शब्दावाचून अडले सारे
सप्टेंबर २०१४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रसिद्ध केलेल्या रिपोर्ट
नुसार “१५ ते २९ या वयोगटातील मुलांमध्ये होणाऱ्या आत्महत्यांमध्ये भारत जगात
पहिल्या क्रमांकावर आहे”. या बातमीला मिडीयाने बरीच प्रसिद्धी दिली पण
नेहमीप्रमाणे यथावकाश सर्व शांत झाले. अर्थात या गोष्टीची जाणिव शासनाला नव्हती
असे नाही कारण १९९९ साली भारत सरकारने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार एकूण
आत्महत्यांपैकी ६५ % व्यक्ती १५ ते २४ या वयोगटातील होत्या. आश्चर्याची गोष्ट
म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू यासारखी शिक्षणाच्या बाबतीत पुढे
असणाऱ्या राज्यातील युवक सर्वाधिक आत्महत्या करतात. याबाबतीत प्रादेशिक असमतोल
इतका आहे की भारताच्या उत्तरकडील राज्यांपेक्षा दक्षिणेकडील राज्यांमध्ये
आत्महत्यांचे प्रमाण १० पट अधिक आहे. खेदाची बाब म्हणजे भारत सरकार मानसिक आरोग्य
या विषयावर एकूण आरोग्यावरील खर्चाच्या ०.०६% इतकी नगण्य तरतूद करते जी
बांग्लादेशपेक्षाही (०.४४%) कमी आहे. २०२० साली जगात सर्वाधिक तरूण असणाऱ्या
देशाला ही आकडेवारी नक्कीच भूषणावह नाही.
कारणे
या आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेत असताना शिक्षणातील अपयश, कामाच्या ठिकाणचा
तणाव, वाढते शहरीकरण, सामाजिक दबाव, पालकांसोबतचा विसंवाद, त्यातून निर्माण होणारी
‘मी कुणालाच आवडत नाही’ अशी भावना, नकळत्या वयात होणारे प्रेमसंबंध ही कारणे
ठळकपणे समोर येतात. बऱ्याचदा इतकी शिकली सवरलेली मुलं कशी काय आत्महत्या करतात ?
असा सूर ऐकू येतो. पण केवळ बुध्यांक (IQ) कडे लक्ष देताना भावनांक (EQ) कडे झालेले
संपूर्ण दुर्लक्ष हे याचे महत्त्वाचे कारण आहे.
आभास हा छळतो मला
या पार्श्वभूमीवर मला एका वेगळ्या मुद्द्याकडे लक्ष वेधावेसे वाटते. सध्या
तरूण असणारी मंडळी इंटरनेट, मोबाईल, सोशियल मिडिया यांच्या उदयानंतर जन्माला आलेली
आहे. यातल्या अनेकांच्या आयुष्यातील पहिले खेळणे मोबाईल हेच होते. ही मुलं जन्मतःच
गॅजेटच्या आभासी दुनियेत राहणारी आहेत. कदाचित
त्यामुळेच इमोजीच्या सहाय्याने ‘शब्देविण संवाद’ करण्यात निपुण असणारी मंडळी
प्रत्यक्ष बोलताना मात्र शब्द शोधताना दिसते. ही आभासी दुनिया त्यांच्या संभाषण
कौशल्याचा विकास होऊ देत नाही. ‘शब्दावाचून अडले सारे’ ही परिस्थती निर्माण होते.
बऱ्याचदा एकुलता एक असल्याने पालकांनी आजवर सगळे हट्ट पुरवलेले असतात त्यामुळे
अनेकदा मागण्या अगोदरच वस्तू समोर हजर होते. पण अशा मुलांनाही आयुष्यात कधीतरी
अपयश,नकार वाट्याला येतोच. अशा वेळी ही ‘अबोल’ मुलं गोंधळून जातात. आपल्या
प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी प्रत्यक्ष माणसांशी बोलण्यापेक्षा मोबाईल, लॅपटॉपशी बोलणं त्यांना सोईस्कर वाटतं आणि बऱ्याचदा
इथेच घात होतो. यातूनच पराभूत मानसिकतेला खतपाणी मिळते. यातले बऱ्याच जणांना आत्महत्या
करण्यापूर्वीचा शेवटचा निरोपही फेसबुक
किंवा ट्वीटर वर शेअर करावासा वाटतो याच्यावरून परिस्थितीची गांभीर्य लक्षात यावे.
