पुरानी जीन्स और आजार
कॉलेजमध्ये जाणाऱ्या
प्रत्येक पिढीच्या भावविश्वाशी जोडलेलं एक गाणं असतं. एक काळ ‘ही चाल तुरुतुरु’ने
गाजवला. तर माझ्या अगोदरच्या पिढीला ‘पापा कहते है बडा नाम करेगा’ म्हणणारा आमिर
खान आपलासा वाटला. मी कॉलेजला असताना पाकिस्तानी गायक अली हैदरने गायलेलं ‘पुरानी जीन्स
और गिटार’ हे गाणं आमच्या सर्वांच्या ओठावर होतं. प्रत्येक गॅदरिंगला हे गाणं असायचंच.
आज कॉलेज जीवनातून बाहेर पडून एक दशक उलटून गेल्यावर मात्र प्रॅक्टिसमध्ये “पुरानी जीन्स और
आजार” हे बघायला मिळतंय. सर्वच वयोगटातल्या पुरुष आणि स्त्रियांमध्ये जीन्स पॅण्ट वापरण्याचे वेड वाढत चालले
आहे आणि त्यातून काही आजार वाढीस लागले आहेत. हे आजार कोणते हे पाहण्यापूर्वी आपण
अगोदर या जीन्सचा जन्म कसा झाला हे पाहूया.
जीन्सचे जीन्स शोधताना
२४ जानेवारी १८४८ हा दिवस ‘जेम्स
विल्सन मार्शल’ या सुताराचे नशीब बदलवणारा ठरला. कॅलिफोर्नियामधील ‘कोलोमा’ या
गावी आपल्या वखारीत खणताना त्याला चक्क सोनं सापडलं. हळूहळू त्या भागातल्या बऱ्याच
लोकांना जमीनीत सोनं सापडायला लागलं. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. जगभरातले
लोक सोनं मिळवण्यासाठी कॅलिफोर्नियात यायला लागले आणि जगप्रसिध्द ‘गोल्ड
रश’ला सुरुवात झाली. या विषयावर चार्ली चॅप्लिनचा ‘गोल्ड रश’ हा चित्रपट काहींना माहित असेल.
सोन्याची हाव, माणसाच्या खऱ्या स्वभावाचे दर्शन आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष
हे सर्व या चित्रपटात विनोदी ढंगात दाखवलंय. या गोल्ड रशच्या काळात कॅलिफोर्नियाची लोकसंख्या
२०००० वरून २,२५,००० वर गेली. फक्त ४ वर्षात २२ कोटी डॉलर्स (त्या काळचे) एवढ्या प्रचंड
किंमतीचं सोनं जमिनीतून निघालं.
याच सुमारास ‘लीव्हाय स्ट्रऊस’ नावाचा एक
माणूस कॅलिफोर्नियात दाखल झाला पण तो सोनं शोधायला आलेला नव्हता.
सोनं शोधणाऱ्या माणसांना तंबू ठोकायला जे कॅनव्हासचं कापड लागायचं ते तो विकत असे. दक्षिण
फ्रान्समधून येणारे हे कापड ‘सर्जे डी निम्स’ म्हणून ओळखलं जायचं. त्याचा अपभ्रंश
होऊन ‘डेनिम’ हा शब्द तयार झाला. जसा जसा काळ पुढे गेला तसे या सोन्याच्या खाणीत
काम करणाऱ्या मजुरांना जास्तीत जास्त खोलवर खणावं लागे. हे करताना त्यांचे कपडे
फाटत म्हणून त्यांना जाड्या भरड्या आणि दणकट पॅण्टस् ची गरज भासू लागली. याच्यावरून लीव्हायला या
कापडाची पॅण्ट शिवण्याची आयडिया सुचली अशा प्रकारे ‘खाणीमध्ये काम
करणाऱ्या मजूर वर्गासाठी’ जगातली पहिली जीन्स जन्माला आली. लीव्हाय (Levis) या
जगप्रसिध्द ब्रॅन्डचा उदय झाला. विसाव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत जीन्सकडे फक्त
‘कामगारांसाठी उपयुक्त’ या दृष्टीकोनातून पहिले जाई. त्यामुळे जीन्स ही ‘गरिबांची पॅण्ट’ समजली जात असे
सहाजिकच तिचे स्टेटस खालच्या दर्जाचे मानले जाई. आज लीव्हायची जीन्स जगातल्या ११०
देशात विकली जाते. पहिली जीन्स १२ डॉलरला विकणाऱ्या या कंपनीने २०१६ मध्ये ४५५
कोटींचा पल्ला गाठला आहे.
