टेस्टिंग टाईम अहेड ?
पुरुष वंध्यत्व या विषयावरील “डॅडी कूल कूल कूल” या लेखाला उत्तम प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सर्वांचे आभार.
वंध्यत्वाचे प्रमाण असेच वाढत राहिले तर हे शतक संपता संपता कदाचित मूल होण्यासाठी
फक्त टेस्ट ट्यूब बेबी हा एकमेव पर्याय शिल्लक राहिल अशी शक्यता त्या लेखामध्ये वर्तवली
होती. सर्वसामान्य भाषेत टेस्ट ट्यूब म्हटल्या जाणाऱ्या या तंत्राचे शास्रीय नाव In Vitro Fertilization (IVF) असे आहे. दरम्यान ‘Politics of the Womb’ (गर्भाशयाचे
राजकारण) या नावाचे पिंकी विराणी या लेखिकेने लिहिलेले पुस्तक हातात आले. IVF
तंत्रामध्ये असणारे धोके समजावून सांगणारे तसेच प्रजनन तंत्रातील सत्यावर प्रकाश
टाकणारे हे पुस्तक आहे. उपरोक्त पुस्तकात मांडलेले विचार शास्रीय संदर्भांसहित
मांडलेले असल्यामुळे या पुस्तकाचा आधार घेऊन हे लिखाण करत आहे.
कसं करतात IVF ?
सर्वप्रथम आपण IVF प्रक्रिया थोडक्यात समजावून घेऊ. पुरुषाचे शुक्राणू आणि
स्त्रीचे अंडे एका निर्जंतुक काचेच्या ताटलीत (पेट्री डिश) एकत्र केले जाते. हे
मिलन यशस्वी ठरले तर त्या फलित अंड्याचं (Zygote) स्रीच्या गर्भाशयामध्ये रोपण
केलं जातं. तिथून ते गर्भामध्ये रूपांतर होऊन त्याचा प्रवास प्रत्यक्ष जन्मापर्यंत
होतो.
फक्त शुक्राणू आणि अंडी एकत्र केले कि झाले; इतकी ही प्रक्रिया सोपी नसते.
निसर्गनियमाप्रमाणे पाळी येणाऱ्या स्त्रीच्या शरीरात प्रत्येक महिन्याला एक अंड
विकसित होते. IVF करताना मात्र मोठ्या प्रमाणात तीव्र औषधे देऊन एका वेळी अनेक
अंडी विकसित केली जातात याचे स्त्रीच्या शरीरावर अनेक विपरीत परिणाम होतात. लवकरात
लवकर यशस्वी मिलन व्हावे यासाठीही त्यात रसायनं घातली जातात. तसेच फलित अंडे
स्त्रीच्या शरीरात सोडताना ते तिच्या शरीराने स्वीकारावे म्हणून त्यासोबत मोठ्या
प्रमाणात कृत्रिम संप्रेरके शरीरात सोडावी लागतात. स्त्रीच्या शरीराने ते अंड
स्वीकारावं म्हणून इतकी सगळी फिल्डिंग लावली जाते. पण बहुतांश वेळा शरीर बाहेर
फलित झालेल्या अंड्याला विरोध करते आणि रक्तस्राव होतो. याला गर्भपात (Miscarriage) म्हटले जाते पण स्त्री शरीराच्या
दृष्टीने मासिक पाळी असते आणि हि स्वाभाविक प्रतिक्रिया असते. म्हणूनच पुन्हा पुन्हा
IVF करत राहावं लागतं. यशाचा टक्का वाढण्यासाठी एका वेळी गर्भाशयात दोन किंवा तीन
फलित अंडी सुध्दा सोडली जातात.
सुरवातीला फक्त गर्भाशयाच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या फॅलोपियन ट्यूब नावाच्या नलिकांमध्ये अडथळे असल्याने निर्माण
होणाऱ्या वंध्यत्वासाठी (Tubal Blockage) IVF वापरले जात असे. ब्रिटनमध्ये
वंध्यत्वाच्या क्षेत्रात ४० वर्ष मोलाची कामगिरी बजावणाऱ्या डॉ. रॉबर्ट विन्स्टन
यांच्या म्हणण्याप्रमाणे फॅलोपियन ट्यूब मधील बिघाड ऑपरेशनसुध्दा दुरुस्त होणे शक्य नसेल तर IVF करावे.
