Skip to main content

आता वाजले कि बारा



मागील लेखात आपण GERD या आजाराची ओळख करून घेतली. अन्ननलिका आणि जठर यांच्या मध्ये असणाऱ्या लोअर इसोफेजियल स्फिंक्टर’ (LES) या व्हॉल्वचे कार्य बिघडल्याने जठरातील अन्न अन्ननलिकेत परत येऊन त्यामुळे त्यामुळे छातीत जळजळ, मळमळणे अशी लक्षणे निर्माण होतात ते म्हणजेच GERD. हा आजार आणि आयुर्वेदातील ‘ऊर्ध्वग अम्लपित्त’ यातील साम्यसुध्दा अभ्यासले. या लेखात आपण GERD किंवा अम्लपित्त टाळण्यासाठी काय नियम पाळले पाहिजेत हे पाहूया.

पथ्यापथ्य संकल्पना फक्त आयुर्वेदातच आहे असे नाही तर लोपथीनेसुद्धा काही विशिष्ट आजारांमध्ये पथ्यासंबंधी मार्गदर्शन केलेले आहे. पण दिवसेंदिवस हा विचार मागे पडत चालला आहे. आयुर्वेदात सांगितलेले अम्लपित्त विकाराचे पथ्य आणि आधुनिक वैद्यकात सांगितलेले GERDशी संबंधित जीवनशैलीतील बदल या दोघांचा समन्वय साधून तयार केलेले १२ नियम आपण पाहूया.

१) विशिष्ट अन्नपदार्थ खाल्ल्याने GERD किंवा अम्लपित्ताची लक्षणे वाढतात.

विरुध्द आहार – काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर ते शरीरातील दोषांना चाळवतात अशा आहाराला ‘विरुध्द आहार’ असे म्हणतात. मिल्क शेक, दुध आणि आंबट पदार्थ, खिचडी + दुध, दही + चिकन हि सर्रास केल्या जाणाऱ्या विरुध्द आहाराची काही उदाहरणे आहेत. खरे तर विरुध्द आहार हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे त्यामुळे त्यावर नंतर सविस्तर लिहेन.

आंबट पदार्थ - संत्रे, मोसंबी, लिंबू यासारखी आंबट फळे, आंबवलेले पदार्थ (इडली, डोसा, पाव, ब्रेड इ.), व्हिनेगार घातलेले पदार्थ, पाणीपुरी इ.

कच्चे पदार्थ – कांदा, काकडी, टोमॅटो यासारखे सॅलड म्हणून खाल्ले जाणारे पदार्थ विशेषतः रात्रीच्या वेळेत खाऊ नयेत. चायनीज खाताना खाल्ला जाणारा ‘फ्राईड राईस’ याचे उत्तम उदाहरण आहे. अर्धवट शिजलेला भात आणि त्यात घातलेले कांद्याची पात, कोबी, वाटाणे,   यासारखे कच्चे पदार्थ खाऊन अम्लपित्त वाढले नाही तरच नवल.    

दुध आणि दुग्धजन्य पदार्थ – अम्लपित्ताच्या काही रुग्णांना दुध प्यायल्याने तात्पुरते बरे वाटले तरी नंतर पुन्हा ॲसिडीटी होते हे अनेकदा बघायला मिळते. विशेषतः दुध आटवून केले जाणारे बासुंदी, रबडी, खवा यासारखे पदार्थ तसेच पनीर हमखास अम्लपित्त वाढवते.
याशिवाय तिखट पदार्थ, तळलेले पदार्थ, कोक पेप्सी यासारखी कार्बोनेटेड पेयं इतकेच नव्हे माऊथ फ्रेशनर म्हणून खाल्ले जाणारे च्युईंग गम, पोलो सारख्या गोळ्यांमध्ये असणाऱ्या मिंटमुळे  GERD वाढतो. काही विशिष्ट औषधे घेतल्याने सुध्दा GERDची लक्षणे वाढतात. उदा. झोपेच्या गोळ्या, विशिष्ट गर्भनिरोधक औषधी, वेदनाशामक औषधे.

२) गोड शेवट ?

कथा, कादंबरी पिक्चरपर्यंत ठीक आहे पण जेवणाचाही शेवट गोडाने व्हायला हवा का ? स्वीट डिश मस्ट आहे का ? जेवणानंतर आईस्क्रीम, गुलाबजाम, चकलेट, मिठाई अगदीच काही नाही तर गुळाचा खडा किंवा साखर खाणारी  ‘गोडगोडूली’ मंडळी काही कमी नाहीयेत. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ पचायला जड असतात म्हणून ते जेवणाच्या  सुरुवातीला खावेत. याउलट पोटभर जेवल्यावर शेवटी गोड खाणे म्हणजे टेबल आवरून घरी निघण्याच्या तयारीत असताना साहेबांनी अर्जंट कामाची फाईल आणून देण्यासारखे आहे.

