मुहूर्त राज्या(खाद्या)भिषेकाचा
खायडेंटीटी क्रायसिस
आज उभ्या महाराष्ट्राला सतावणारा प्रश्न म्हणजे नक्की जेवायचं कधी? दिवसातून
दोनदा ? की दर दोन तासाने ? दोन्ही बाजूचे अनुयायी आपापली बाजू प्राणपणाने मांडत
आणि भांडत आहेत. तमाम मराठी बांधवांना हा ‘खायडेंटीटी क्रायसिस’ सतावत असताना
ब्रेकफास्टचं काय करायचं ? आणि ब्रेकफास्टला काय करायचं ? हा महत्त्वाचा प्रश्न
अनुत्तरीत राहतो. या विषयावर आयुर्वेदानुसार शास्रोक्त मार्गदर्शन करणारी हि
पोस्ट.
किंग साईज ब्रेकफास्ट
“Eat breakfast like a king, lunch like a prince
& dinner like a pauper” हे विसाव्या शतकातील
अमेरिकेतील प्रसिध्द आहारतज्ज्ञ Adelle
Davis यांचे उद्गार आहे. जगभरातल्या आहारतज्ञांसाठी हे वाक्य
म्हणजे ‘ब्रह्मवाक्य’ आहे. प्रत्येक देशातील आहारावर तिथले वातावरण, भौगोलिक रचना,
संस्कृती यांचा परिणाम असतो. त्यामुळे वर सांगितलेले विधान पाश्चात्य देशातील
जनतेसाठी कदाचित योग्य असेलही पण भारतातील जनतेला मात्र ते जसेच्या तसे लागू होणार
नाही. हल्ली बऱ्याच जणांचं रात्रीचं जेवण नऊ वाजल्यानंतर होतं. सेकंड शिफ्ट करून
मध्यरात्री जेवणारीही मंडळी आहेत. अनेकांना सकाळी उठल्यानंतर ब्रश करताना घशाशी
आंबट पाणी येणे, चहा घेतल्यावर मळमळणे, पोट साफ न होणे अशी रात्रीचे जेवण न
पचल्याची लक्षणे दिसत असतात. अशा लोकांनी ब्रेकफास्ट करावा कि नाही ?
मिटता कमलदल
कमळाच्या पाकळ्या जशा दिवसा उघडतात आणि सूर्यास्त झाला कि
बंद होतात. दिवसा सूर्यप्रकाश असताना आपल्या शरीरातील विविध
सिस्टिम्स ‘अॅक्टिव्ह’ असतात याउलट रात्री शरीरातील या सिस्टिम्सचे
कार्य मंदावते. त्यामुळेच रात्रीचा आहार पचण्यासाठी दिवसापेक्षा अधिक कालावधी
लागतो. म्हणून रात्रीचे जेवण सूर्यास्त झाल्यावर जितके लवकर घेतले तितके ते
पचण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. याउलट रात्री उशिरा जेवल्यामुळे रात्रीचे अन्न पचले
नसेल तरीही ब्रेकफास्ट करणे म्हणजे अगोदर दही असलेल्या भांड्यात दुध घालण्यासारखे
आहे. आधीचे अर्धवट पचलेले अन्न पोटात असताना ब्रेकफास्ट केला तर शरीराला त्याचा
उपयोग न होता त्रास होण्याचीच शक्यता अधिक.
आयुर्वेदाने सकाळी उठल्या उठल्या काही खाण्याचा आग्रह धरलेला नाही. उलट
आयुर्वेद म्हणतो कि जोपर्यंत रात्री घेतलेला आहार व्यवस्थितपणे पचून कडकडीत भूक
लागत नाही तोवर काहीही खाऊ नये. फक्त थंडीचे दिवस या नियमाला अपवाद आहेत. थंडीच्या
दिवसात रात्र मोठी असते आणि वातावरणातील गारवा अधिक असतो त्यामुळे पचनशक्ती उत्तम
असते. सकाळी सकाळीच भूक लागते म्हणूनच थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर खावे असे
आयुर्वेद सांगतो. आपल्याकडे दिवाळीपासून थंडीची सुरुवात होते. दिवाळीच्या दिवसात केले जाणारे फराळाचे
पदार्थ, थंडीत बनवले जाणारे पौष्टिक लाडू यामागचा आयुर्वेद आता वाचकांना दिसायला
लागला असेल. पण हे फक्त थंडीपुरतेच इतर ऋतूत नाही. त्यामुळे इतर दिवसात आयुर्वेदाने दिवसभरात फक्त दोनच
वेळा खायला सांगितलेले आहे. ज्यावेळी आपल्याला कडकडून भुकेची संवेदना होते ती आपली
जेवणाची वेळ असा नियमही सांगून ठेवलाय. सकाळी काहीही न खाल्ल्यास साधारणतः १०.३० ते १२.३० या वेळात
चांगली भूक लागते. त्यामुळे हीच वेळ सकाळच्या जेवणासाठी आदर्श आहे.
मुहूर्त राज्याभिषेकाचा
आता तुम्ही म्हणाल, हे असे आदर्शवादी जीवन ‘IT’ आणि ‘High Tea’ च्या जगात शक्य
आहे का ? हल्ली कामाच्या स्वरूपामुळे बऱ्याच जणांची हातातोंडाशी गाठ पडताना दुपारचे
१.३० – २ वाजतात या मंडळींनी काय करायचं ?
