वाफाळता श्रावण
श्रावण म्हणजे ऊनपावसाचा खेळ. वारंवार बदलणारं वातावरण आणि त्यासोबत येणारे
आजार. एकंदर श्रावणातले हे वातावरण रोग निर्माण करणाऱ्या सूक्ष्म जंतूसाठी पोषक
असते म्हणून या दिवसात साथीचे आजार होण्याची शक्यता अधिक असते. आयुर्वेदानुसार
प्रत्येक आजारात शरीरातील अग्नि म्हणजे पचनशक्ती कमी होते. म्हणूनच श्रावणात
उपवासाचे महत्त्व आहे. आयुर्वेदानुसार उपवास कसा करायचा हे आपण मागच्या ‘नमस्ते
लंघन’ या लेखात पाहिले. वाचकांपैकी बरेच जण त्यापद्धतीने श्रावण पाळून आरोग्य आणि
पुण्य दोन्ही मिळवत असतील अशी आशा बाळगतो.
श्रावण आणि डोंबिवली फास्ट
उपवास आणि व्रत वैकल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या श्रावणापासून हिंदूंचे असंख्य
सण सुरु होतात. मला स्वतःला श्रावण महिना हा डोंबिवली स्टेशनवर येणाऱ्या लोकलसारखा
वाटतो. टिटवाळा, बदलापूर, कर्जत, कसारा कुठूनही येणारी लोकल कितीही रिकामी असू दे;
ती डोंबिवलीत आली की खचाखच भरतेच. शेल्फमधून पडणारी पुस्तकं जशी धडाधड कोसळतात तसेच
प्लॅटफॉर्मवरचे डोंबिवलीकर लोकलमध्ये चढतात. याचप्रकारे श्रावणात
एकामागून एक सण धडाधड येत जातात. दीप आमावास्येपाठोपाठ सुरु होणारा श्रावण नागपंचमी,
नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, बैलपोळा करत भाद्रपदातल्या
गणेशोत्सवापर्यंत कधी आणून सोडतो हे कळतही नाही. सोबतीला श्रावणी सोमवार आणि
मंगळागौर, शुक्रवारची जिवतीची पूजा हे आहेच.
श्रावणथाळी
इतके सण साजरा करायचे तर मेन्यूही स्पेशल हवा. याची सुरुवात दीप
आमावस्येपासूनच होते. दीप आमावस्येला बाजरीचे दिवे करण्याची पद्धत आहे. नागपंचमीला
प्रसादासाठी साळीच्या लाह्या हव्यातच. खान्देशात नागपंचमीला कानवले आणि रव्याची
खीर करण्याची परंपरा आहे. तर कोकणात पुरणाचे दिंड केले जाते. पश्चिम महाराष्ट्रात ओल्या नारळाच्या करंज्या
करतात. श्रावणातल्या पहिल्या सोमवारचा उपवास सोडण्यासाठी दाल बाटी मधली बाटी
अर्थात रोडगे करण्याची पद्धत आहे. हे रोडगे निखाऱ्यावर भाजण्याची पद्धत पूर्वी
होती. यासोबत सोमवारी उपवास सोडताना बिन तेलाचे फुलके, लाल भोपळ्याची भाजी आणि खीर
असा साधा पण रुचकर मेन्यू असतो. जिवतीच्या पूजेनंतर प्रसाद म्हणून फुटाणे आणि
लाह्या देण्याची पद्धत आहे. तर नारळी पौर्णिमेला नारळीभात केला जातो. गोकुळाष्टमीच्या
दिवशी दही, कच्चे पोहे, लाह्या घालून केलेला गोपाळकाला खाल्ला जातो. ग्रामीण भागात
बैल पोळ्याला पुरणाची पोळी आणि कटाची आमटी हमखास केली जाते. श्रावणामध्ये कोकणात
हळदीच्या पानात तांदळाच्या पातोळ्या केल्या जातात. नारळाच्या दुधात गूळ घालून
तांदळाच्या रव्यापासून सांदणी हा गोड पदार्थ केला जातो. तिखट पदार्थांच्या बाबतीत
अळूची पातळ भाजी (फदफदं), अळूवड्या, वालाचे बिरडे, कुरडूची भाजी, कंटोळ्याची भाजी,
भाजणीचे वडे, वरणफळे, उडदाचे वडे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
महाराष्ट्रात खवय्येगिरीच्या बाबतीत सीकेपी लोकांचा नंबर पहिला लागेल. खराखुरा
सीकेपी अक्षरशः खाण्यासाठी जगतो. श्रावण महिन्यात नॉन व्हेज नाही म्हणून निराश न
होता ही मंडळी वेगवेगळे पदार्थ खात आणि खिलवत असतात. जिवतीच्या पूजेत देवीसाठी
ठेवलेल्या नारळापासून ‘निनावं’ नावाचा अफलातून गोड पदार्थ ही सिकेपींची खासियत
आहे. केकसारखा लागणारा अस्सल भारतीय पदार्थ हरतालिकेच्या आदल्या दिवशी सीकेपी
हमखास करतात.
