तिळा तिळा दार उघड
दिवाळीच्या सुमारास सुरु झालेली ‘गुलाबी’ थंडी मार्गशीर्ष
संपता संपता ‘बोचरी’ होऊ लागते. वाढलेल्या थंडीमुळे हवेतही कोरडेपणा निर्माण होतो;
अशा वातावरणात आतली आर्द्रता टिकून राहावी म्हणून झाडं आपली पानं गाळून टाकतात. हेमंतातली
निसर्गाची शोभा शिशिर पार घालवून टाकतो. आपलंसुध्दा तसंच आहे दिवाळीच्या खरेदीसाठी
खर्च करून खिसे रिकामा झालेला माणूस शिशिरातल्या पानं गळलेल्या झाडाइतकाच केविलवाणा
वाटतो. शिशिर ऋतूत वातावरणात थंडपणा आणि रुक्षता एकाच वेळी वाढते. अशा वेळी शरीराला
गरम आणि स्निग्ध अशा स्निग्ध पदार्थाची गरज असते. नेमकं हेच कॉम्बिनेशन आपल्याला तीळगुळात
गवसते. तीळातला स्निग्धपणा आणि गुळातला गोडवा उत्तरायण सुरु झाल्याची ग्वाही देतो.
तीळातीळाने दिवस वाढत जाईल आणि पुन्हा एकदा वसंत बहरेल याचे आश्वासन मिळते.
सॅच्युरेटेड फॅट, अनसॅच्युरेटेड फॅट, कोलेस्टेरॉल हे शब्द
आजकाल सर्वांच्याच तोंडी बसलेले आहेत. सोयाबीन ऑईल, ऑलिव्ह ऑईल, अव्हॅकॅडो ऑईल हीच
जगातली सर्वश्रेष्ठ तेलं आहेत हे जाहिरातीपासून ते कुकरी शोज् पर्यंत दररोज मनावर
ठसवलं जातंय. त्यामुळेच डॉक्टर कुठलं तेल खाऊ ? जवळपास प्रत्येक दुसरा पेशंट हा
प्रश्न विचारत असतो. आयुर्वेदाने तिळाचे तेल
सर्वश्रेष्ठ सांगितले आहे. खरं तर तेल हा शब्दच तीळापासून तयार झालेला आहे. आयुर्वेदात
तीळ तेलाचे गुण विस्ताराने सांगितलेले
आहेत त्यातील काही महत्त्वाच्या गुणांचा आपण परामर्श घेऊयात.
वातावर मात
‘तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळू दे सारी रात’ ही
प्रार्थना आपण लहान असताना म्हणायचो. जे तीळ तेल
निरांजनाची ‘वात’ तेवत ठेवते तेच तीळ तेल शरीरातील ‘वात’ दोषालाही
नियंत्रित करते. वाताचे आजार म्हणजे मुख्यतः सांध्याचे आजार. हाडं झिजल्यामुळे
पन्नाशी साठीमध्ये होणारे संधिवातासारखे आजार आज तिशीतच बघायला मिळतात. व्यायामाचा
अभाव आणि खाण्यातून बाद झालेले तीळ तेल हे याचे महत्त्वाचे कारण आहे. हाडांच्या
आरोग्यासाठी कॅल्शियम आवश्यक असते. १०० ग्रॅम सोयाबीन मधून २७७ mg कॅल्शियम मिळते
तर तितक्याच तीळातून सुमारे १४५० mg इतके कॅल्शियम मिळते. तरीही सोयाबीनचा गवगवा
होतो आणि तीळ मात्र उपेक्षित राहतात.
जे औषध हाडांच्या विकारावर उपयुक्त ठरते ते दात आणि
केसांच्या विकारांवरही कार्यकारी ठरते असे आयुर्वेद सांगतो. दात आणि हिरड्या यांचे
आरोग्य चांगले राखण्यासाठी तीळ तेलाचा ‘माऊथ वॉश’ उपयुक्त आहे हे शास्रीय सत्य
सर्वप्रथम आयुर्वेदाने जगाला सांगितले. तसेच आयुर्वेदात सांगितलेले काळे तीळ आणि
आवळा यांचे चूर्ण निरोगी केसांसाठी एक उत्तम टॉनिक आहे.