तसेच एन्डोमेट्रीओसिस या आजारामुळे गर्भाशयाच्या
तोंडाशी (Cervix) त्रास उद्भवत असेल तर IVF करावे लागते. पुरुषाचे शुक्राणू खूपच कमी असतील किंवा
जोडप्याला प्रजनन करण्यात एकाहून अधिक समस्या असतील तर IVF करावे. पण उठसूठ
कुठल्याही छोट्या कारणासाठी IVF करणे निरर्थक आणि गैरवाजवी आहे.
जमाखर्च IVFचा
लॅन्सेट या जगप्रसिध्द तसेच
वैद्यकशास्रातील सर्वात जुन्या जर्नलनुसार ४० – ४५ या वयोगटातील स्त्रियांवर IVF
प्रक्रिया केल्यास साधारणतः फक्त १३.६ % प्रक्रियात यश येते. तर ४५ च्या वरील स्त्रियांमध्ये
तर यशाचे प्रमाण जेमतेम १.९ % इतके नगण्य आहे. डॉ. विन्स्टन यांच्या मते कोणत्याही
वयाच्या स्त्री मध्ये IVF यशस्वी होण्याचे प्रमाण साधारण २५ % इतके आहे. त्यापुढे
ते असं हि म्हणतात कि “लोक फार घाईघाईनं IVF चा पर्याय निवडतात. वंध्यत्व दूर
करण्याचे त्यापेक्षाही कैक स्वस्त आणि सोपे उपाय आहेत, पण लोक त्याकडे वळत नाहीत
किंवा त्यांना त्यांची माहिती करून दिली जात नाही. खरं तर IVF हा शेवटचा पर्याय
असला पाहिजे. लगेच IVF करणं म्हणजे छातीत दुखते म्हणून बायपास करण्यासारखं आहे.
इतकी वर्ष या क्षेत्रात काम करून उपचारासाठी येणाऱ्या लोकांचा हताशपणा अनुभवून आज
जे IVF चे बाजारीकरण झाले आहे ते पाहून मला फार वाईट वाटतं.” पुढे ते असही म्हणतात
वंध्यत्वामागे नेमके काय कारण आहे ? त्यासाठी स्वस्तातले इतर उपाय आहेत का ? हे पडताळून
तरीही यश येत नसेल तरच IVF ची कास धरावी. कारण IVF मध्ये ७५ % वेळा अपयशच पदरी
पडते.
सावध हरिणी सावध
अगोदर असे सांगितले जात असे कि IVFच्या सहाय्याने कोणत्याही
वयात आई वडील बनणे शक्य आहे. पण अगोदर पाहिल्याप्रमाणे चाळीशीनंतर IVFमध्ये यश
मिळण्याचे प्रमाण नगण्य असते. म्हणूनच आता स्त्रियांसाठी ३१ आणि पुरुषांसाठी ३५ हे वय IVF ला सुरुवात
करण्यास आदर्श मानलं जातं. आता हल्ली लग्नच तिशीत होतायेत तेव्हा हे गणित कसं
जमवायचं ? लवकर सुरुवात करणं देखील धोकादायक आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न
ऑस्ट्रेलिया’ने केलेल्या अभ्यासानुसार २० व्या वर्षी IVF सुरु करणाऱ्या
स्त्रियांमध्ये पुढील १५ वर्षात स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. २४
वर्षी सुरुवात करणाऱ्या स्त्रीमध्ये हि शक्यता दीड पट अधिक असते. याच अभ्यासात
असं देखील म्हटलंय पहिलं मूल व्हायला वयाची पस्तीशी उलटली तर स्तनाचा कॅन्सर
होण्याची शक्यता दुप्पट असते.
‘युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन’मधल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ चाईल्ड
हेल्थ’मध्ये कार्यरत असलेल्या वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासानुसार IVF करवून
घेतलेल्या स्त्रियांमध्ये अंडाशयाचा (Ovary) कॅन्सर होण्याची शक्यता सामान्य
स्त्रियांपेक्षा खूप अधिक असते. ‘स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी’तील संशोधकांनी २००४ ते
२०१२ या काळात केल्या गेलेल्या ६,५८,५१९ IVF प्रक्रियांचा अभ्यास करून सांगितले कि
IVF करताना वापरल्या जाणाऱ्या FSH (Follicle Stimulating Hormone) ची मात्रा
अधिक दिल्यास मूल जिवंत जन्माला येण्याचं प्रमाण कमी होऊ लागतं. म्हणून
फर्टीलिटी क्लिनिक्सने FSH ची तीव्र मात्रा देण्याचे टाळले पाहिजे असा सल्ला
त्यांनी दिलाय.