२०१२ मध्ये एकट्या युरोपमध्ये ५९८१ internet suicidesची नोंद झाली आहे. जपानमध्ये गेल्या दशकात
इंटरनेट वरून एकमेकांशी संपर्क करून सामुदायिक आत्महत्या करणाऱ्या
व्यक्तींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा पद्धतीने २००४ साली एकट्या जपानमध्ये ३२,३२५ व्यक्तींनी
आपले जीवन संपवले आहे.
आयुर्वेदात उत्तर आहे ?
या बदलत्या परिस्थितीत पाच हजार वर्ष जुना आयुर्वेद कुठे बसतो ? आय टी च्या
युगात वावरणाऱ्या या मुलांना सांगण्यायोग्य आयुर्वेदाकडे काही आहे का ? असे प्रश्न
माझ्यासारख्या आयुर्वेदाच्या अभ्यासकाला पडतात. हे प्रश्न घेऊन मी ‘चरकसंहिता’
उघडली तेव्हा चरकांनी मला जे दोन मंत्र दिले तेच आता तुम्हाला सांगणार आहे. हे
मंत्र चरकांनी सद्वृत्त करताना सांगितलेले आहेत.
त्यापैकी पहिला मंत्र आहे
‘पूर्वाभिभाषी स्यात्’ याचा अर्थ ज्यावेळी तुम्ही कोणालाही भेटता तेव्हा प्रथम तुम्ही समोरच्या
व्यक्तीला हसून अभिवादन करा. या एवढ्याशा छोट्या कृतीने मनावरील तणाव हलका व्हायला
मोलाची मदत होते. मनापासून केलेले अभिवादन ही अर्थपूर्ण संवादाची पहिली पायरी आहे.
ज्या व्यक्ती उत्तम संवाद साधू शकतात त्यांना हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते
असे डॉ. डीन ऑर्निश यांनी लिहिलेल्या ‘A program for
reversing heart disease” या जगप्रसिध्द पुस्तकात म्हटले आहे.
दुसरा मंत्र आहे
‘हेतावीर्ष्यु: फले नेर्ष्यु:’ आपल्या पेक्षा
यशस्वी माणसांनी मिळवलेल्या पैसा, यश यांची ईर्ष्या करण्यापेक्षा त्यांनी ते यश
ज्या सद्गुणांच्या जोरावर मिळवले त्याची ईर्ष्या करा. म्हणजेच यशस्वी व्यक्तींच्या
ज्ञान, कठोर परिश्रम, कौशल्य, सातत्य या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. दृष्टिकोनातील या आमुलाग्र बदलाला ‘सेव्हन हॅबिटस्’ य बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक स्टिव्हन् कॉव्हे यांनी ‘paradigm shift’ असे म्हटले आहे.
‘प्रोसेस’ वर लक्ष केंद्रित करा ‘रिझल्ट’ आपोआप मिळतील हे काही हजार रुपये मोजून मॅनेजमेन्टच्या
सेमिनार मध्ये शिकवले जाणारे तत्त्व आमचे चरक फुकटात सांगतात तेव्हा आयुर्वेद
जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करतो याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही.
चरकांनी दिलेले हे दोन सल्ले आपण मन:पूर्वक पाळले तरी या जगातला आपला
वावर सुसह्य होईल याची आशा वाटते.
© डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
A – 5, पाम व्ह्यू, RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827
हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल
न करता शेअर करावा ही विनंती.
Comments
Post a Comment