डॅडी कूल कूल कूल
शाहरुख खान आणि अनुपम खेर यांचा ‘चाहत’ नावाचा पिक्चर तुमच्यापैकी किती जणांनी
पाहिलाय ? पाहिला नसेल तर तुम्ही नशीबवान आहात कारण आवर्जून पहावं अस त्यात काहीही
नाही. याच भिकार चित्रपटात “डॅडी कूल कूल कूल” असे एक टुकार गाणे आहे. पण मध्यमवर्गीय मराठी माणसाला ‘टाकाऊतून
टिकाऊ’ शोधण्याचे इतके आकर्षण असते कि मी या गाण्यातून आयुर्वेदाचा एक सिद्धांत
शोधून काढलाय त्यावरचा हा लेख.
अरे बाप रे
“मै तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हूँ” हे आम्हाला बॉलीवूडने इतक्या वेळा ऐकवले कि आई बाप होणे म्हणजे बाजारातून भाजी
आणण्याइतकी सोपी गोष्ट वाटायचे. पण वास्तव मात्र अत्यंत गंभीर आहे.
१९४० च्या
दशकात पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणूंची संख्या १४० दशलक्ष/मिली इतकी होती. १९५० च्या
दशकात हे प्रमाण १२० दशलक्ष/मिली इतके झाले पुढे ९० च्या दशकात हे प्रमाण ६०
दशलक्ष/मिली इतके कमी झाले. याचा सरळसरळ अर्थ असा होतो कि १९४० ते १९९० या ५०
वर्षात पुरुषांची प्रजननक्षमता ५० %ने कमी झाली. नवीन शतकात तरी हि घसरण
अधिक वेगाने होऊ लागली. १९७३ ते २०११ या कालावधीत जगभरातील वेगवेगळ्या १८५ ठिकाणी
सुमारे ४३,००० पुरुषांच्या वीर्याचे परीक्षण केले गेले. २०१५ मध्ये त्याचे
निष्कर्ष हाती आले. त्यातून असे लक्षात आले कि १९७३ मध्ये पुरुषांमधल्या
शुक्राणूंची संख्या ९९ दशलक्ष/ मिली होती ती २०११ मध्ये ४७ दशलक्ष/ मिली इतकी खाली
घसरली. चिंतेत भर घालणारी बाब म्हणजे वीर्यातील प्रति मिली शुक्राणूंची संख्या
घटते आहेच पण स्खलनाच्या वेळी बाहेर टाकल्या जाणाऱ्या वीर्याचे प्रमाणही घटते आहे. म्हणजे जर १९५० साली एका
वेळी पुरुषाच्या शरीराबाहेर साधारणतः ४ मिली इतके वीर्य टाकले जात असे तर त्यात
१२० दशलक्ष × ४ म्हणजे साधारणपणे ४८०
दशलक्ष शुक्राणू असत. आता वीर्याच्या प्रमाणातही घट आल्याने सध्याचे पुरुष साधारण
२ ते ३ मिली वीर्य बाहेर टाकतात. त्यात प्रति मिली ५० दशलक्ष म्हणजे जास्तीत जास्त
१५० दशलक्ष इतकेच शुक्राणू असतात.
यासोबतच पुरुषत्वासाठी कारणीभूत असणारे टेस्टेस्टीरोन (Testesterone) हे
हार्मोनसुध्दा कमी होत चालले आहे. यासोबतच वृषणाच्या कॅन्सरचे रुग्णही दिवसेंदिवस
वाढत आहेत. हि परिस्थिती अशीच चालू राहिल्यास हे शतक संपता संपता पुरुषांमधील
शुक्राणू इतके कमी होतील कि नैसर्गिकरीत्या मुले होणे हि गोष्ट इतिहासजमा होऊन
फक्त IVF (टेस्ट ट्यूब बेबी) द्वारेच प्रजनन शक्य होईल अशी भीती या क्षेत्रातील
तज्ञ व्यक्त करतात. असे जर खरेच झाले तर ज्यांच्याकडे IVF साठी पैसे नाहीत त्यांनी
काय करायचे ? थोडक्यात परिस्थिती अरे बाप रे ! म्हणायला लावेल इतकी गंभीर आहे.
हे घडतंय खरं पण याचे कारण काय ? हा प्रश्न शास्रज्ञांना सतावू लागला. बदललेली जीवनशैली,
ताणतणाव, स्थौल्य हि तर आजकाल दिसणाऱ्या सर्वच आजारांची कारणं आहेत. त्यामुळे त्यापेक्षा
वेगळी काही महत्त्वाची कारणे आपण थोडक्यात पाहूया.