टेस्ट फॉर लाईफ टाईम ?
केवळ IVF करवून घेणाऱ्या स्त्रीला धोका असतो असे नाही तर या प्रक्रियेद्वारे
जन्माला येणाऱ्या बाळानाही अनेक संकटाना तोंड द्यावे लागू शकते. जेव्हा नैसर्गिक
पद्धतीने गर्भधारणा होते तेव्हा तो गर्भ स्वीकारायचा किंवा नाही हा निर्णय
स्त्रीचे शरीर स्वतः घेत असते. याला ‘नॅचरल सिलेक्शन’ असे म्हणतात. IVF करताना प्रयोगशाळेत तयार झालेला गर्भ
स्त्रीच्या गर्भाशयाने नाकारू नये म्हणून तिला मोठ्या प्रमाणात कृत्रिम संप्रेरके
दिली जातात. यात शरीराची ‘नॅचरल सिलेक्शन’ प्रक्रिया बायपास होत असल्याने IVFद्वारे होणाऱ्या बालकांना
जन्मजात आजार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.
डॉ. ट्रेव्हर स्टॅलिन हे लंडनच्या सेंट मेरी
युनिव्हर्सिटीत जैविक नितीशास्र आणि वैद्यकीय कायदा याचे प्रोग्रॅम डायरेक्टर
आहेत. ते आणि इतर काही डॉक्टरांनी २०१२ मध्ये IVF आणि संबंधित आजार यावर
लिहिलेल्या एका अहवालात अस म्हटलंय कि IVF प्रक्रियेने जन्माला येणाऱ्या
बालकांमध्ये जन्मजात विकृती (Congenital
Anomaly) असण्याचे प्रमाण सुमारे ४० % अधिक आहे. जगातील
३० – ४० % जन्मजात विकृती (Congenital
Anomaly) फोफावण्याचा संबंध थेट IVFशी जोडला जाऊ शकतो. कित्येक पाहण्यांमधून असं लक्षात आलाय कि आई वडीलांचं वंध्यत्व हे IVFद्वारे
जन्माला येणाऱ्या बाळामध्ये विकार होण्याचं महत्त्वाच कारण आहे. म्हणजेच IVF च्या
अट्टाहासापायी आपण एका निरागस जीवाला विकारग्रस्त म्हणून जन्माला घालायचं का ?
कोपनहेगनमधील “डॅनिश कॅन्सर सोसायटी”च्या
संशोधन केंद्रात डॉ. मारी हारग्रीव्ह यांनी केलेल्या पाहणीत म्हटल आहे कि ‘आम्ही
२०१५ मध्ये केलेल्या पाहणीनुसार स्त्री गरोदर राहावी यासाठी तिला दिल्या
जाणाऱ्या एका विशिष्ट संप्रेरकामुळे तिला होणाऱ्या बाळाला कॅन्सर होण्याची शक्यता ५
– १० पटींनी वाढते.’
‘रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स ॲण्ड गायनेकोलॉजिस्ट’ मधून
प्रजनन तंत्राचे विशेष प्रशिक्षण घेतलेल्या डॉ. गीता नारगुंड यांच्या मते
आक्रमकपणे कृत्रिम संप्रेरके वापरून IVF केल्यावर होणाऱ्या बाळाच्या
गुणसुत्रांमध्ये (DNA) विकृती निर्माण होते त्यामुळे बाळाला अनेक
जन्मजात विकृती होण्याची दाट शक्यता असते. जॅक्सन आणि अन्य यांनी १९७८ ते २००२ पर्यंत प्रसिध्द झालेल्या
अहवालांची पाहणी करून IVFव्दारा जन्मलेल्या १२,२८३ बाळांचा आणि नैसर्गिकपणे
जन्मलेल्या १.९ लाख बाळांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला कि IVF द्वारे
जन्मलेल्या बाळांत अपुऱ्या महिन्यांची प्रसूती होणे, जन्मतः बाळाच वजन कमी असणे,
गर्भधारणेच्या वयाच्या तुलनेत बाळाचा आकार लहान असणे, मृत प्रसूती होणे, जन्मजात
विकृती असणे या समस्या असण्याची शक्यता खूप जास्त असते. IVF द्वारे जन्मलेल्या
दीड वर्ष ते १४ वर्ष वयाच्या ५,६८० मुलांच्या मेंदूच्या वाढीचा आणि मज्जासंस्थेच्या
समस्यांचा अभ्यास केला. त्याची तुलना नैसर्गिकरीत्या जन्मलेल्या ११,३६० मुलांशी
केली. सेरेब्रल पाल्सी आणि मेंदूचा विकास कमी गतीनं होण या समस्याच प्रमाण IVF
द्वारे जन्मलेल्या मुलांमध्ये तुलनेने अधिक दिसून आले. ICSI या तंत्रज्ञानाच्या
सहाय्याने जन्मलेल्या मुलांचा IQ ७० च्या खाली असण्याची शक्यता ५१% अधिक असते. IVF
झालेल्या मुलांना बालपणात कॅन्सर होण्याची शक्यता ३३% अधिक असते. ल्युकेमिया
हा रक्ताशी संबंधित कॅन्सर होण्याची शक्यता ६५% अधिक असते. तर मेंदू आणि
मज्जासंस्थेचा कॅन्सर होण्याची शक्यता ८८% जास्त असते.
