अम्लपित्त - घरगुती उपचार
जटायूंचा आयुर्वेद
घरातल्या घरात सहज उपलब्ध पदार्थांपासून बनवली जाणारी असणाऱ्या घरगुती औषधे हे
आयुर्वेदाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक. इतकी वर्ष आजीबाईच्या बटव्यामध्ये दडून
बसलेल्या या औषधांचे स्थान आज जागतिक आरोग्य संघटना (WHO) देखील मान्य करत आहे. आजकाल
घरातून ‘आज्या’ आणि त्यांचा ‘बटवा’ दोन्ही हद्दपार झालेल्या आहेत.
अशा वेळी या
घरगुती औषधांची मक्तेदारी काही जटाधारी मंडळींकडे आलेली आहे. रोज सकाळी अनेक जण या
जटायुंच्या “जटायुर्वेदाचे” धडे गिरवत असतात. कॅन्सरपासून हृदयविकारापर्यंत
प्रत्येक आजारावरचे तोडगे या मंडळींना तोंडपाठ असतात. असा हा ‘तोडपाणी’ आयुर्वेद
नक्कीच ‘स्वागतार्ह’ नाही. घरगुती औषधे हा आयुर्वेदाच्या केवळ प्रथमोपचारातील एक
भाग आहे. आयुर्वेद म्हणजे फक्त घरगुती औषधे नव्हे. नुसती औषधांची नावे माहित झाली
म्हणजे आयुर्वेद कळला असे नाही. कुठले औषध कुणाला, का, किती वेळ, कधी, किती
प्रमाणात, कुठल्या अनुपानातून द्यायचे अशी परिपूर्ण माहिती असणे म्हणजे खरा
आयुर्वेद. या आधीच्या लेखात आपण GERD आणि अम्लपित्त यांची ओळख करून घेतली. या
लेखात अम्लपित्तावरील घरगुती उपचार वाचताना त्यातील नेमकेपणा वाचकांनी आवर्जून लक्षात
घ्यावा हि विनंती.
आवळा – बाजारात मुख्यतः आकाराने मोठा, चकचकीत, पांढूरका आवळा मिळतो. हा कलमी
आवळा. डोंगरी
आवळा नावाप्रमाणे डोंगरावर, जंगलातून सहज उगवतो. डोंगरी आवळे आकाराने लहान, हिरवट, पिवळट
असतात आणि चवीला तूरट लागतात. कलमी आवळ्यापेक्षा डोंगरी आवळे
अधिक गुणवान असतात. आवळा चवीला आंबट असला तरीही अम्लपित्तावरचे उत्कृष्ट औषध आहे.
साधारणपणे ऑक्टोबरपासून मार्च महिन्यापर्यंत बाजारात ताजे आवळे मिळतात.
तोंडाला चव नसणे, जेवणानंतर पोट फुगणे अशी लक्षणे असताना ताज्या आवळ्याच्या फोडी
जेवताना खाव्यात. जेवणा आधी, नंतर किंवा जेवताना अशा कोणत्याही वेळी खाण्यासाठी
योग्य एकमेव फळ म्हणून सुश्रुतांनी आवळ्याचे वर्णन केले आहे. तोंड कडू होणे, जास्त
तहान लागणे, घशात आणि पोटात आग होणे अशी लक्षणे असताना आवळ्यापेक्षा ‘मोरावळा’
अधिक उपयुक्त ठरतो. तोंड चिकट होणे, पोटात
ढवळणे, तोंडाला पाणी सुटणे, अन्न वरवर येणे हि लक्षणे असताना आवळा चूर्ण किंवा
आवळ्यापासून बनवलेली ‘आमलकी मषी’ अधिक उपयुक्त ठरते. ही मषी कशी बनवायची हा प्रश्न
पडला असेल ? अहो, ज्याप्रमाणे तंबाखू जाळून मशेरी बनवतात तसेच आवळा चूर्ण किंवा
सुकलेला आवळा जाळून तयार केलेली आवळ्याची मशेरी म्हणजे आमलकी मषी. लक्षणांचा विचार
करून एकाच वनस्पतीपासून अशी वेगवेगळी औषधं बनवणे हि आयुर्वेदाची खासियत.
