मधुबालेसाठी ‘मधुशाळा’
ऐका हो ऐका ! रोज सकाळी गरम पाणी आणि मध पिऊन
‘स्लिम’ होणाची स्वप्न बघणाऱ्या ‘मधुबालां’साठी ही खास पोस्ट.
मध हा पदार्थ भारतीयांसाठी नवीन नाही. किंबहुना लहान असताना आपल्यापैकी
बहुतांश जणांनी खाल्लेला पहिला गोड पदार्थ म्हणजे मध. आयुर्वेदानुसार मध हे कफाचे
सर्वश्रेष्ठ औषध आहे. खोकला झालेला असताना थुंकीतून बाहेर पडणारा चिकट पदार्थ
म्हणजे कफ अशी सामान्यांची समजूत असते. आयुर्वेदानुसार कफाला ‘श्लेष्मा’ असेही
म्हणतात. श्लेष्मा हा शब्द ‘श्लिष’ या मूळ संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे
ज्याचा अर्थ आलिंगन देणे असा होतो. आलिंगनात दोन व्यक्ती जवळ येतात, जोडल्या जातात
म्हणून जो शरीरघटक दोन पदार्थांना जोडण्याचे काम करतो त्याला ‘श्लेष्मा’ किंवा
‘कफ’ असे म्हणतात. मध हे अशा चिकट कफाला कमी करणारे औषध आहे.
पावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढते. या वाढलेल्या आर्द्रतेमुळे आपल्या
शरीरातही ओलावा वाढतो असे आयुर्वेदाचे मत आहे. या अतिरिक्त ओलाव्यामुळेच सर्दी
खोकल्यासारखे श्वसन संस्थेचे आजार, खरुज, एग्झिमा, फंगल इन्फेक्शन सारखे
त्वचाविकार या दिवसात वाढताना दिसतात. शरीरात वाढलेल्या आर्द्रतेला म्हणजेच कफाला
कमी करण्याचे काम मध करते. म्हणूनच पावसाळ्यात आपल्या आहारात मधाचा वापर करण्याचा
सल्ला महर्षी चरकांनी दिला आहे. (पानभोजन संस्कारान् प्राय:
क्षौद्रान्वितं भजेत् I)
मध खायचा म्हटलं की बरेच जण सकाळी उपाशीपोटी गरम पाणी आणि मध घ्यायला सुरुवात
करतात जे आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून अत्यंत चुकीचे आहे. आयुर्वेदातील सिद्धांतानुसार
मध कधीही गरम करू नये किंवा गरम पदार्थांत टाकून घेऊ नये. इतकेच काय ज्या व्यक्ती
सतत उष्णतेच्या संपर्कात असतात त्यांनीही मध घेऊ नये. अशा प्रकारे मधाचे सेवन हे
विषाप्रमाणे घातक आहे असे आयुर्वेद सांगतो. तसेच मध पचायला जड असल्याने माफक
प्रमाणात खावा असे आयुर्वेद सांगतो. सतत चुकीच्या पद्धतीने आहार घेतलेला आहार
व्यवस्थित न पचल्याने ‘आम’ नावाचा विषाप्रमाणे घातक पदार्थ शरीरात साचू लागतो. अशा
प्रकारे चुकीच्या पद्धतीने मध खाल्ल्याने तयार होणारा आम हा सर्वात घातक असतो कारण
आम पचवण्यासाठी आवश्यक असलेली उष्ण चिकित्सा मधामुळे निर्माण होणाऱ्या आमासाठी
करता येत नाही.
आयुर्वेदात सांगितलेल्या या तथ्यांना आता शास्त्रीय आधार उपलब्ध आहे. ‘जर्नल
ऑफ रिसर्च इन आयुर्वेद’ च्या २०१० च्या अंकात प्रसिध्द झालेल्या शोधनिबंधानुसार
मधाला ४७°C च्या वर उष्णता दिल्यास Hydroxymethyl
furfuraldehyde (HMF) नावाच्या एका केमिकल चे मधातील प्रमाण मोठ्या
प्रमाणात वाढते. आधुनिक रसायन शास्रानुसार HMF कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते. याचाच अर्थ आज चुकीच्या पद्धतीने
घेतलेला मध भविष्यात कदाचित कॅन्सरसारख्या रोगाला कारणीभूत होऊ शकतो.
आयुर्वेदानुसार मध आणि पाणी एकत्र घेतल्यास ते वजन कमी करण्यास मदत करते हे
खरे असले तरी ते घेण्याची योग्य पद्धत माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. एक चतुर्थांश
आटवलेल्या पाण्याला आयुर्वेदात ‘आरोग्यांबु’ असे नाव आहे. हे आरोग्यांबु वजन कमी
करण्यासाठी उपयुक्त असते. म्हणून मध पाणी घेताना प्रथम ४०० मि.लि. पाणी घेऊन ते
१०० मि.लि. शिल्लक राहीपर्यंत आटवावे. नंतर ते पाणी कक्ष तापमानाला (Room
temperature) येईपर्यंत थांबावे. त्यानंतर त्यात २० ग्रॅम मध घालून व्यवस्थित मिश्र करावा. यासाठी लागणारे पाणी
सकाळीच गरम करावे. रात्री गरम करून ठेवू नये. अशा प्रकारचे मध पाणी सकाळी
उपाशीपोटी घेतल्यास कुठलाही दुष्परिणाम न होता वजन कमी होते.
थोर कवी हरीबंशराय बच्चन ‘राह पकड तू एक चला चल पा जायेगा मधुशाला’ असं आपल्या
‘मधुशाला’ या प्रसिध्द कवितेत म्हटले आहे. त्यामुळे आयुर्वेदातील कोणताही सल्ला
पाळताना तो आयुर्वेदाच्या परिभाषेत पूर्णपणे समजावून घेणे आवश्यक असतो. नाहीतर
अर्धवट माहितीमुळे दुधी भोपळ्याच्या रसासारख्या दुर्घटना होतात व आयुर्वेद
विनाकारण बदनाम होतो.
म्हणूनच बारीक होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या ‘मधुबालां’ना आयुर्वेदाचा धडा
समजावून देण्यासाठी ही ‘मधुशाळा’.
© डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
A – 5, पाम व्ह्यू, RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827
हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता शेअर करावा ही विनंती.
Comments
Post a Comment