डॉक्टर आणि बेडूक
काल सकाळी सकाळीच
राहुल भेटला. मी लेकीला शाळेच्या व्हॅनमध्ये बसवून घरी निघालो होतो. तेव्हा हा माझा
एके काळचा शाळेतला मित्र आणि सध्याचा कॉर्पोरेटमधला चाकरमानी समोर आला.
राहुल – Happy
Doctor’s Day
मी – Thank You अरे
पण राव्हल्या तू कधीपासून एवढा फॉर्मल झालास?
राहुल – कॉर्पोरेट
बाबा कॉर्पोरेट भल्याभल्यांना बदलून टाकते. बाकी काय मग आज एकदम खुशीत ? मला कळलंय
हा “डॉक्टर्स डे” एक जुलैला का असतो ते.
मी – (याचं जनरल
नॉलेज कधी सुधारलं? मी मनात म्हटले) सांग बरं काय कारण ?
राहुल – अरे बाबा, एक
जुलै म्हणजे कन्फर्म पाऊस आणि एकदा पाऊस सुरु झाला कि दोन प्राणी प्रचंड खूष
होतात. एक बेडूक आणि दुसरा डॉक्टर. दोघांचा सिझन सुरु. मी तर असंही ऐकलंय कि पाऊस
सुरु झाल्यावर बेडूक डबक्यात आणि डॉक्टर्स ओपीडीत आनंदाने टूणटूण उड्या मारतात
म्हणे.
(या वाक्याने राहुल
‘नॉर्मल’ला आला हे मी ओळखलं.)
मी – अरे तसं काही
नाहीये. भारतरत्न डॉ बिधानचंद्र रॉय यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी १ जुलैला......
राहुल – चल, मी पळतो
मला ७.३८ पकडायची आहे. तुझं नॉलेज तुझ्या पेशंटना दे. बाय बाय !
नेहमीप्रमाणे मला ‘स्पिचलेस’ सोडून तो निघून गेला.
कालच्या ‘डॉक्टर्स
डे’ च्या निमित्ताने जरा डॉक्टर पेशंट संबंध यावर आयुर्वेदाचे मत मांडणार आहे.
जगभरातल्या अनेक
देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी डॉक्टर्स डे साजरा केला जातो. भारतामध्ये १९९१ पासून
भारतरत्न डॉ बिधानचंद्र रॉय (B C Roy) यांच्या जन्म आणि स्मृतिदिनानिमित्त ‘डॉक्टर्स
डे’ साजरा करण्यास सुरुवात झाली. डॉक्टरांकडून केल्या जाणाऱ्या रुग्णसेवेच्या
प्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा करतात. अर्थात या अगोदर असा दिवस नव्हता असे
काही नाही. भगवान धन्वंतरी हे समुद्र मंथनाच्या वेळी हातात अमृतकलश घेऊन आले त्यामुळे
त्यांना जगातले पहिले डॉक्टर असे म्हंटले जाते. म्हणूनच दिवाळीच्या सुरवातीला
येणारी धनत्रयोदशी हा धन्वंतरीचा जन्मदिवस डॉक्टर्स डे प्रमाणे साजरा करण्याची
पद्धतही अनेक वर्ष चालत आलेली आहे. पण आज डॉक्टर्सविषयी समाजाला खरंच कृतज्ञता
वाटते का ? त्याचवेळी डॉक्टरांचे वागणे आदर्श आहे का ? हेही तपासून पहाणे तितकेच महत्त्वाचे
आहे. एकंदरीत विषय स्फोटक आहे तेव्हा मी काही स्वतःच सांगण्यापेक्षा आयुर्वेदातील
ग्रंथात याविषयी जे संदर्भ आलेले आहेत ते आपल्यासमोर ठेवतो. (यालाच पाव्हण्याच्या
काठीने साप मारणे असे म्हणतात.)