कोहळा – ‘आवळा देऊन कोहळा काढणे’ अशी म्हण आहे. पण अम्लपित्ताच्या रुग्णाला
आवळा देऊन कोहळा मिळाला तरी त्याच्यासाठी तो फायद्याचा सौदा आहे. कोहळा हे
शरीरातील उष्णता कमी करणारे उत्तम औषध आहे. अम्लपित्ताच्या रुग्णांना डोकेदुखी,
अंग गरम गरम वाटणे, ताप असल्याप्रमाणे वाटणे, लघवीला आग होणे अशी लक्षणे असताना
अर्धा कप कोहळ्याच्या रसात खडीसाखर घालून घ्यावी.
काही रुग्णांना चविष्ट औषध घ्यायला आवडते. ‘कुष्मांड अवलेह’ हे तशा प्रकारचे
औषध आहे. बरीच वर्ष अम्लपित्त असल्याने सतत थकल्याप्रमाणे वाटणे, चक्कर येणे, वजन
कमी होणे अशी लक्षणे असताना १० ग्रॅम कुष्मांड अवलेह सकाळी उपाशीपोटी दुधासोबत घ्यावा. कोहळ्यापासून बनवलेल्या
पेठ्याचे गुणसुध्दा साधारण असेच असतात.
सुंठ – अम्लपित्त असणाऱ्या पेशंटला सुंठीसारखे उष्ण औषध जपून वापरावे लागते.
उद्याच रामनवमी आहे राम नवमीला प्रसाद म्हणून वाटला जाणारा सुंठवडा हे
अम्लपित्तावरचे औषध आहे. वडा म्हटल्यावर काहीतरी तळलेला पदार्थ असेल असे काही
जणांना वाटेल पण सुंठवडा सुंठ, सुके खोबरे आणि खडीसाखर एकत्र करून बनवला जातो. भूक
न लागणे, थोडे खाल्ले तरी पोट जड होणे, थोडे थोडे चिकट शौचास होणे, अधिक लाळ येणे
अशी लक्षणे असताना सुंठवड्याचा विशेष उपयोग होतो. अर्धा अर्धा चमचा दिवसातून दोन
वेळा गरम पाण्यातून घ्यावे.
डाळिंब – अम्लपित्ताच्या पेशंटचे औषध असणारे आणखी एक फळ म्हणजे डाळिंब.
डाळिंबाचे फळच नव्हे तर साल आणि मूळसुध्दा औषधी आहे. अम्लपित्ताच्या रुग्णांत
तोंडाला चव नसणे, छातीत जळजळ होणे, पोटात वायू धरणे, शरीरात रक्ताची कमतरता असणे
अशी लक्षणे असताना त्यांनी नियमितपणे डाळिंब खावे. पोटात अल्सर असताना देखील
डाळिंब उपयुक्त आहे.
डाळिंबाची वरची साल देखील औषधी आहे. डाळिंब खाल्ल्यानंतर साल टाकून न देता
उन्हात वाळवून त्याचे चूर्ण करावे. जास्त उन्हात राहिल्याने पोटात आग आणि जुलाब
होत असल्यास हे डाळिंबाच्या सालीचे चूर्ण एकेक चमचा दिवसातून तीनदा मधातून घ्यावे.
अम्लपित्त असणाऱ्या बऱ्याच रुग्णांना दातांचे आणि हिरड्यांचे आजार होतात. त्यांनी
डाळिंबाच्या सालीत थोडी तुरटी घालून त्याने दात घासण्यासाठी वापरावे. नियमितपणे
वापरल्यास हिरड्यातून रक्त येणे थांबते तसेच हिरड्या घट्ट होतात.
काळ्या मनुका – आयुर्वेदाने द्राक्षांना सर्वोत्तम फळाचा दर्जा दिलेला आहे.