फॉर हेल्दी हार्ट
तेल आणि कोलेस्टेरॉल यात छत्तीसचा आकडा आहे हे आपल्याला
माहित आहेच. पण तीळ तेल मात्र याला अपवाद आहे. तीळ तेल हे मेद कमी करते हे
आयुर्वेद किमान दोन हजार वर्षांपासून सांगत आलाय. पण आम्ही ते उडवून लावले. तिळामध्ये
असणाऱ्या Sesamin आणि Sesamol या दोन घटकांमुळे कोलेस्टेरॉल कमी होते हि बाब आज अनेक
संशोधनातून पुढे आलेली आहे. वर सांगितलेल्या दोन घटकांसोबतच तीळामध्ये नैसर्गिक ॲण्टि
ऑक्सिडंट असणारे ‘व्हिटामिन ई’ मोठ्या प्रमाणात असते. ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी
कारणीभूत असणारे रक्तवाहिन्यांमधील हानिकारक बदल व्हिटामिन ई मुळे कमी होतात. तसेच तीळामधील काही
घटकांमुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. पण
टीव्हीवरची जाहिरात मात्र करडई पासून बनलेले सफोलाच कसे बेस्ट आहे हे सांगत असते. सफोलामध्ये
मोठ्या प्रमाणात PUFA आहे त्यामुळे ते हृदयासाठी चांगले असे सांगितले जाते. पण
त्याच्यामध्ये हृदयाला घातक असणारे ओमेगा 6 फॅट्स ७८ % इतक्या
जास्त प्रमाणात आहे असा स्पष्ट उल्लेख ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग
यांच्या ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ या पुस्तकात आहे.
द लॉरेल ॲण्ड हार्डी ऑईल
तीळ तेल स्थूल व्यक्तीला बारीक होण्यास मदत करते तसेच कृश
व्यक्तीला वजन वाढण्यासाठी मदत करते. आयुर्वेदानुसार
तीळ तेल ‘सूक्ष्म’ म्हणजे शरीरातील लहानात लहान अवयवात जाण्याची क्षमता असलेले
तसेच ‘व्यवायी’ गुणाचे म्हणजे चटकन शरीरभर पसरणारे आहे. या गुणांमुळे स्थूल
पुरुषांमध्ये शरीरातील वेगवेगळ्या सिस्टिम्समधील अडथळे पार करून ते शरीरातल्या
पेशीपेशीपर्यंत जाते. तर कृश व्यक्तींच्या शरीरात सर्व अवयव आणि सिस्टिम्स लहान
आकाराच्या असतात पण तीळ तेल सूक्ष्म गुणामुळे सर्व शरीरभर सहज पोचते. म्हणून स्थूल
आणि कृश अशा दोघांसाठी तीळ तेल हे अभ्यंग अर्थात अंगाला लावण्यासाठी आणि आहारात
वापरण्यासाठी सुयोग्य आहे.
स्रियांचा मित्र
सध्या सुमारे ३० % तरुणींमध्ये PCOD ही समस्या दिसते. या आजारात
पाळी उशिराने येणे, कमी प्रमाणात स्राव होणे ही लक्षणे दिसतात. तीळ गर्भाशयाला
शुध्द करते असे आयुर्वेद सांगतो. म्हणूनच ज्या स्रियांची पाळी उशिराने येते किंवा
ज्यांना पाळीच्या वेळी कमी प्रमाणात स्राव होतो अशा स्रियांनी तीळाचा आहारात
नियमितपणे समावेश करणे आवश्यक आहे. या स्रियांना आम्ही आयुर्वेदीय वैद्य तीळ, ओवा
आणि बडीशेप एकत्र करून मुखवास म्हणून खाण्याचा सल्ला देत असतो.
