एका लग्नाची (वमनाची) गोष्ट
मिसेस ओक पंधरा दिवसांपूर्वी दवाखान्यात येऊन गेल्या त्याचीच ही गोष्ट.
मिसेस ओक – लग्नाआधी मी ‘जोशी’ होते प्रसादशी लग्न करून ‘ओक’ झाले. तुळशीच्या
लग्नानंतर लगेच आमचं लग्न झालं.
(विशेष सूचना - सगळेच “प्रसाद ओक” पुण्याचे नसतात काही डोंबिवलीतपण असतात.)
मी – अरे वा ! अभिनंदन !!
मिसेस ओक – अभिनंदन कसलं करताय डॉक्टर ? लग्न झालं आणि खाण्याच्या वेळा
बदलल्या, सवयी बदलल्या. त्यात याला रात्रीच्या जेवणानंतर आईस्क्रीम खायची लहर
येते. या सगळ्यातून लग्नाच्या दुसऱ्या महिन्यापासून जी ‘अॅसिडीटी’ सुरु झाली आणि मी खरोखर ‘ओक’ झाले. रात्री जेवणाला
उशीर त्यामुळे सकाळी पित्ताच्या उलट्या व्हायला लागल्या. सगळ्यात ‘हाईट’ म्हणजे
माझ्या उलट्या सुरु झाल्या की प्रसादच्या आई ‘गुड न्यूज गुड न्यूज’ म्हणत उगाच खुष
होतात.
मी – काळजी करू नका. याच्यावर उत्कृष्ट उपाय आहे आयुर्वेदात.
मिसेस ओक – कोणता उपाय ? लगेच सांगा डॉक्टर. आपण ताबडतोब सुरु करूया.
मी – वमन म्हणजे शास्रोक्त पद्धतीने उलटी करवणे.
मिसेस ओक – अहो डॉक्टर, आधीच उलट्या होत असताना परत उलटी करवण्याचे औषध म्हणजे
‘इट्स टू मच.’
मी – तुम्हाला असे वाटणे सहाजिक आहे. खाण्यापिण्याच्या सवयीत बदल झाल्याने
तुमचे पित्त आणि कफ वाढून तुम्हाला हा त्रास होतोय. ह्या दोषांना शरीरातून हद्दपार
करण्यासाठी पंचकर्मातील सर्वोत्तम उपाय म्हणजे वमन.
‘ओक’ दांपत्याच्या निमित्ताने आपण सर्वच वमन म्हणजे काय ते पाहूया.
वसंतोत्सव
थंडीतल्या शेवटच्या शिशिर ऋतूमध्ये बोचरी थंडी असते. झाडांची पानंही गळायला
लागतात. तिकडे हिमालयात बर्फवृष्टी होते त्यामुळे जसं नद्यांमधून वाहणार पाणी
अर्थात जीवन थांबत तसंच काश्मीरसारख्या ठिकाणी सगळं जनजीवन ठप्प होतं. या
वाढलेल्या थंडीने सगळी सृष्टीच गोठल्यासारखी होते. अशा वातावरणात चैतन्य भरणारा
‘ऋतूराज’ म्हणजे वसंत. वसंतात वाढणाऱ्या उन्हामुळे सृष्टीला नवसंजीवनी मिळते. हिमालयावर
साचलेले बर्फ या उष्णतेने वितळू लागते. नद्या पुन्हा एकदा वाहत्या होतात.
झाडांनाही नवी पालवी फुटू लागते. पळसासारख्या झाडांना लालचुटुक फुलं येतात.
आंब्याचेही अंग मोहरून जाते. म्हणून वसंताला आयुर्वेदात ‘कुसुमाकर’ असेही नाव आहे.
सर्वत्र रंगांची उधळण होते. होळीचा सण हे
त्याचेच प्रतिक आहे. एकंदर सर्व सृष्टीत ‘वसंतोत्सव’ सुरु होतो.
जे पिंडी ते ब्रम्हांडी
जे बदल वातावरणात घडतात तेच बदल
शरीरातही होतात. याला आयुर्वेदात ‘लोकपुरुष सिद्धांत’ असे म्हणतात. थंडीच्या
दिवसात बाहेरील वातावरणाप्रमाणे शरीराचे तापमानही कमी होऊ लागते. म्हणून शरीराचे
तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक उष्मांक अर्थात कॅलरीची गरज भासते. म्हणूनच
थंडीत भूक अधिक लागते. त्यामुळे पचायला जड असणारे गोड, तेलातुपापासून बनवले जाणारे
पदार्थ या दिवसात आवर्जून खाल्ले जातात. थंडीच्या दिवसात खाल्ले जाणारे पौष्टिक लाडू
हे याचे उत्तम उदाहरण आहे.
