देर ना हो जाये कही
मराठीतल्या अनेक गुणी कलाकारांच्या अभिनय कौशल्याला हिंदीत म्हणावा तेव्हा वाव
मिळाला नाही. रेणुका शहाणे म्हटलं की “लो चली मै देवर की बारात लेके” एवढं एकमेव
गाणं आठवतं. नृत्य, अभिनय, सौंदर्य या तिन्ही बाबतीत उजवी असलेली आपली अश्विनी
भावे हिंदीतल्या ‘हिना’ या चित्रपटातून झळकली खरी. पण ती फक्त “देर ना हो जाये
कही” या गाण्यापुरतीच लक्षात राहिली. मला मला मात्र या गाण्यातून अश्विनी
आयुर्वेदाचा एक महत्त्वाचा सिद्धांत सांगतेय असे वाटते.
शरीरात निर्माण होणाऱ्या विविध संवेदना म्हणजे आपल्याला शरीराकडून दिला जाणारा
सिग्नल आहे आणि सिग्नल्सना आपण योग्य तो प्रतिसाद द्यायला हवा असे आयुर्वेद सांगतो.
या संवेदना किंवा सिग्नलला आयुर्वेदाने ‘वेग’ असे म्हटलेले आहे. असे न
थांबवण्यासारखे १३ प्रकारचे ‘अधारणीय वेग’ आयुर्वेदात सांगितलेले आहेत. या संवेदना
दाबून टाकण्याचा प्रयत्न केल्यास विविध रोग उद्भवू शकतात असे आयुर्वेद सांगतो. यातल्याच
एका महत्त्वाच्या संवेदनेविषयी हा लेख आहे.
ती म्हणजे संडासाची कळ आल्याची
संवेदना.
संडासाची भावना झाल्यानंतर क्षुल्लक कारणांसाठी त्याकडे दुर्लक्ष करणारे अनेक
जण बघायला मिळतात. विशेषतः महिला वर्गात ही प्रवृत्ती बऱ्याचदा बघायला मिळते. सतत
संडासाची संवेदना दाबून टाकणाऱ्या व्यक्तीला कोणते आजार होऊ शकतात याची यादी चरक
संहिता या आयुर्वेदातील शीर्षस्थ ग्रंथात दिलेली आहे. पोटाच्या खालील भागात दुखणे,
आतड्यांमध्ये मळ तसेच वायू साठणे, पायात गोळे येणे, डोकेदुखी अशी लक्षणे वेळच्या
वेळी संडासला न गेल्यास उद्भवतात. सतत मळ आणि वायू साठून राहिल्याने बद्धकोष्ठता
निर्माण होते ज्याचे रुपांतर पुढे जाऊन मुळव्याध (पाईल्स), फिशर, भगंदर (फिश्चुला)
या सारख्या गुदद्वाराशी संबंधित आजारात होऊ शकते.
पाय दुखतात, पायात गोळे येतात अशा तक्रारी घेऊन अनेक पेशंट आयुर्वेदिक
डॉक्टर्सकडे येत असतात. यातल्या अनेकांची पेन किलर आणि वेगवेगळी विटॅमिन्स घेऊन झालेली असतात पण विशेष फरक पडलेला
नसतो. यातल्या बऱ्याच पेशंटला संडासाची कळ दाबून धरण्याची सवय असते. ही सवय पूर्णतः
बंद करणे आणि सोबतच वात कमी करणारी वातशमन चिकित्सा यामुळे या रुग्णांची अडखळणारी
पावलं दिमाखात पडू लागतात. एखादी संवेदना थांबवून धरणं जसं चूक आहे तसेच एखादा वेग बळेच निर्माण
करणंही चूकच आहे. या दुसऱ्या प्रकाराला आयुर्वेदात ‘वेग उदीरण’ असे नाव आहे.
संडासला जोर लावणे, पोट साफ व्हावे म्हणून सिगरेट ओढणे, तंबाखू खाणे ही वेग
उदिरणाची काही उदाहरणं.
काही वर्षांपूर्वी लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता क्वचित बघायला मिळत असे. पण
गेल्या काही वर्षात मात्र याचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. या बाळांना मी
‘डायपर कॉस्टीपेशन’चे रुग्ण म्हणतो कारण चोवीस तास करकचून बांधून ठेवलेला डायपर हे
याचे प्रमुख कारण आहे. जी बाळं सतत डायपरमध्ये असतात त्यांना लघवी किंवा संडासाची भावना निर्माण झाल्यावर
नेमके काय करायचे हे न कळट नाही. बऱ्याचदा ही मुलं उभ्या उभ्याच संडास करण्याचा
प्रयत्न करतात कारण त्यांना ‘टॉयलेट ट्रेनिंग’ दिलेलेच नसते. बाळाला दोन्ही पायावर उकिडवे बसून (म्हणजे
इंडियन स्टाईल संडासात बसतात तसे) शी करायची सवय लावणे ही यातील खरी ट्रीटमेंट
असते पण एवढी साधी गोष्ट न समजणारे आई
वडील उगाच डॉक्टरांकडे फेऱ्या मारत राहतात.
अशा पद्धतीने दिलेला साधा सोपा सल्ला हल्ली अनेकांना पटत नाही. मग या ‘सो कॉल्ड’ उच्चशिक्षित मंडळींची गाडी आयुर्वेदावर
घसरते. आयुर्वेद हे एक कालबाह्य शास्र आहे. सध्याच्या ‘इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी’च्या जमान्यात आयुर्वेद ‘मिस फिट’ आहे
अशी मुक्ताफळे उधळली जातात. अशा बुद्धीजीवींनी पुढचा पॅराग्राफ लक्ष देऊन वाचावा.
“Clinical experience shows that if one fails
to allow defecation to occur when the defecation reflex is excited or if one
overuses laxatives to take the place of normal bowel function, the reflexes
themselves become progressively less strong over a period of time the colon
becomes atonic.” Atonic colon is a major cause of habitual constipation.
वरील पॅराग्राफ गायटन आणि हॉल या लेखकांनी लिहिलेल्या ‘Text book of
Medical Physiology’ या पुस्तकाच्या १०व्या आवृत्तीच्या ७६७ व्या
पानावरील आहे. हे पुस्तक जगभरातल्या फिजिओलॉजीच्या सर्वश्रेष्ठ पुस्तकांपैकी मानले जाते. या पुस्तकातही संडासाची संवेदना
थांबवल्याने बद्धकोष्ठता कशी होते हे सांगितले आहे.
गंमतीचा भाग म्हणजे गायटनच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती तब्बल ६२ वर्षांपूर्वी
१९५६ साली प्रकाशित झाली तर चरक संहिता इ.स. पूर्व २ रे शतक म्हणजे फक्त २२००
वर्षांपूर्वी लिहिली गेली. कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ या वादात पडण्यात अर्थ नाही. सर्व
विद्वान अंतिमतः एकच सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतात अशा अर्थाची एक संस्कृत
म्हण आहे.
तेव्हा यापुढे आपण आपल्या शरीरातील सिग्नलकडे लक्ष देऊन तो पाळायचा निश्चय
केला तरी पुरे. माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले तरी चालेल पण “देर ना हो जाये”
म्हणणाऱ्या आपल्या मराठमोळ्या अश्विनी भावेच म्हणणं सगळ्यांना नक्कीच पटेल. खरंय
ना ?
© डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
9224349827
Comments
Post a Comment