जवळपास सगळ्याच गोड पदार्थात अधिक प्रमाणात फट्स असतात. अतिरिक्त फट्स असलेले पदार्थ तसेच चकलेट खाल्ल्याने LES चे प्रेशर कमी होऊन GERDच्या लक्षणांची तीव्रता वाढते असे आधुनिक विज्ञानदेखील सांगते.

३) पाणी अडवा अन्न जिरवा

जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये असे आयुर्वेद सांगतो. विशेषतः अम्लपित्त असणाऱ्या रुग्णांनी जेवत असताना मध्ये थोडे थोडे पाणी प्यावे आणि जेवण झाल्यानंतर दीड तासाने पाणी प्यावे. “पाणी अडवा पाणी जिरवा” या मोहिमेचे अपयश आपण महाराष्ट्रातल्या गावोगावी पहात असलो तरी जेवणानंतरचे पाणी पिणे अडवले तर अन्न व्यवस्थित जिरते हे मात्र नक्की.

काही जणांना जेवण झाल्यावर चहा, कॉफी घेण्याची सवय असते हे सुद्धा अत्यंत चुकीचे आहे. कॉफीमधल्या ‘कफीन’मुळे LES चे प्रेशर कमी होऊन GERDची लक्षणे वाढीस लागतात. 

४) सावकाश जेवा  

हल्ली आपण सर्वजण प्रचंड घाईत असतो. त्यामुळे चावायलासुद्धा वेळ नसतो जेवतानाही लोक अन्न कसेबसे गिळत असतात. एक घास बत्तीस वेळा चावून खावा असे आपल्याला लहानपणी शिकवले जायचे. अन्न चावल्याने त्याचे लहान लहान तुकडे होतात. त्यामुळे जठरातील सिडशी अन्नाचा अधिकाधिक पृष्ठभाग (Surface area) संपर्कात येतो ज्यामुळे अन्न सहजपणे पचण्यास मदत होते.

सावकाश या शब्दाचा अजून एक अर्थ स + अवकाश असाही होतो. अवकाश म्हणजे मोकळी जागा. सावकाश जेवणे म्हणजे पोटातील काही भाग मोकळा ठेवणे. आयुर्वेदानुसार आपल्या पोटाचे चार भाग करावेत. (काल्पनिक खरे नव्हे) त्यापैकी दोन भाग घन आहाराने भरावेत, एक भाग पाणी तसेच इतर द्रवपदार्थाने भरावा आणि एक भाग वायूसाठी मोकळा ठेवावा. जर पचायला जड पदार्थ खायचे असल्यास पोट निम्मे भरेल इतकेच खावे असे आयुर्वेद सांगतो. पुढच्या वेळी लग्नात किंवा एखाद्या पार्टीत जेवताना हा नियम नक्की लक्षात ठेवूया.

५) काम चालू रस्ता बंद

जेवताना बोलू नये किंवा हास्यविनोद करत जेवू नये. आयुर्वेदात शरीरातील वाताचे पाच प्रकार सांगितले आहेत. अन्न तोंडातून जठरापर्यंत पोचवणे हे काम ‘प्राण’ नावाचा वायु करतो. (या ठिकाणी प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन असा अर्थ अभिप्रेत नाही.) त्यामुळे प्राणवायूची गती बाहेरून आत (Periphery to Centre) अशी आहे. तर बोलण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या ‘उदान’ वायूची गती आतून बाहेर (Centre to Periphery)अशी आहे. त्यामुळे जेवताना बोलण्याची सवय असल्यास त्यामुळे जठरातील अन्न अन्ननलिकेकडे परत येण्याची शक्यता वाढते. हल्ली बऱ्याच ठिकाणी ‘लंच विथ मिटिंग’ असा प्रकार बघायला मिळतो जो आयुर्वेदानुसार अयोग्य आहे.

६) अनेकांच्या अम्लपित्ताचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे दुपारच्या जेवणानंतरची झोप. आपण बसलेलो किंवा उभे असताना गुरुत्वाकर्षणामुळे जठरातील अन्न वरच्या बाजूला असलेल्या अन्ननलिकेत परत जाऊ शकत नाही. पण आडवं पडल्यावर जठर व अन्ननलिका एकाच पातळीत आल्याने जठरातील अन्न उलटे अन्ननलिकेत येण्यास सुरुवात होते. तसेच झोपेत सर्व शरीर शिथिल होते त्यामुळे अन्ननलिका आणि जठर यांच्यामध्ये असलेल्या लोअर इसोफेजियल स्फिंक्टर (LES) चे प्रेशर कमी होऊन जठरातील अन्न सहजपणे अन्ननलिकेत येते.