अशा वेळीही “सर्वधर्मेषु मध्यमं” अर्थात ‘कोणत्याही बाबतीत अतिरेक करू नका’
असा सांगणारा आयुर्वेदच धावून येतो. ज्यांना दुपारी उशिरा जेवल्याशिवाय पर्याय
नाहीये अशांनी सकाळी हलका ब्रेकफास्ट करायला हरकत नाही. पण ‘किंग साईझ हेवी
ब्रेकफास्ट’ मात्र आजिबात करू नये.
ब्रेकफास्टला मराठीत ‘न्याहारी’ किंवा नाश्ता असा प्रतिशब्द आहे. (हल्ली हे
सुध्दा सांगावे लागते.) पण ही न्याहारी म्हणजे ‘छोटी हजेरी’ असते. अगोदर आपल्याकडे न्याहारीचे पदार्थही त्या त्या
प्रदेशातील हवामान आणि भौगोलिक रचना यावरून ठरलेले असत. उदाहरण द्यायचे झाल्यास
कोकणातील न्याहारीला मऊ भात किंवा भाताची पेज खाण्याची पद्धत होती तर विदर्भ,
मराठवाड्यात त्याची जागा सातूच्या पीठाने घेतलेली दिसते. या अगदी सहज घडणाऱ्या
गोष्टींतून आमचे आरोग्य जपले जात होते. त्यामुळे आज ज्यांना ब्रेकफास्ट करण्याला
पर्याय नाही अशा लोकांनी साळीच्या लाह्या, मुगाचे कढण, मुगाचा डोसा, ज्वारीची
उकडपेंडी, ऋतूप्रमाणे मिळणारे एखादे फळ,
दुधी लाल भोपळ्यासारख्या फळभाजीचे सूप यांचा विचार न्याहारीला करायला हरकत नाही.
पण त्याऐवजी सकाळी सकाळी भरपूर मैदा असलेले पाव, ब्रेड, बिस्कीट दुधात बुडवून खाणे
किंवा कॉर्न फ्लेक्स खाणे शहाणपणाचे
नाही. म्हणून निरोगी राहण्यासाठी सकाळी सकाळी राजासारखा ब्रेकफास्ट करण्याऐवजी ‘बाळराजांप्रमाणे’ हलका नाश्ता करून दुपारचे जेवण ‘राजासारखे’
करावे. राज्याभिषेकाला सकाळ ऐवजी दुपार उजाडली तरी हा उशीर स्वास्थ्यासाठी उपयुक्त
असल्याने कुणाची हरकत नसावी.
प्रूफ कहा है ?
यावर काही जण म्हणतील कि जगभरातील सर्व आहारतज्ज्ञ सकाळी ‘हेवी ब्रेकफास्ट’
करायला सांगतात त्याचं काय ? हल्ली प्रत्येक गोष्टीचे पुरावे मागण्याची खोड काही
मंडळींना लागली आहे. ते तर उसळून म्हणतील “सकाळी लाईट ब्रेकफास्ट करणे योग्य आहे
हे आधी सिद्ध करा नाहीतर पुराणातील वानगी पुराणात.” म्हणून अशा मित्रांसाठी हा “फेब्रुवारी
२०१९” मधला लेटेस्ट पुरावा. ब्रिटिश मेडिकल जर्नल (BMJ) हे जगातील सर्वोत्तम मेडिकल
जर्नल्सपैकी एक आहे. त्याच्या फेब्रुवारी
२०१९च्या अंकातील एका रिव्हू आर्टिकलमध्ये
ऑस्ट्रेलियातील एका युनिव्हर्सिटीने गेल्या वीस वर्षात “ब्रेकफास्ट आणि वजनाचा
संबंध” या विषयावर वेगवेगळ्या १३ रिसर्चच्या माध्यमातून जो अभ्यास केला त्याचे
निष्कर्ष सांगितलेले आहेत. “ज्या व्यक्ती सकाळी हेवी ब्रेकफास्ट करतात त्यांचे वजन
ब्रेकफास्ट न करणाऱ्या व्यक्तींपेक्षा जास्त वाढते” असा स्पष्ट निष्कर्ष नोंदवलेला
आहे. म्हणून ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे आहे त्या व्यक्तींनी सकाळी ब्रेकफास्ट
करू नये असे मत शेवटी व्यक्त केले आहे. अधिक माहितीसाठी या लेखाच्या शेवटी दिलेली
लिंक अभ्यासावी.
आता तर पाश्चात्य देशांनाही आयुर्वेदाचे शास्रीयत्व पटू लागले आहे. तूर्तास
प्रश्न इतकाच आहे कि आपण आयुर्वेदाचे महत्त्व कि मान्य करणार आहोत कि आयुर्वेदातील
प्रत्येक सिद्धांत आधुनिक शास्राच्या कसोटीवर उतरण्याची वाट बघणार आहोत ?
© डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
आयुष आयुर्वेद क्लिनिक,
A – 5, पाम व्ह्यू, RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827
हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता शेअर करावा ही विनंती.
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=3&cad=rja&uact=8&ved=2ahUKEwiTjPjS_YLhAhVCs48KHX_AD3EQFjACegQIARAB&url=https%3A%2F%2Fwww.bmj.com%2Fbmj%2Fsection-pdf%2F991103%3Fpath%3D%2Fbmj%2F364%2F8185%2FResearch.full.pdf&usg=AOvVaw1hG2GSItbsphpvm_Dm9ZVZ
Comments
Post a Comment