लोकसंख्यावाढीचे दुष्परिणाम लक्षात आल्यावर प्रत्येक कुटुंबाला एकच मूल
जन्माला घालता येईल असा कायदा चीनने केला होता. कालांतराने चायना सरकारने एका ऐवजी
दोन मुलं होऊ देण्याची परवानगी दिली. भारताप्रमाणे चीनमध्ये देखील मुलगा होणे
प्रतिष्ठेचे मानले जाते. तेव्हा ज्यांची वयं जास्त आहेत अशा जोडप्यांनी IVFद्वारे
हवी तशी मुलं जन्माला घालायला सुरुवात केली. सध्या चीनमधील मुलगे आणि मुली यांचे
गुणोत्तर ११६:१०० इतके विपरीत झाले आहे. याच्या नेमकी विपरीत परिस्थिती
ऑस्ट्रेलियामध्ये आहे तिथले लोक IVFद्वारे मुली जन्माला यावी म्हणून प्रयत्न करत
आहेत. नितीमत्ता आणि निसर्गाच्या दृष्टीने विचार करता या दोन्ही विचारधारा
चुकीच्या आहेत. आता तर नवीन IVF प्रक्रियेमध्ये ‘गॅमेटोजीनेसिस’ या प्रक्रियेद्वारा जनुकांमध्ये हवे ते बदल
घडवून मुलांना जन्म देता येईल. जनुकांमध्ये निसर्गतःच होणाऱ्या बदलामधुनच (Mutation)
सर्व सृष्टी विकसित झाली आहे. त्यात मनुष्याने फेरफार करणे हा अत्यंत धोकादायक
प्रकार आहे.
वाईज ॲण्ड अदरवाईज
पिंकी विराणी यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचे पुस्तक माहितीपूर्ण निवड करण्याचा
पुरस्कार करणारे आहे. आपण मूल जन्माला घालावं कि नाही, कोणत्या वयात, किती
कालांतराने, किती मुलं जन्माला घालावीत, यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यायची कि
नाही, घ्यायची असल्यास ती किती मर्यादेपर्यंत घ्यायची हा निर्णय प्रत्येक
जोडप्याने स्वतः घ्यायचा आहे. या सर्वांसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून लग्नासाठी
तिशीपर्यंत न थांबता २५व्या वर्षी लग्न करून तिशीपर्यंत नैसर्गिक प्रजननासाठी वेळ
देणे हा व्यवहार्य आणि शहाणपणाचा पर्याय वाटतो. करीयर आणि आर्थिक स्वातंत्र्य,
कौटुंबिक जबाबदारी यातला प्राधान्यक्रम अधिक डोळसपणे ठरवण्याची गरज आहे. तंत्रज्ञानामुळे
पालकत्व मिळवण्याच्या कक्षा रुंदावत चालल्या आहेत पण त्याच वेळी मुलांना कधी आणि
कुठल्या पद्धतीने जन्म द्यावा या निर्णयावर निसर्गाऐवजी विज्ञानाची पकड मजबूत होत
चालली आहे. कसली निवड करायची आणि त्यासाठी किती मोल द्यायचे हा सुज्ञपणा ज्याचा
त्याने दाखवायचा आहे.
© डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
आयुष आयुर्वेद क्लिनिक,
A – 5, पाम व्ह्यू, RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827
हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता शेअर करावा ही विनंती.
Comments
Post a Comment