आधुनिक वैद्यकातही अशा स्वरूपाचा काही विचार आहे का ? हे
शोधण्यासाठी इंटरनेटची मदत घेतली. मासिक पाळीचे चक्र सुरळीत राहण्यासाठी आपल्या
शरीरात ‘इस्ट्रोजेन’ व ‘प्रोजेस्टेरॉन’ नावाचे हार्मोन्स महत्त्वाची भूमिका
बजावतात. यापैकी इस्ट्रोजेन गर्भाशय आणि स्त्रीबीजाच्या वाढीसाठी आवश्यक असते तर प्रोजेस्टेरॉन
हे स्त्रीबीज परिपक्व होणे व गर्भाशयातून पुरेसा रक्तस्राव होण्यासाठी आवश्यक
असते. तीळामध्ये मोठ्या प्रमाणात झिंक असते ज्यामुळे शरीरातील प्रोजेस्टेरॉन
नैसर्गिकरीत्या वाढते आणि पाळी वेळेवर येण्यासाठी मदत होते हे आता सिद्ध झालेले
आहे. जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी लेखाच्या शेवटी दिलेली लिंक अभ्यासावी.
ब्रेन टॉनिक
तीळाचे तेल मेध्य म्हणजे बुद्धी वाढवणारे आहे असे आयुर्वेद
सांगतो. म्हातारपणामुळे होणाऱ्या स्मृतीभ्रंश म्हणजे अल्झायमरमध्ये मेंदूमध्ये Amyloid ß नावाचा घटक साचून राहतो. नियमितपणे तीळाच्या सेवनामुळे मेंदूमध्ये Amyloid ß साठण्यास प्रतिबंध होतो हे संशोधनातून पुढे आलेले सत्य
आहे. तरीही फक्त कॅलिफोर्निया बदाम खाऊ घालून आमचा ‘ब्रेन वॉश’ केला जातो.
सुमारे १०० वर्षांपासून शेंगदाणा आपल्या आहाराचा अविभाज्य
घटक बनलाय. पण यासाठी ‘जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर’ या अमेरिकन शास्रज्ञाने आपले
अवघे जीवन शेंगदाण्यावरील संशोधनासाठी समर्पित केले. शेंगदाण्यापासून बनवता येतील
अशा १०५ पाककृती त्याने शोधून काढल्या. या विषयावरचे ‘वीणा गवाणकर’ यांनी लिहिलेले
‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचण्यासारखे आहे. ही समर्पित वृत्ती
आपल्यात कधी येणार ? शेंगदाणा तेलात अनेक उपयुक्त घटक आहेत पण ते लवकर खराब होते.
याउलट तीळ तेल दीर्घकाळ आहे त्या स्थितीत कायम राहते.
आयुर्वेदात सांगितलेला उपदेश हा वर्षानुवर्षे केलेल्या
प्रयोगांच्या निष्कर्षांचे फलित आहे ही गोष्ट आपण व्यवस्थित लक्षात घेणे आवश्यक
आहे. हे प्रयोग करताना आयुर्वेदातील आचार्यांना कोणत्याही कंपनीकडून कसलेही आमिष
दाखवण्यात आलेले नव्हते. म्हणून हे निरपेक्ष भावनेने केलेले कार्य आज हजारो
वर्षांनंतरही तितकेच प्रभावी आहे. तीळ हे अत्यंत कमी पाण्यावर येणारे पीक आहे.
भारत हा जगात तीळाच्या उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज जेव्हा भारतीय
बहुगुणी तीळाकडे दुर्लक्ष करून जाहिरातींच्या विळख्यात सापडून सोयाबीन, ऑलिव्ह,
अव्हॅकॅडो याचे गुणगान करताना पाहून आचार्यांचा जीव ‘तीळ तीळ तुटत’ असेल. त्याऐवजी
मनापासून ‘तिळा तिळा दार उघड’ अशी प्रार्थना केल्यास आरोग्यमंदिराचे दार सहज उघडेल
यात मला तरी ‘तिळमात्र’ ही शंका नाही.
© डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
आयुष आयुर्वेद
क्लिनिक,
A – 5, पाम व्ह्यू,
RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827
हा लेख शेअर
करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता शेअर करावा ही विनंती.
Link
for Sesame oil benefit in PCOD
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=2&cad=rja&uact=8&ved=2ahUKEwjLqfSX_u_fAhVEOSsKHV3UBf4QFjABegQIBBAB&url=https%3A%2F%2Fpcosdiva.com%2F2015%2F04%2Fusing-seed-rotation-to-regulate-your-menstrual-cycle%2F&usg=AOvVaw2QEdilp4LaLcAm5vC_or9o
Comments
Post a Comment