नमस्ते लंघन
काही वर्षांपूर्वी
अक्षयकुमार आणि कतरिना कैफ यांनी प्रमुख भूमिका केलेला ‘नमस्ते लंडन’ हा पिक्चर प्रदर्शित झाला होता. या
चित्रपटात 'मैं जहाँ रहूँ' हे राहत फतेह अली खानने गायलेले अप्रतिम गाणे
अनेकांच्या मोबाईलमध्ये अजूनही असेल. या पिक्चरमध्ये अक्षयकुमार मूळ भारतीय असलेल्या, बालपणापासून लंडनमध्ये वाढलेल्या कतरिनाला
भारतीय संस्कृतीची ओळख करून देतो. त्याचप्रकारे भारतीय संकृतीचा
अविभाज्य भाग असलेल्या उपवासाची शात्रोक्त माहिती या लेखात आपण बघणार आहोत.
श्रावणमासी – हर्ष मानसी
श्रावण म्हणजे व्रत
वैकल्यांचा महिना. परवा पहिला श्रावणी सोमवार. अनेकांचा उपवास असेल.
उपवास म्हणजे साबुदाणा, बटाटा, रताळे यासारखे पचायला जड पदार्थ खाणे. सोमवारचा
उपवास शंकरासाठी करतात पण ह्या उपवासाने ॲसिडिटी होऊन डोके
दुखू लागले की उपवास करणाऱ्या व्यक्तीचंच तांडव सुरु होतं आणि डॉक्टरांकडे धावाधाव
करावी लागते. मुळात उपवासाचे म्हणून खाल्ले जाणारे हे पदार्थ परदेशी आहेत हे
आपल्यापैकी अनेकांना माहीतही नसेल. मग खरा उपवास असतो तरी कसा ?
उपवास हा शब्द उप +
वास या दोन शब्दांनी बनलेला आहे. उप म्हणजे जवळ आणि वास
म्हणजे राहणे. ज्याचा अर्थ काही वेळासाठी देवाच्या जवळ जाणे असा होतो (फक्त काहीच
वेळासाठी बरं का कायमच नाही) आणि त्यासाठी शरीराला थोडे कष्ट पडावे
म्हणून खाण्यालाही सुट्टी दिली जाते. या उपवासाला आयुर्वेदात ‘लंघन' असा शब्द आहे.
नमस्ते लंघन
लंघन म्हणजे
पचनसंस्थेला थोडा आराम देणे. हा आराम दोन प्रकारे देता येतो
१) काहीही न खाता
उपवास करणे.
२) पचायला हलके
पदार्थ खाऊन उपवास करणे.
आयुर्वेदात लंघन ही
अत्यंत महत्वाची चिकित्सा सांगितली आहे. पोटाचे आजार, ताप येणे,
आमवातासारखे सांध्याचे आजार, डोळ्यांचे आजार यामध्ये लंघन ही एक अत्यंत महत्त्वाची
चकित्सा आहे. आपण बघितले की सध्या आपण उपवासाला खात असलेले पदार्थ भारतीय नाहीतच
उलट पचायला जड आहेत. असं असताना आयुर्वेद शास्त्राच्या नियमांचे पालन करून उपवास
कसा करायचा हे पाहूया.
सगळ्यात महत्त्वाची
गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर जे प्यायल्याशिवाय अनेकांचे शरीर नामक इंजिन सुरु
होत नाही ते *चहा* नामक अमृत घ्यायचे नाही. शक्यतो फक्त गरम पाणी प्यावे किंवा
अगदीच राहवत नसेल तर भाताची पेज किंवा मुगाचे कढण करून घ्यावे. (मुगाचे कढण म्हणजे
अर्धा वाटी हिरवे मूग १६ पट म्हणजे ८ वाटी पाण्यात मऊ होईपर्यंत
शिजवून मिळणारा पातळ सूपसारखा पदार्थ.)