गोड खाण्याने वाढणारा कफ शरीरात
साचू लागतो. ज्याप्रमाणे वसंत ऋतूत हिमालयातील गोठलेले बर्फ वितळून उत्तरेतील
नद्यांना पूर येतो तसेच शरीरात साचून घट्ट झालेला कफ वसंत ऋतूत पातळ होतो. वसंतात
सकाळच्या वेळी गारवा आणि दुपारी ऊन अशी परिस्थिती असते. असे वातावरण रोगजंतूच्या
वाढीला पोषक ठरते. म्हणूनच या दिवसात इन्फेक्शनने होणारे कांजिण्या, गोवर, डोळे
येणे, सायनसायटीस यासारखे आजारही मोठ्या प्रमाणात दिसायला लागतात. हा कफ सगळ्यांना
लगेच त्रास देईल असे नाही काही व्यक्तींमध्ये हा कफ साचत राहून बऱ्याच वर्षांनी
डायबेटीससारखे आजार निर्माण करतो. शेअर्समध्ये टाकलेले पैसे लगेच वाढतात पण
पोस्टात टाकलेले पैसे मात्र हळूहळू वाढतात तसेच हे.
Stitch in time saves nine
आयुर्वेद हे आजार झाल्यानंतर काय
करायचे हे सांगण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून काय प्रतिबंध करावा याला अधिक
महत्त्व देणारे शास्र आहे. वसंत ऋतूत वाढणाऱ्या कफाला वेळीच शरीरातून बाहेर काढून
टाकले तर तो भविष्यात शरीराला त्रास देऊच शकणार नाही. हे कार्य करणारे पंचकर्मातील
अमोघ अस्त्र आहे वमन. संपूर्ण शरीरातील वाढलेल्या कफ दोषाला शास्रोक्त पद्धतीने
उलटी करवून बाहेर काढून टाकणे याला वमन असे म्हणतात. ज्यांना अगोदरच कफाचे
आजार आहेत आणि ज्यांना कफाचे आजार होऊ नये असे वाटते; अशा सर्व व्यक्तींसाठी वमन
उपयुक्त आहे. आधी सांगितल्याप्रमाणे वसंत ऋतूत सगळ्यांच्याच शरीरात कफ वाढतो
म्हणून सर्वांनी वमन करणे श्रेयस्कर आहे. वसंतात केल्या जाणाऱ्या या वमनाला
‘वासंतिक वमन’ असे म्हणतात.
कफाचे आजार म्हटले की
सर्दी,खोकला इतकेच आपल्याला माहित असते. पण आयुर्वेदातली कफाच्या रोगांची यादी
कितीतरी मोठी आहे. सर्दी, खोकला, दम लागणे, वारंवार टॉन्सिल्स वाढणे, सायनसची डोकेदुखी, वारंवार डोळे येणे,
कानातून सतत स्राव होत राहणे, जखमेतून अधिक प्रमाणात पू येणे, डायबेटीस, वजन
वाढणे, अधिक घाम येणे, रक्तातले कोलेस्टेरॉल वाढणे, उच्च रक्तदाब, सारखा आळस येणे, थायरॉइडचे आजार, भूक न लागणे, तोंडाला अधिक प्रमाणात
लाळ येणे, सोरीयासिस, इसब यासारखे त्वचाविकार, डिप्रेशनसारखे मनोविकार हे सुध्दा
आयुर्वेदानुसार कफाचे आजार आहेत. यासोबतच अम्लपित्त, मासिक पाळी उशीरा येणे,
वारंवार तोंड येणे, स्तनांमध्ये गाठी होणे, हिमोग्लोबिन कमी असणे, अंगावर पित्त
येणे या आजारातही वमन केल्याने उत्तम लाभ होतो.
ओकल्याने होत आहे रे
इंग्रजांनी लादलेल्या ‘घोका आणि
ओका’ संस्कृतीत शिक्षण घेतलेल्या भारतीयांना वमन म्हणजे काही विशेष वाटणार नाही.
फक्त मीठ घातलेले पाणी पिऊन उलटी काढली की झाले वमन असे काही जणांना वाटू शकते.