यावर बरेच जण आयुर्वेदाने जेवल्यानंतर ‘वामकुक्षी’ घ्यावी असे सांगितले असा आक्षेप घेतील. वामकुक्षी म्हणजे जेवणानंतर १५ ते २० मिनिटे डाव्या कुशीवर पडून राहणे. पण कित्येकांची वामकुक्षी २ - २  तास उलटले तरी संपत नाही. जेवून झोपायचे असल्यास जेवण आणि झोप यात कमीत कमी तीन तासाचे अंतर असावे.



काही अपरिहार्य कारणामुळे दिवसा झोपणे आवश्यक असल्यास आडवे न होता आरामखुर्ची बसतो त्याप्रमाणे बसल्या बसल्या झोप घ्यावी. असे प्रक्टिकल सोल्युशन आयुर्वेद सांगतो.

आधुनिक वैद्यकशास्रात देखील GERDच्या रुग्णांनी बेडच्या पायाखाली विटा ठेवून डोक्याकडील बाजू पायाकडील बाजूपेक्षा ६ इंच वर उचलावी असा सल्ला दिला जातो. हल्ली खास GERDच्या रुग्णांसाठी बनवलेल्या उश्या आज बाजारात उपलब्ध आहेत. पण त्या उगाचच खूप महाग आहेत. त्यापेक्षा बेडच्या डोक्याकडील बाजू विटा ठेवून वर उचलणे हा कितीतरी स्वस्त आणि सोपा पर्याय आहे.

७) धुम्रपान आणि मद्यपान हि दोन्ही व्यसने GERD वाढवण्यास कारणीभूत ठरतात. विशेषतः तंबाखूमध्ये असणाऱ्या निकोटिनमुळे LESचे प्रेशर कमी होते आणि GERD ची लक्षणे वाढतात. म्हणून धुम्रपान आणि मद्यपान दोन्ही टाळणे आवश्यक आहे.


८) अनेक रुग्णांमध्ये वजन वाढल्यानंतर GERD ची लक्षणे दिसू लागतात. 



वजन वाढते तेव्हा पोटावरील चरबीचे प्रमाण वाढते आणि या चरबीमुळे निर्माण होणारा अतिरिक्त दाब जठरावर पडतो आणि त्यामुळे जठरातील अन्न उलट येण्यास सुरुवात होते. याबरोबर कधीकधी पोटाच्या आतील भागात दाब वाढल्यामुळे जठराचा काही भाग पोटातून छातीच्या भागात जातो. या प्रकाराला Hiatus Hernia असे म्हणतात. त्यामुळे वजन जास्त असल्यास ते कमी करणे आवश्यक आहे.

९) याप्रमाणे तंग (टाईट) कपडे घातल्यामुळे पोटावर अतिरिक्त ताण पडतो. म्हणून स्लिम फीट, पेन्सिल फीट, जिन्स यासारखे कपडे शक्यतो घालू नयेत.

१०) सतत पित्ताचा त्रास होतो म्हणून रोज सकाळी घशात बोटे घालून किंवा पाणी पिऊन उलट्या काढण्याची सवय अनेक जणांना असते. असे करणे चूक आहे कारण अशा पद्धतीने उलटी काढताना जठरातील सिड अन्ननलिकेत येते आणि अम्लपित्ताची लक्षणे वाढीस लागतात.

११) आयुर्वेदानुसार अम्लपित्ताचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ब्रेकफास्ट केल्यानंतर आंघोळ करणे. आयुर्वेदानुसार भरल्या पोटी आंघोळ केल्यास शरीरातील दोषांची गती बदलते आणि त्यामुळे विविध आजार निर्माण होतात. माझ्या कित्येक रुग्णांचे अम्लपित्त फक्त हि एक सवय बदलल्याने बरे झालेले आहे.

१२) काही जण जेवून किंवा ब्रेकफास्ट करून जिममध्ये जातात. ही गोष्ट अम्लपित्तच नव्हे तर आमवातासारखे अनेक आजार वाढवण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे व्यायाम उपाशीपोटीच करावा. सायंकाळी व्यायाम करायचा असल्यास दुपारच्या जेवण व व्यायाम यात किमान ४ तासाचे अंतर असावे.

हे बारा नियम पाळले तर अम्लपित्ताचे ‘बारा वाजलेच’ म्हणून समजा. सध्याच्या काळात दिसणारे बहुतांश आजार जीवनशैलीतील बदलामुळे निर्माण झालेले आहेत म्हणून जीवनशैलीत योग्य ते बदल करणे औषधी उपचारांइतकेच महत्त्वाचे आहे. नवीन वर्ष आपल्या सर्वांना आनंदाचे आणि आरोग्यपूर्ण जावो !

© डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
आयुष आयुर्वेद क्लिनिक,
A – 5, पाम व्ह्यू, RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827

हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता शेअर करावा ही विनंती.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Ayush Digestive Solutions Presents Certificate course in Ayurvedic Gastroenterology “Unique opportunity to sharpen your clinical skills in Ayurvedic Gastroenterology” Syllabus ·          History taking & general considerations in Gastroenterology (Ayurvedic & Modern) ·          Oral diseases – Modern diagnostic skills & Ayurvedic treatment approach ·          अम्लपित्त GERD & Beyond  - Detailed samprapti, treatment plan, dietary restrictions ·          Irritable Bowel Syndrome (IBS) – Bread & butter for Ayurvedic physician ·          Inflammatory Bowel Disorders  (Crohn’s disease, Ulcerative colitis) ·          Gall stones – What are strengths & weakness of Ayurvedic treatment ·...
आपली तुपली गोष्ट गेल्या आठवड्यात तरुणांमधील वाढत्या आत्महत्या या विषयावर लिहिलेल्या “शब्दावाचून अडले सारे” या पोस्टला भरभरून प्रतिसाद मिळाला. या आठवड्यात याच विषयाशी संबंधित एका निराळ्या पैलूवर प्रकाश टाकणार आहे. इंटरनेट आणि सोशियल मिडियाची आभासी दुनिया आजच्या तरुणाईला कशी जीवघेणी ठरतेय हे आपण पाहिले. आपण घेत असलेला आहार आपल्या मनावर परिणाम करत असतो. गेल्या ५० वर्षात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी खूप मोठ्या प्रमाणात बदलल्या. हा बदल आपल्या विचारांवर कसा प्रभाव टाकतोय याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. तत्पूर्वी पहिल्यांदा आपण मेंदू या अवयवाची ओळख करून घेऊ. मेंदू – मेंदूला मुंग्या आणणारा अवयव एका वयस्क व्यक्तीच्या मेंदूचे वजन सुमारे १४०० ग्र ॅ म असते. मेंदूमध्ये सुमारे १०००० कोटी चेतापेशी (न्युर ॉ न्स) असतात. सेकंदाला एक या गतीने आपण हे न्युर ॉ न मोजायला सुरुवात केली तर फक्त एका मेंदूतील न्युर ॉ न मोजण्यासाठी ३१७१ वर्ष लागतील. प्रत्येक न्युर ॉ न सुमारे १०००० इतर न्युर ॉ न्सशी जोडलेला असतो. माणसाच्या मेंदूचं वजन शरीराच्या फक्त २.५ % असूनही हृदयातून बाहेर पडणाऱ्या रक्तापै...
‘मंथ’ for the month शिक्षणविश्वातील ‘ग्लोबल वॉ र्मिंग’ शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याला जाऊन विचारा त्याचा किंवा तिचा ‘नावडता’ महिना कोणता ? ९०% जण ‘मार्च’ हे उत्तर देतील. कारण मार्च हा परीक्षेचा महिना. (उरलेल्या १०% लोकांना ऑक्टोबरसुध्दा आवडत नाही.) थंडी संपत आल्याने उन्हाचा ताप वाढत असतो आणि सोबत हा परीक्षेचा ताप सुरु होतो. मग वर्षभर ‘विषयांपासून लांब’ राहिलेले विद्यार्थी अभ्यास ‘सिरीयसली’ घ्यायला लागतात. त्यातूनच सुरु होतात जागरणं आणि ‘जागता पहारा’ देण्यासाठी मदत करणारे चहा, कॉफीसारखे पेय. भरीस भर म्हणून परीक्षेचे पेपरही दुपारच्या वेळेतच असतात. आधीच वाढलेल्या उष्णतेत हे उन्हातून जाणं येणं अजून तापदायक ठरतं. वरील सर्व कारणांमुळे शरीरात उष्णता आणि कोरडेपणा वाढतो म्हणजेच आयुर्वेदाच्या भाषेत वात आणि पित्त दोष वाढतात. त्याचे परिणाम शरीर व मनावर दिसायला लागतात. वेळेवर भूक न लागणे, तोंड येणे, पोटात आग होणे, डोळे चुरचुरणे, डोळ्यांची आग होणे, हातपाय गरम वाटणे, ताप आल्यासारखे वाटणे, दिवसा झोप येणे, उत्साह न वाटणे, चिडचिड होणे, अभ्यासावर ‘फोकस’ करता न ये...