त्यानंतर दुपारी
जेव्हा कडकडीत भूक लागेल तेव्हा मुगाची खिचडी, मुगाचे वरण भात, राजगिरा थालपीठ, तांदळाचे घावन, मऊ भात, भाकरी आणि दुधी
किंवा लाल भोपळ्याची भाजी यापैकी काहीतरी एक पचायला हलके असे अन्न घ्यावे.
(आयुर्वेदिक पद्धतीने भात कसा करायचा हे आपण गेल्या ‘भातुकलीच्या खेळामधली’ या
लेखात शिकलो आहोतच.) त्यावर घरीच तयार केलेले ताक एक भांडे किंवा अर्धा ग्लास प्यावे. ताकात सुंठ आणि जिरेपूड घालायला हरकत नाही.
रात्रीच्या जेवणात
सॉलिड काहिही न खाता डाळींब, पपईसारखे फळ, राजगिरा लाडू,
साळीच्या लाह्या, भाताची
पेज यापैकी काहीतरी एक खावे.
फायदे
अशा पद्धतीने उपवास
केल्याने
१) पचवण्याची क्षमता
(जाठराग्नि) वाढते
२) शरीर हलके होते
३) तोंडाला चव येते
४) आळस कमी होतो
५) वजन कमी व्हायला
मदत होते
हे सगळं टिपिकल
वाचून काही मंडळींचा हिरमोड झाला असेल. म्हणून काहीतरी अपिल होईल असे सांगायला
हवे. अशा प्रकारच्या उपवासाने शरीरात ‘Autophagy’ प्रोसेस सुरु होते असं म्हटलं तर ऐकायला
गोड वाटतं ना.
Autophagy – टाकाऊ ते टिकाऊ
‘Autophagy’ म्हणजे शरीराला त्रासदायक ठरणाऱ्या पेशी व
प्रोटिन्स नष्ट करण्यासाठी शरीराने आपणहून केलेली उपाययोजना. ज्यावेळी आपण काही
पचनसंस्थेला वर सांगितलेल्या पद्धतीने आराम देतो तेव्हा आपल्या शरीरातील abnormal
पेशी तसेच प्रोटिन्स
नष्ट करण्यास शरीर सुरुवात करते तसेच या
प्रक्रियेतून तयार होणारी उर्जा शरीरातील इतर प्रक्रियांसाठी वापरले जाते. थोडक्यात Autophagy हा शरीराचा ‘टाकाऊपासून टिकाऊ’ बनवण्याचा उपक्रम आहे. ज्यामुळे कॅन्सर, डायबेटीस, पार्किन्सन्स सारख्या आजारांना प्रतिबंध करता येणे शक्य आहे
असे आता अनेक शास्रज्ञ सांगतात. ही प्रक्रिया अनेक सजीवांमध्ये
घडते. यीस्ट सारख्या सूक्ष्म जीवांमध्ये हि प्रक्रिया नेमकी कशी घडते आणि त्यासाठी
नेमके कोणते जीन्स कारणीभूत असतात याचा शोध लावल्याबद्दल जपानचे डॉ. योशिनोरी
ओसुकी यांना २०१६ सालचे वैद्यक शास्राचे नोबेल प्राईज देण्यात आले. म्हणजेच
योग्य पद्धतीने केलेल्या लंघनाने आपण भविष्यात होणारे कॅन्सरसारखे प्राणघातक
आजारही टाळू शकतो. हि आयुर्वेदाच्या लंघनाची ताकद आहे. मला वाटतं आत्ता या
उपवासाची महती सगळ्यांना पटली असेल.
माझं श्रावणातले
लंघन दर सोमवारी सुरु होतेय. तुमचं काय ? तुम्हीही म्हणणार का ? नमस्ते लंघन
© डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
आयुष आयुर्वेद क्लिनिक,
A – 5, पाम व्ह्यू, RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827
हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता शेअर करावा ही विनंती.
Comments
Post a Comment