डॉक्टरचे रुग्णाशी
वागणे कसे असावे ? याचे मार्गदर्शन करताना ‘आर्त: पुत्रवत् उपक्रम्य:’ असे आयुर्वेद सांगतो. म्हणजेच
डॉक्टरांनी रुग्णाला आपल्या मुलाप्रमाणे वागवावे असे आयुर्वेद सांगतो. म्हणजेच
आपल्या स्वतःच्या मुलाला आजार झाल्यास त्याबाबत आपले जे वर्तन असेल तोच दृष्टीकोन
प्रत्येक रुग्णाबाबत असला पाहिजे. मुलाप्रमाणे वागवणे म्हणजे सतत गोंजारत रहाणे असा
अर्थ घेऊ नये. आपल्या मुलाच्या भल्यासाठी प्रसंगी पालकांना कठोरदेखील व्हावे लागते
डॉक्टरांनी तो कठोरपणा दाखवण्याची तयारीसुध्दा ठेवली पाहिजे. हे सांगत असतानाच
डॉक्टरचे रुग्णाशी बोलणे हे ‘पराराधन पंडिता’सारखे असले पाहिजे असे वाग्भट
सांगतात. ‘पर + आराधन पंडित’ म्हणजे समोरच्याचे मन न दुखावता त्याच्याकडून
अपेक्षित गोष्ट करवून घेणे. हि गोष्ट सांगायला सोपी पण करायला प्रचंड कठीण आहे.
यालाच हल्ली बाटलीत उतरवणे असंही म्हणतात. (‘शौकीन’ मंडळींनी बाटली या शब्दाचा
‘तो’ अर्थ घेऊ नये.)
डॉक्टरला आनंद कधी
होतो ? आमचा राव्हल्या म्हणतो तसं पावसाळ्यात ओपीडी फुल्ल असताना ? बऱ्याच लोकांचा
असा समज असतो कि डॉक्टर नेहमीच पेशंट शोधत असतात. या ठिकाणी मला माझा अनुभव
सांगायला आवडेल. माझे एम डी पूर्ण झाल्यावर नवीनच प्रॅक्टिस सुरु केली तेव्हा
ओळखीच्या कुणालाही “कसे आहात?” असे फॉर्मल विचारले तरी “एकदम फीट! परवाच सगळे
रिपोर्ट करून घेतले नखातही रोग नाही.” असे उत्तर मिळायचे. बहुधा मी त्यांना
गिऱ्हाईक करणार अशी त्यांची समजूत असावी. पण आयुर्वेद मात्र वेगळंच सांगतो.
आयुर्वेदामध्ये ‘निराम देहेषु नृषु प्रमोदः’ असे उपदेश डॉक्टरांना केलेला आहे. आम म्हणजे रोग आणि निराम
म्हणजे आरोग्य. म्हणजेच आपल्या सभोवती असणारी जनता जर निरोगी आणि आरोग्यसंपन्न
असेल तर ही गोष्ट सच्च्या डॉक्टरला आनंद देणारी ठरते. आज या निकषावर किती जण
उतरतील हे धन्वंतरीलाच ठाऊक ?
बारावी पास होऊन
NEET, CET दिलेले अनेक जण आम्ही मेडिकलला जाऊ का ? म्हणून विचारायला येतात. यापैकी
बऱ्याच जणांना त्यांना मेडिकलला का जायचंय हे नक्की माहित नसतं. जर तुम्हाला झटपट
पैसा मिळवण्याची इच्छा असेल तर या क्षेत्रात येऊ नका कारण डॉक्टर होण्यासाठी
बारावीनंतर किमान १० वर्ष शिकण्याची तयारी हवी त्यानंतर कुठे प्रॅक्टिसला सुरुवात होते. सोबत
कर्जाचे डोंगर असतातच त्यामुळे लवकरात लवकर श्रीमंत होणं हे तुमचं उद्दिष्ट असेल तर
हे फिल्ड तुमच्यासाठी न हे ध्यानात घ्या. आपल्यासोबतची मुलं इंजिनियरिंग आणि MBA करून
बाहेर जायला लागली की आपला निर्णय चुकला तर नाही ना अशी शंका यायला लागते. अशा
वेळी नेमकं प्रॅक्टिस मधून नेमकं काय एक्सपेक्ट करायचं ? हे सांगणारा
चरकांचा श्लोक आहे.
क्वचित् धर्मः क्वचित् मैत्री क्वचित् अर्थ क्वचित् यश: l
कर्माभ्यास: क्वचित् चेति चिकित्सा नास्ति निष्फला ll
अर्थात चिकित्सा केल्यामुळे कधी धर्माचे पालन होईल (रुग्णसेवेचा धर्म), कधी
चांगल्या व्यक्तीशी मैत्री होईल, कधीतरी पैसेही मिळतील, कधीतरी अवघड केसमध्ये यश
मिळाल्याचा आनंद मिळेल काहीच नाही तर तुमची क्लिनिकल स्किल्स शार्प होतील पण
केलेली चिकित्सा कधीच वाया जाणार नाही. प्रॅक्टिसमधून नेमकं काय मिळतं याच याच्यापेक्षा
चांगलं उत्तर मिळेल असं मला तरी वाटत नाही.