दिसतं तसं नसतं
आपल्या कोणत्याही
वस्तूचे यशस्वी मार्केटिंग कसे करायचे हे पक्के ठाऊक असणाऱ्या अमेरिकन्सनी
गरिबांची असलेली ही जाडीभरडी जीन्स हळूहळू समाजातल्या सर्व थरापर्यंत नेली. जीन्स
हे एक आदर्श ‘मळखाऊ’ कापड आहे म्हणजेच जीन्सवर कितीही घाण लागली तरी जीन्सच्या गडद
रंगामुळे ती दिसत नाही. पण ‘दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं’ घाणीचे डाग दिसत
नाहीत याचा अर्थ घाण नाही असा होत नाही. लोकांचे समजसुध्दा विचित्रच असतात. ‘भय्या
जेवढा अस्वच्छ तेवढी त्याची पाणीपुरी चविष्ट’ असं मानणारे लोक ‘जीन्स जेवढी मळलेली
तेवढी चांगली’ असे समजतात. फक्त डाग दिसत नाहीत म्हणून एकच जीन्स चार चार दिवस
वापरतात. अश्या प्रकारे अस्वच्छ असलेले कपडे अंगावर घालणे हे आजारांना आमंत्रण
देणारे आहे.
जीन्सचे कापड हे खूप
जाड असते त्यामुळे हवासुध्दा सहजपणे जाऊ शकत नाही. त्यामुळे उष्णता कपड्यांच्या
आतच कोंडून ठेवली जाते. थंड वातावरणात राहणाऱ्या व्यक्तींनी जीन्स वापरली तर ठीक
आहे पण भारतासारख्या उष्ण कटिबंधातील लोकांनी सतत जीन्स वापरणे पूर्णपणे चूक आहे. कंबर,
जननेंद्रिय आणि जांघेच्या भागात एरवीही अधिक प्रमाणात घाम येतो. नेहमी जीन्स
वापरल्याने हा घाम त्या ठिकाणी साचून राहतो आणि ‘फंगल इन्फेक्शन’ होते. जर एकच
जीन्स न धुता चार चार दिवस वापरली तर जीन्सवरची घाण आणि आतला साचणारा घाम
याच्यामुळे अशा व्यक्तींना होणारे ‘फंगल इन्फेक्शन’ कितीही अँटी फंगल क्रीम्स
वापरली तरी बरे होत नाही. गेल्या पाचेक वर्षात असे जुनाट फंगल इन्फेक्शनचे पेशंट
मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जीन्सचा अतिरेकी वापर हे याचे महत्त्वाचे कारण आहे.
हल्लीच्या बहुतांश
लोकांच्या कामाचे स्वरूप बैठे आहे. आय टी क्षेत्रात काम करणारे लोक तर १२ – १२ तास
बसून असतात. अनेकदा तर शी शू साठी सुध्दा उठायची परवानगी नसते. जीन्स घालून सतत रेग्झिनच्या खुर्चीवर बसल्याने मोठ्या
प्रमाणात उष्णता निर्माण होते. ही उष्णता काही जणांमध्ये पाईल्स, फिशर यासारखे
गुदद्वाराशी संबंधित आजार निर्माण करते. पाईल्स म्हणजे गुदव्दाराशी निर्माण होणारे
अंकुर तर संडासाच्या जागी निर्माण होणारी जखमेला फिशर असे म्हणतात. ही जखम अत्यंत
वेदनादायक असते. कधी कधी बद्धकोष्ठतेचा विशेष त्रास नसणाऱ्या व्यक्तींमध्येही फिशर
बघायला मिळते अशा वेळी त्याचे कारण जीन्स घालून सतत एका जागी बसणे हे असते.