Endocrine Disruptor
विसाव्या शतकाच्या सुरवातीला युरोपमध्ये औद्यौगिक क्रांतीला सुरुवात झाली. याच
सुमारास पेट्रोल, डिझेलचा वाढत्या वापर औद्यौगिक चक्राला गतिमान करण्यास कारणीभूत
झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर तर जगभर प्रचंड उलथापालथ झाली. रसायनशास्रातील
प्रगतीमुळे अत्यंत कमी कालावधीत अनेक नवीन केमिकल्स जन्माला आले. ज्यांचा अगोदर माणसाशी
कधीही संपर्क आलेला नव्हता. या केमिकल्सचा शरीरातील हार्मोन्सवर विपरीत परिणाम
दिसू लागला. शरीरातील हार्मोन्सवर दुष्परिणाम दाखवणाऱ्या या केमिकल्सना
शास्रज्ञांनी Endocrine Disruptor नाव दिले. यामध्ये ‘थॅलेट’ नावाचे केमिकल सर्वात त्रासदायक समजले जाते. प्लॅस्टिक बनवत असताना त्याला मऊपणा आणि लवचिकता यावा यासाठी थॅलेटचा वापर होतो. तर प्लॅस्टिकचे काठीण्य वाढवण्यासाठी बिस्फेनोल ए (BSA) नावाचे
केमिकल वापरतात. याचा अर्थ जर दैनंदिन वापरात तुमचा प्लॅस्टिकशी संबंध येत असेल तर तुमच्या शरीरात थॅलेटचे आणि BSAचे अंश असणार. ही दोन्ही केमिकल स्त्रियांच्या
शरीरात असणाऱ्या ईस्ट्रोजेन हार्मोन सारखी आहेत. त्यामुळे पुरुषांचा यांच्याशी
संपर्क आल्यास त्यांच्या शरीरात टेस्टोस्टीरोन कमी प्रमाणात तयार होते. प्लॅस्टिकच्या वापरात पाश्चात्य देश आपल्यापेक्षा
खूप पुढे आहेत. म्हणूनच तिथे पुरुषांमधील शुक्राणू अधिक लवकर कमी होत आहेत.
म्हणूनच प्लॅस्टिकच्या वापरावर कडक
निर्बंध घालावेत असे शास्रज्ञ सांगत आहेत. पण जागतिक पातळीवर प्लॅस्टिक निर्मात्यांची लॉबी खूप मजबूत असल्याने
त्याविरुध्द कुठलीही ठोस कारवाई होत नाही. महाराष्ट्रातही प्लॅस्टिकबंदीचे काय झाले ते आपण पाहतच आहोत.
व्यसन
व्यसन आणि त्याला मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा हा एक अत्यंत चिंतेचा विषय आहे.
दारू, सिगरेट, तंबाखू यासोबतच तरुणाईला पडत चाललेला ड्रग्जचा विळखा सर्वच
संवेदनांना बधीर करत चाललाय. काही दशकांपूर्वी स्रिया घराची चौकट ओलांडून बाहेर
पडल्या आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक कार्यक्षेत्रात आपला ठसा उमटवू
लागल्या. आजची तरुणी मात्र पुरुषांच्या ग्लासला ग्लास भिडवताना दिसतेय. स्री पुरुष
समानतेचे निराळेच वारे वाहू लागलेत. रिसर्चनुसार ज्या एखादी स्त्री धुम्रपान करत
असेल तर भविष्यात तिला होणाऱ्या बाळाच्या शुक्राणूंची संख्या कमी होते.
ग्लोबल वार्मिंग
शरीरातील सर्व महत्त्वाच्या अवयवांना निसर्गाने सुरक्षा प्रदान केलेली आहे.
उदा. मेंदूसाठी कवटी, हृदय व फुफ्फुसाकरिता छातीचा पिंजरा. पण पुरुषांमध्ये
वृषाणासारखा अत्यंत महत्त्वाचा अवयव शरीराबाहेर कसा ? याचे कारण शुक्राणू तयार
होण्यासाठी शरीराच्या तापमानापेक्षा साधारण ४ अंश सेल्सिअस कमी तापमान आवश्यक असते
म्हणूनच वृषण शरीराच्या बाहेरील बाजूस असते. आयुर्वेदानेसुद्धा शुक्र हा शरीरघटक
सौम्य म्हणजेच थंड स्वभावाचा आहे असे सांगितले आहे. म्हणजेच तापमान आणि
शुक्राणूंची उत्पत्ती यांचा जवळचा संबंध आहे.
१९७०पासून २०१०पर्यंत शुक्राणूंची
संख्या ९९ दशलक्ष ते ४७ दशलक्ष इतकी कमी झाली हे आपण पहिले. नासा (NASA) या संस्थेच्या
म्हणण्यानुसार याच काळात जगाचे तापमान सुमारे १° सेल्सिअसने वाढले. आता तुम्ही म्हणाल, एक डिग्रीने एवढा काय फरक पडतोय ?
१९९८ पासून २०१२पर्यंत वाढलेली उष्णता साधारणपणे हिरोशिमातल्या अणुबॉम्बसारख्या २७८ कोटी बॉम्बच्या उष्णतेइतकी
आहे. यावरून ग्लोबल वार्मिंगचा धोका मनुष्यजातीच्या मुळावर आघात करणारा आहे हे
लक्षात येईल.