सेन्सिबल सेलिब्रेशन
अगोदर सांगितल्याप्रमाणे श्रावणात पचनक्षमता कमी असते आणि बहुतेक गोड पदार्थ
पचायला जड असतात. मग पचन सांभाळून श्रावण
सेलिब्रेट कसा करायचा ? बारकाईने पाहिल्यावर असे लक्षात येते की श्रावणात केले
जाणारे बहुसंख्य पदार्थ भाजून किंवा वाफवून केले जातात. लाह्या, फुटाणे, फुलके,
रोडगे हे पदार्थ भाजून केले जातात. तर कानवले, पातोळ्या, वरणफळ, दिंड, बाजरीचे
दिवे, सांदणी, निनावं, अळूवडी यासारखे पदार्थ वाफवून केले जातात. पदार्थ भाजून,
उकडून किंवा वाफवून घेतल्यामुळे तो पचायला सोपा होतो असे आयुर्वेद सांगतो. म्हणजेच
श्रावणात केल्या जाणाऱ्या ‘सेलिब्रेशन’मागेही आयुर्वेदाचा ‘सेन्सिबल’ विचार आहे. आधुनिक
शास्रानुसार देखील वाफवणे किंवा उकडणे या प्रक्रिया करताना पदार्थातील
पोषणमुल्यांचा कमीत कमी नाश होतो. म्हणून ही अन्न शिजवण्याची सर्वोत्तम पद्धत आहे.
त्यातल्या त्यात पुरणपोळी पचायला जड असते पण सोबत खाल्ल्या जाणाऱ्या कटाच्या
आमटीतील मसाल्यांमुळे पूरण पचायला मदत होते.
एवढे करूनही यदाकदाचित पोट बिघडले तर त्याचे औषधही श्रावणातच सांगून ठेवलेले
आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या जन्मदिवसाचा आनंद व्यक्त करण्यासाठी
सुकं खोबरं, खडीसाखर आणि सुंठ एकत्र करून केला जाणारा ‘सुंठवडा’ प्रसाद म्हणून
दिला जातो. सुंठवडा हे पावसाळ्याच्या दिवसात होणाऱ्या पचनाच्या तक्रारींवरचे उत्तम
औषध आहे. आरोग्य आणि अध्यात्म यांची इतकी सुरेख सांगड क्वचितच बघायला मिळेल. अशा
रीतीने उपवास आणि उकडून खाल्ले जाणारे पदार्थ यांच्यामार्फत अध्यात्म आणि संसार
यांचे संतुलन साधत हा श्रावण पाळला जातो.
त्यामुळे संत तुकारामांच्या “बोलावा
विठ्ठल” च्या धर्तीवर
भाजावा श्रावण I वाफवावा श्रावण I
पाळावा श्रावण I मनोभावे II
असे नक्कीच म्हणता येईल. श्रावणाच्या सप्तरंगी शुभेच्छा !
© डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
आयुष आयुर्वेद क्लिनिक,
A – 5, पाम व्ह्यू, RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827
हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता शेअर करावा ही विनंती.
Comments
Post a Comment