लोणचे
खा पण बदनामीपुरते
अखेर ज्या अस्सल मुंबईच्या पावसाची आपण इतके दिवस वाट पाहत होतो तो एकदाचा आलाय. शेतकऱ्यासोबत वेधाशाळेवाल्यांचाही जीव भांड्यात पडलाय. आता सलग दोन दोन दिवस तो कोसळत राहणार. कधी कधी तर ढग इतके दाटून येतात की दिवस आहे की रात्र हा प्रश्न पडतो. या वातावरणात आपला अंगभूत आळस अजूनच वाढतो आणि मस्तपैकी झोपून रहावस वाटतं. या अशा ‘टिपिकल’ पावसाळी वातावरणात पोटाची मात्र पार वाट लागते. अशा वेळी आपल्यापैकी बऱ्याच जणांना भूक लागलेली आहे की नाही हेच समजत नाही. आणि समजा काही खाल्लंच तर पोट जड होणे, पोट फुगणे अशी लक्षणं सुरु होतात तर काही जणांना जुलाब लागतात. म्हणून अशा वेळी काय खावं तरी काय?
आयुर्वेदानुसार सतत पडणाऱ्या
पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो त्यामुळे आपल्या शरीरातील पचवण्याची
क्षमता (अग्नि) कमी होतो आणि वात वाढतो. म्हणून अशा दिवशी अग्निला वाढवणारा आणि
वात कमी करणारा आहार घ्यायला हवा. म्हणजे नेमकं काय खायचं याचं उत्तर चरक संहितेत
मिळतं.
व्यक्ताम्ल लवणस्नेहं वातवर्षाकुलेऽहनि I
विशेष शीते भोक्तव्यं वर्षासु
अनिल शान्तये II
ज्या दिवशी भरपूर पाऊस पडत असेल
अशा वेळी ‘व्यक्ताम्ल
लवणस्नेहं’ असा आहार घ्यावा.
आता ही काय भानगड आहे असा प्रश्न पडला असेल. ज्या पदार्थात अम्ल म्हणजे आंबट, लवण
अर्थात खारट चवी मुबलक आहे आणि सोबत भरपूर स्नेह म्हणजे तेल आहे त्याला ‘व्यक्ताम्ल लवणस्नेहं’ असे म्हणतात. अशा
प्रकारच्या आहाराचे उत्तम उदाहरण म्हणजे लोणचे.
काही अन्नपदार्थ कायम बदनाम असतात लोणचे त्यापैकी एक. जगातला कोणताही डॉक्टर तुम्हाला लोणचं खा म्हणून सांगणार नाही. पण आयुर्वेद सांगतो आणि दोन पावलं पुढे जाऊन कधी खायचं कधी नाही, कुणी खायचं कुणी नाही हेही सांगतो. सहसा लोणचं ते बनवतात कच्च्या कैरीपासून म्हणजे अम्ल रस, त्यात अधिक प्रमाणात मीठ असतं म्हणजे लवण रस तसंच लोणचं खराब होऊ नये म्हणून त्यात तीळ किंवा मोहरीचे तेल घालतात सोबतीला लाल तिखट, हळद, मोहरी, हिंग यासारख्या भूक वाढवणाऱ्या आणि पचनाला मदत करणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांची जोड आहे. म्हणूनच लोणचे ‘व्यक्ताम्ल लवणस्नेह’ याच उत्तम उदाहरण आहे. याच कारणामुळे आपल्याकडे लोणचे पावसाळ्याच्या सुरवातीला घातले जाते. पावसाळ्यात वाढणाऱ्या वातापासून संरक्षण करणारी ही व्यवस्था. आयुर्वेद आपल्या खाद्यसंकृतीत किती खोलवर रुजलेला आहे याची साक्ष देणारी.
आता हे लोणचं खायचं किती? पु.ल. देशपांडेच्या ‘गणगोत’ पुस्तकात त्यांनी स्व.
गायक अरूण दाते यांचे वडील रामुभैया दाते यांचा एक अनुभव सांगितला आहे. पानात
तंबाखू किती घालायचा? असं विचारल्यावर
रामुभैया ‘बस्स चिमुटभर बदनामीपुरता’ असं उत्तर देतात. हाच नियम लोणच्यालाही लागू
होतो. लोणचंही ‘बदनामी’पुरते खायचे असते म्हणजे एका वेळी एक फोड इतकेच खायचे असते आणि
तेही पावसाळ्यात. ज्यांना अम्लपित्त, पोटात जळजळणे, अल्सर, संडासातून रक्त पडते
असे उष्णतेचे त्रास असतील त्यांनी लोणचे खाऊ नये. आणखी एक गोष्ट हे गुण घरी
बनवलेल्या लोणच्याचे आहेत. बाजारात मिळणाऱ्या लोणच्यात व्हिनेगार घातलेले असते
त्यामुळे ते खाणे योग्य नाही.
तेव्हा
पावसाळ्यात लोणचे खा आणि निरोगी
रहा.
डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
A – 5, पाम व्ह्यू, RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827
Comments
Post a Comment