बदललेली वेशभूषा
हल्ली खूप तंग कपडे घालण्याची फॅशन आहे. स्लिम फीट, पेन्सिल
फीट याची चलती आहे. पण हे सगळे कपडे आरोग्याच्या दृष्टीने मात्र ‘मिस फीट’ ठरतात. अशा
प्रकारचे अत्यंत घट्ट कपडे घातल्याने वृषणावर (Testicles) दाब पडून त्यांना इजा होण्याचा संभव असतो. सतत
जीन्स घातल्यामुळे या भागातील तापमान वाढते त्यामुळे शुक्राणू निर्मितीच्या
प्रक्रियेस बाधा पोचू शकते. टाईट जीन्स हल्ली पुरुषांमधील वाढत्या वंध्यत्वामागचे
महत्त्वाचे कारण आहे.
नमकीन सच
अमेरिकेतील काही शास्रज्ञांच्या मते आयोडीनयुक्त मीठाचे सेवन आणि पुरुषातील
वंध्यत्व यांचा जवळचा संबंध आहे. शरीरातील आयोडीनचे प्रमाण वाढल्यास वृषणांचा आकार
कमी होतो असा निष्कर्ष त्यांनी उंदरांवर केलेल्या प्रयोगातून काढलेला आहे.
आयुर्वेदाने मीठ असलेले पदार्थ अतिरिक्त प्रमाणात खाणे हे शरीरातील शुक्राकरिता
मारक आहे असे स्पष्ट सांगितले आहे, याचे कारणही उष्णतेशी संबंधित आहे. कारण आयुर्वेदानुसार
खारट पदार्थ तिखट आणि आंबट पदार्थांपेक्षासुध्दा अधिक उष्ण असतात.
विरुध्द आहार
अम्लपित्तावर लिहिताना याचा उल्लेख केला होता. काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर ते शरीरातील दोषांना चाळवतात अशा आहाराला
‘विरुध्द आहार’ असे म्हणतात. मिल्क शेक, दुध आणि आंबट पदार्थ, खिचडी + दुध, दही + चिकन
हि सर्रास केल्या जाणाऱ्या विरुध्द आहाराची काही उदाहरणे आहेत. सातत्याने विरुध्द
आहार घेतल्याने कोणकोणते आजार होतात हे सांगताना चरकांनी सर्वप्रथम “षंढता” या
आजाराचा उल्लेख केलेला आहे.
डॅडी कूल कूल कूल
फक्त प्रश्नांवर अडकून न राहता उपाय सांगणे हे वैद्यकशास्राचे कर्तव्य आहे. गेल्या
दोन हजार वर्षांपासून 'वाजीकरण' ही आयुर्वेदीय स्पेशालिटी प्रॅक्टिस जगासमोर आहे. आयुर्वेदानुसार प्रजोत्पादनासाठी
पुरुषांमध्ये शुक्र तर स्त्रियांमध्ये आर्तव (स्त्रीबीज) हा शरीराघटक प्राकृत असणे
आवश्यक असते. शुक्र थंड तर आर्तव उष्ण प्रवृत्तीचे असते. त्यामुळे पुरुषांच्या
शरीरातील उष्णता कमी केल्यास त्यांच्यातील वंध्यत्वाची चिकित्सा करता येणे शक्य
आहे. यासाठी पंचकर्म चिकित्सेची मदत घ्यावी लागते विशेषतः विरेचन चिकित्सेचा उत्तम
उपयोग होतो. विरेचनाने शरीरातील उष्णता बाहेर पडल्यानंतर शुक्र वाढवणारे, पोषण
करणारे बस्ती रुग्णाला दिले जातात. यासोबतच शरीरातील उष्णता नष्ट करणारी, शुक्र वाढवणारी,
शुक्रातील दोष नष्ट करणारी, शरीरात स्निग्धता निर्माण करणारी, मन प्रफुल्लित
करणारी औषधे वापरली जातात. प्राधान्याने गोड चवीची हि औषधे दुध आणि तुपामधून सिद्ध
करून दिली जातात. IVF अर्थात टेस्ट ट्यूब बेबी करण्यापूर्वी देखील पंचकर्माने
शरीरशुद्धी आणि शुक्रवर्धक औषधी घेतल्याने IVF च्या सक्सेसचे प्रमाण वाढते असा
आमचा अनुभव आहे. त्यामुळेच यापुढे ज्यांना ‘डॅडी’ व्हायचे आहे त्यांनी पहिल्यांदा आयुर्वेदाच्या मदतीने
‘कूल’ व्हावे म्हणजे ‘फूल’ (Fool) होण्याची पाळी न येता संसारवेलीवर सुंदर ‘फुल’
उमलेल. पुढच्या शुक्रवारी नवीन विषयासह भेटूया.
© डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
आयुष आयुर्वेद क्लिनिक,
A – 5, पाम व्ह्यू, RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827
हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता शेअर करावा ही विनंती.
Comments
Post a Comment