अम्लपित्त असणारे, योगातील शुद्धीक्रिया करणारे असे वमन बऱ्याचदा करत असतात. पण या
उलटीने केवळ पचनसंस्थेचा वरचा भाग म्हणजे जठर स्वच्छ होतो पण आधी
सांगितल्याप्रमाणे पंचकर्मातील वमन सर्व शरीरात साचलेल्या कफाला बाहेर काढण्यासाठी
केले जाते. म्हणून आयुर्वेदातील वमनाची प्रक्रिया व्यवस्थित समजून घेणे आवश्यक
आहे.
‘नमनाला घडाभर तेल’ खर्ची घालू
नये असे म्हणतात पण वमनाला मात्र घडाभर नाही तरी किमान तांब्याभर तरी तेल किंवा तूप लागते. प्रत्यक्ष
वमन करण्यापूर्वी रुग्णाला वेगवेगळ्या औषधांनी सिद्ध केलेले तूप किंवा तेल चढत्या
क्रमाने पिण्यासाठी दिले जाते. कोणत्या रुग्णाला, कोणते तूप, किती प्रमाणात पाजावे
याचा निर्णय आयुर्वेदिक डॉक्टरच करू शकतात. तेल अथवा तूप प्यायल्याने संपूर्ण
शरीरात वाढलेला कफ पोटात येण्यास मदत होते. आयुर्वेदीय वमन कर्माचे यश या
स्नेहपानावर अवलंबून असते. तेल, तूप पीत असतानाच शरीराला बाहेरून तेल लावणेही
आवश्यक ठरते. त्यानंतर कफ वाढवणारा दही, भात,
गूळ, उसाचा रस, साबुदाण्याची खीर यासारखा दिला जातो.
प्रत्यक्ष वमन हे सकाळच्या
पहिल्या प्रहरात म्हणजे ६ ते ८ या वेळात
केले जाते कारण आयुर्वेदानुसार हा कफाचा काळ आहे. त्यासाठी प्रथम रुग्णाला
उसाचा रस, दुध, ज्येष्ठमधाचा काढा यापैकी काहीतरी पिण्यास दिले जाते. नंतर उलटी
करवणारे औषध दिले जाते. हे औषध घेतल्यावर पुढच्या ४५ मिनिटात ६ ते ८ वेळा खळखळून
उलटी होते. ज्यामध्ये सुरुवातीला कफ आणि नंतर पित्त बाहेर पडते.
अशा प्रकारे वमन पार पडल्यानंतर पुढचे ५ ते ७ दिवस हळूहळू आहार वाढवत न्यावा
लागतो. आधी फक्त साळीच्या लाह्या, नंतर मऊ भात, मुगाचे वरण भात, भाकरी फळभाजी,
चिकन क्लियर सूप अशा प्रकारे आहार वाढवत न्यावा लागतो. याला संसर्जन क्रम असे
म्हणतात. तसेच चहा, कॉफी, उन्हात जाणे, ए सी मध्ये बसणे यासारख्या गोष्टी वर्ज्य
कराव्या लागतात.
एक तरी ओवी अनुभवावी
दम लागतो म्हणून अनेक वर्षांपासून
इन्हेलर घेणाऱ्या पवार काकूंचे वमन केल्यानंतर त्यांची इन्हेलर आणि दमा दोघांपासून
मुक्तता झाली. डायबेटीस असलेल्या आपटे काकांच्या पायावर वर्षानूवर्ष ठाण मांडून
बसलेला एक्झिमा एका वमनाने ‘ढूंढते रह जायोगे’ असा गायब झाला. अंगावर
पित्ताच्या गाठी येतात म्हणून तीन स्कीन स्पेशालिस्टकडे ‘त्रिस्थळी यात्रा’ करून आलेल्या प्रियाचा त्रास वमनानंतर कायमचा बरा झाला. असे अनेक अनुभव आहेत.
‘एक तरी ओवी अनुभवावी’ असे ज्ञानेश्वरीचे वर्णन संत नामदेवांनी केले आहे. तोच नियम
वमनालाही लागू पडतो. शेवटी दुसऱ्याच्या अनुभवापेक्षा स्वानुभव केव्हाही श्रेष्ठ.
अशा रीतीने हे “वमनाख्यान”
मिस्टर आणि मिसेस ओक यांनी मनोभावे श्रवण केले, वमन करवून घेतले आणि पुन्हा एकदा सुखाने
नांदू लागले.
© डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
आयुष आयुर्वेद क्लिनिक,
A – 5, पाम व्ह्यू, RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827
हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता शेअर करावा ही विनंती.
Comments
Post a Comment