त्यातही बी असलेली काळी द्राक्षे अधिक चांगली. त्यामुळे काळ्या मनुका अनेक औषधात
वापरल्या जातात. जेवणानंतर घशात जळजळ होत असेल, पोट साफ होत नसेल, अम्लपित्तामुळे
खोकला असेल अशा वेळी २० ते २५ काळ्या मनुका थोडा वेळ पाण्यात भिजवून मग खाव्यात. हल्ली
द्राक्षांवर मोठ्या प्रमाणात कीटकनाशके फवारलेली असतात म्हणून मनुका खाण्यापूर्वी
त्या दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्याव्यात. तसेच प्रत्येक मनुका खाताना
फडक्याने पुसून मग खावी. अन्न घशाशी असल्याप्रमाणे वाटणे, वारंवार तहान लागणे,
पोटात दुखणे अशी लक्षणे असताना २० ते २५ काळ्या मनुका आणि २ मोठे चमचे बडीशेप
रात्री एक ग्लास पाण्यात भिजत घालावे सकाळी दोन्ही हातांनी कुस्करून गळून हे पाणी
प्यावे.
धणे – अम्लपित्त असलेल्या रुग्णांना लघवीला आग होणे, संपूर्ण शरीरात आग होणे,
डोळ्यातून कानातून वाफा आल्यासारखे वाटणे, खूप तहान लागणे अशी लक्षणे असताना ४० ग्रॅम धने कुटून घेऊन २५० मि.लि. पाण्यात रात्री
भिजत घालावेत. सकाळी धणे हाताने कुस्करून गाळून उपाशीपोटी हे पाणी घ्यावे. या
औषधाला ‘धान्यक हिम’ असे म्हणतात.
साळीच्या लाह्या – साळीच्या लाह्या म्हणजे भाताच्या लाह्या. नागपंचमीला किंवा
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी प्रसादासाठी यांचा वापर केला जातो. पित्ताच्या अनेक
आजारांवरचे हे हुकमी औषध आहे. आयुर्वेदाने उलटी थांबवणारे सर्वोत्तम औषधाचा मान
साळीच्या लाह्यांना दिलेला आहे. त्यामुळे अम्लपित्ताच्या ज्या रुग्णांना सकाळी
ब्रश करताना आंबट पित्त पडते किंवा मळमळ होते त्यांनी सकाळी उपाशीपोटी दोन मुठ
साळीच्या लाह्या खाव्यात. लाह्या पचायला अत्यंत हलक्या असतात. तसेच कोरड्या
असल्यामुळे त्या पोटातील द्रवरूप पित्ताला शोषून घेतात. साळीच्या लाह्यांना तूप जिऱ्याची फोडणी देऊन
त्यात कढीपत्ता घालून साळीच्या लाह्यांचा चिवडा बनवता येतो. अम्लपित्ताच्या बऱ्याच
रुग्णांना अचानक पोटात खड्डा पडल्यासारखे होते, वारंवार भूक लागते बऱ्याचदा हि
खोटी भूक असते. अशा वेळी पित्तशामक आणि पचायला हलका असल्याने साळीच्या लाह्यांचा
चिवडा खाता येतो. हल्ली बाजारात साळीच्या लाह्यांचे पीठ देखील मिळते. त्यापासूनही
विविध पदार्थ बनवता येतात.
अम्लपित्त असलेल्या सर्व वाचकांची ‘मळमळ’ थांबो आणि “खऱ्या” आयुर्वेदाविषयी ‘कळकळ’
वाढीला लागो अशी सदिच्छा व्यक्त करून थांबतो. पुढच्या शुक्रवारी नवीन विषयासह
भेटूया.
© डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
आयुष आयुर्वेद क्लिनिक,
A – 5, पाम व्ह्यू, RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827
हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता शेअर करावा ही विनंती.
Very good info on Amplapitta., keep sharing the wonderfull info Dr Pushkar.
ReplyDelete