चांगलं वागण्याची जबाबदारी
पूर्णपणे डॉक्टरांची आहे असं वाटण्याअगोदर आदर्श रुग्ण कसा असावा हेही सांगितले
पाहिजे. वाग्भटांनी रुग्णाचे चार महत्त्वाचे गुण सांगितले आहेत. रुग्ण आढ्य म्हणजेच
श्रीमंत असावा. कुठलाही आजार व त्याची ट्रीटमेंट हि गोष्ट खर्चिक असते म्हणून रुग्णाने
त्यासाठी पैशाची व्यवस्था करणं आवश्यकच ठरते. म्हणूनच आजारी पडून मग औषध
घेण्यापेक्षा आरोग्याचे नियम पाळणं आवश्यक आहे. यासाठीच आयुर्वेद पहिल्यांदा आपलं
स्वाथ्य टिकवण्यासाठी काय करावं हे सांगतो आणि मगच आजारांकडे वळतो. दुसरा गुण
म्हणजे रुग्ण ‘भिषक् वश्य’ म्हणजे डॉक्टरांचे
सांगणे ऐकणारा असावा. तिसरा गुण म्हणजे ‘ज्ञापक’ डॉक्टरांना झालेल्या आजाराची माहिती
व्यवस्थितपणे देणे म्हणजे ज्ञापक असणे होय आणि शेवटचा गुण आहे ‘सत्त्ववान’ म्हणजेच
धीर धरणारा. कुठलाही आजार झल्यावर शरीर आणि मनाला त्रास होणारच तो सहन करण्याची
तयारी रुग्णाने दाखवली पाहिजे. म्हणजेच पेशंटने ‘पेशन्स’ दाखवणं हे लवकर बरं
होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
याचबरोबर कुठल्या
पेशंटची चिकित्सा करू नये हेही वाग्भट सांगतात. जो खूप व्यग्र आहे म्हणजेच जो खूप ‘बिझी’
असल्याने ज्याला स्वतःकडे बघायलाही वेळ नाही अशा रुग्णाची चिकित्सा करू नये. तसेच
जो एखाद्या कारणामुळे खूप निराश (डिप्रेस) झालेला आहे अशा रुग्णाला चिकित्सा केल्यास
तो सर्व नियम व्यवस्थित पळेल याची शक्यता खूपच कमी असते त्यामुळे असे पेशंट बरे
होणे कठीण असते. यासोबतच खूप तापट आणि हिंसा करणाऱ्या रुग्णांचा त्याग करावा असे
वाग्भट सांगतात. डॉक्टरांवर हल्ला करणारे रुग्ण त्यावेळीही अस्तित्त्वात होते कि
काय अशी शंका हे वाचल्यानंतर येते. शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘वैद्यमानी’
म्हणजेच स्वतःलाच डॉक्टर समजून स्वतःच्या मनाने वाटेल ती औषधे घेणाऱ्या व्यक्तीला औषध देऊ नये. स्वतःच्या
आजारावर ‘गुगल’ करून ऑफिसच्या स्टेशनरीवर त्याच्या प्रिंट आऊट काढून डॉक्टरांना वाचून
दाखवणारेही याच कॅटेगरीत मोडतात.
थोडक्यात डॉक्टर आणि
रुग्ण या दोघांनी आपापली जबाबदारी लक्षात घेऊन वर्तन केले तर अनेक प्रश्नांची उकल
शक्य आहे. त्यासाठी सुसंवादाचे पूल बांधण्याची जबाबदारी दोघांचीही आहे. आणि हो काही
पूल हे आपणच बांधावे लागतात त्याची कंत्राट नाही देता येत. तुम्हाला काय वाटतं ?
© डॉ. पुष्कर
पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
आयुष आयुर्वेद
क्लिनिक,
A – 5, पाम व्ह्यू,
RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827
हा लेख शेअर
करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता शेअर करावा ही विनंती.
Comments
Post a Comment