वाढणारी उष्णता आणि जळणारे अंकुर
हल्ली लो वेस्ट,
पेन्सिल फीट जीन्सची फॅशन आहे. हा प्रकार तर अजून तापदायक आहे. जंक फूड खाऊन
वाढलेले पोटावरचे ‘टायर’ लपवण्यासाठी अनेकजण या जीन्समध्ये शिरण्याचा केविलवाणा
प्रयत्न करताना दिसतात. अशा प्रकारचे अत्यंत घट्ट कपडे घातल्याने वृषणावर (Testicles) दाब पडून त्यांना इजा होण्याचा संभव असतो. शुक्राणू तयार होण्यासाठी
शरीराच्या तापमानापेक्षा साधारण ४ अंश सेल्सिअस कमी तापमान आवश्यक असते म्हणूनच
वृषण हा अवयव शरीराच्या बाहेरील बाजूस असतो. सतत जीन्स घातल्यामुळे या भागातील
तापमान वाढते त्यामुळे शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेस बाधा पोचू शकते. टाईट
जीन्स हल्ली पुरुषांमधील वाढत्या वंध्यत्वामागचे महत्त्वाचे कारण आहे. थोडक्यात सतत
जीन्स घातल्याने नको तिथे पाईल्सचे अंकुर फुटतात पण हीच अतिरिक्त उष्णता तुमच्या
संसारवेलीवर येणाऱ्या अंकुराला रुजण्याआधीच जाळू शकते हे अनेकांना माहितच नसते.
वाढलेल्या उष्णतेवर
मात करण्याचा हमखास उपाय म्हणून बरेच जण जास्त पाणी प्यायला सुरुवात करतात. पण
त्याचाही फायद्याऐवजी तोटाच होतो. वाढलेल्या पोटावर जीन्स ताणून बसवलेली असताना
जास्तीचे पाणी प्यायल्याने पोटावर दाब पडून खाल्लेले अन्न वर वर येऊन अॅसिडीटीचा
त्रास सुरु होतो.
नेहमी टाईट जीन्स
घालणाऱ्या आणि हाय हील संडल्स तरुणींची व्यथा काय सांगावी ? उभे राहणे आणि चालणे
या क्रिया विचित्र पद्धतीने कराव्या लागल्यामुळे त्यांना कंबरदुखी, टाचदुखी आणि
पोटऱ्यांमध्ये गोळे येणे यांना तोंड द्यावे लागते. टाईट जीन्समुळे कंबर आणि
मांड्यांच्या नसांना (Nerves) ईजा होऊन मांड्या आणि पायांना मुंग्या
येणे, आग होणे यासारखे प्रकार उद्भवू शकतात.
सतत जीन्स वापरल्यामुळे
होणारे हे आजार पाहून ‘जीन्सके घर शीशे के होते है’ हे वाचकांना पटले असेल.
जसा देश तसा वेष
अशी म्हण आहे. पण आज
आपला पेहराव फॅशनवर ठरतो. कधीतरी बदल म्हणून करण्याची ‘फॅशन’ हीच सगळ्या ‘नेशन’ची
आवड झाली तर आरोग्याची परिस्थिती कशी ‘भीषण’ होते याचे उदाहरण म्हणजे जीन्स.
जीन्सला पर्याय ठरू शकेल असा जाड्याभरड्या खादीचा पर्याय आपल्याकडे होता. आपल्या
स्वातंत्र्यलढ्यात देखिल खादीचे महत्त्वाचे योगदान होते. पण स्वातंत्र्यानंतर सगळे
खादीधारी वेगळ्याच ‘खादी’ कडे वळले आणि आणि त्यातून बाहेरच्या देशातून आलेल्या
कपड्यांना ‘आयते कुरण’
मिळाले. याचा अर्थ सगळ्यांनी धोतर आणि
सदरा घालावा असे आजिबात नाही. पण कॉटनपासून बनवलेल्या आणि फिटिंगला कम्फर्टेबल
असलेल्या पॅण्टस घातल्याने आपण लगेच गावंढळ होत नाही. जे
कपडे आपल्या हवामानाला आणि आरोग्याला साजेसे आहेत तेच वापरणे शहाणपणाचे नाही का ?
शेवटी ‘सर सलामत तो पगडी पचास’
बघा पटतंय का ?
© डॉ. पुष्कर
पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
आयुष आयुर्वेद
क्लिनिक,
A – 5, पाम व्ह्यू,
RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827
हा लेख शेअर
करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता शेअर करावा ही विनंती.
Comments
Post a Comment