे पाणी
मुलांना पिण्याकरता द्यावे. नागरमोथा शरीरातील क्लेद कमी करणारा, कृमिनाशक आणि
तहान कमी करणारा आहे.
३) काही मुलांना रात्री झोपताना दुध पिण्याची सवय असते जे चूक आहे. त्याऐवजी
मुलांना सकाळी किंवा सायंकाळी ४ – ५ च्या दरम्यान सुंठ आणि हळद घातलेले दुध
द्यावे. हळद कृमिनाशक तसेच लघवीचे प्रमाण कमी करणारे औषध आहे.
४) फणस, जांभूळ, अननस, पपई यासारखी चवीला थोडी तुरट असणारी फळे मुलांना खायला
द्यावीत. विशेषतः अननस मिरपूड लावून खाल्ल्यास ते अधिक उपयुक्त होते.
५) तीळ, जवस, ओवा एकत्र करून त्यांची चटणी बनवावी. हि चटणी मुलांना जेवताना
तोंडी लावण्यास द्यावी.
६) शेवगा हि वनस्पती उष्ण, क्लेद कमी करणारी आणि कृमिनाशक आहे म्हणून मुलांना
आठवड्यातून दोनदा शेवग्याच्या शेंगा खाण्यास द्याव्या. शेवग्याची पानं कणकेत किंवा
थालीपीठात टाकूनही देता येतात.
७) मुलांना वेळोवेळी लघवीला जाण्याची सवय लावावी. मुलांनासुध्दा मुलींप्रमाणे
उकिडवे (Squatting Position) बसून शू करण्याची सवय लावावी अशा पद्धतीने बसून लघवी केल्याने मूत्राशय
पूर्णपणे रिकामे होते. रात्री झोपण्यापूर्वी त्यांना न चुकता लघवीला घेऊन जावे.
लघवी होत नसेल तर पायावर थंड पाणी पाणी टाकावे. या साध्या उपायानेसुध्दा बऱ्याचदा
लघवी होते.
८) आयुर्वेदामध्ये या आजारासाठी क्लेद कमी करणारी, वाताची गती सुधारणारी,
कृमिनाशक, मूत्राशयाच्या स्नायुंना बळ देणारी अशी अनेक प्रकारची औषधे आहेत. पण हि
औषधे वैद्यकीय सल्ल्यानुसार आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावीत.
९) टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यात बसून नाभीच्या खालील भागाला शेक घेणे याला
आयुर्वेदात “अवगाह स्वेद” असे नाव आहे. हा प्रयोग अशा मुलांमध्ये उपयुक्त ठरतो. यासोबतच
वाताची गती सुधारणारे, कृमींचा नाश करणारे असे बस्तीसुध्दा काही रुग्णांना द्यावे
लागतात.
१०) या सर्व गोष्टींबरोबर मुलांवर सतत रागावत बसण्यापेक्षा सौम्य आणि स्पष्ट शब्दात
जबाबदारीची जाणीव करवून देणे हि गोष्ट जास्त उपयुक्त ठरते असा अनुभव आहे. मुलांना
पुरेसा वेळ देणं हेही आवश्यक आहे. त्यांच्यासोबत टीव्ही बघण्यापेक्षा रात्री
झोपताना त्यांना गोष्टी सांगण किंवा चांगल्या गोष्टी वाचून दाखवणं अधिक योग्य.
गोष्ट सांगत असताना मूल आपला हात हातात घेतं,आपण त्याच्या केसातून हात फिरवतो याने
त्यांच्यासोबत “Quality Time”
स्पेण्ड करता येतो. फक्त मॉल मध्ये जाऊन
खाऊ आणि खेळण्यावर स्पेण्ड करण्यापेक्षा हा पर्याय निश्चितच चांगला आहे.
शेवटी मुलं काय आणि फुलं काय जेवढी प्रेमाने वाढवू तितकी खुलतात. म्हणतात ना
“फुल बडे नाजूक होते है”
© डॉ. पुष्कर
पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
आयुष आयुर्वेद
क्लिनिक,
A – 5, पाम व्ह्यू,
RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827
हा लेख शेअर
करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता शेअर करावा ही विनंती.
Comments
Post a Comment