मुखवटे आणि चेहरे
आपण यांना पाहिलंत का ?
रुग्ण क्र. १
वयाच्या ३२ व्या वर्षी मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी आणि वाढणारे ब्लड प्रेशर
या दोन तक्रारी घेऊन एक स्रीरुग्ण आली. कॉलेजमध्ये असताना अम्लपित्त होते,
अधूनमधून डोकेही दुखायचे पण उलटी झाल्यावर बरे वाटायचे. ॲलोपॅथिक औषधं घेऊन पित्ताचा त्रास कमी झाला पण हळूहळू डोकेदुखी वाढू लागली. तीन
महिने व्यवस्थित औषध आणि पंचकर्मातील विरेचन चिकित्सा केल्यावर डोकेदुखी तर गेलीच
शिवाय ब्लड प्रेशरही नियंत्रणात आलंय.
रुग्ण क्र. २
सुमारे ५० – ५५ वय असलेले एक काका. पुराचे पाणी ओसरल्यानंतर कोकणातल्या जुन्या
घराची स्वच्छता केली. नंतर पायांना खाज येऊन एक छोटी पुटकुळी आली. ती खाजवल्यानंतर
वाहणारा स्राव हातच्या बोटांना लागून तिथे पुरळ आले. सुमारे महिन्याभरात हा प्रकार
वाढत वाढत अंगभर पसरला. एक ‘जनरल प्रॅक्टिशनर’ आणि दोन ‘स्किन स्पेशालिस्ट’ अशी ‘त्रिस्थळी’ यात्रा करून काकांना
काही बरे वाटत नव्हते. आयुर्वेदाकडे आल्यावर वारंवार होणाऱ्या अम्लपित्ताची
हिस्ट्री लक्षात घेऊन दिलेल्या चिकित्सेने पूर्ण बरे वाटले आणि ‘सुस्थळी’
पडल्याचा आनंद झाला.
रुग्ण क्र. ३
३५ वर्षांची एक स्रीरुग्ण वारंवार होणाऱ्या युरीन इन्फेक्शनमुळे सतत ३ वर्ष
हैराण होती. एका मागोमाग एक युरीन रिपोर्ट करून आणि ॲण्टिबायोटिक घेऊन कंटाळली होती. शेवटी फक्त “दिवसाला ४ लिटर पाणी प्या” असा
सल्ला मिळाला. नाडी बघून फक्त “अम्लपित्ताचा त्रास आहे का ? ” एवढा एकच प्रश्न
विचारला. अपेक्षित उत्तर आल्यावर केवळ दोन महिने ट्रीटमेंट घेऊन हे युरीन इन्फेक्शन
पूर्णपणे बरे झाले. आज या गोष्टीला पाच वर्ष उलटून गेली आजतागायत पुन्हा त्रास
झालेला नाही.
रुग्ण क्र. ४
शिक्षिका असलेली एक रुग्ण अर्टीकेरीया अर्थात अंगावर
पित्ताच्या गाठी येणे यासाठी मुंबईतल्या सर्वाधिक सुसज्ज आणि सर्वाधिक महागड्या
हॉस्पिटलपर्यंत जाऊन आली होती. ॲलर्जीची टेस्ट केल्यावर जवळपास सगळ्याच गोष्टींची ॲलर्जी
आहे असे लक्षात आले. ॲलर्जीसाठी रोज एक याप्रमाणे जन्मभर गोळी घ्या असा सल्ला
मिळाला. पंचकर्मातील वमन चिकित्सा आणि सहा महिने औषध घेतल्यानंतर आज कुठलीही गोळी
न घेता स्वस्थ जगत आहेत.
रुग्ण क्र. ५
घारे डोळे आणि गोरापान वर्ण असलेले एक काका लंगडतच
कन्सल्टिंग रूममध्ये आले. टाचदुखीसाठी अनेक औषधं झाली. अनेक प्रकारच्या चपला
वापरून झाल्या. फक्त चपलांचा खर्च काही हजारात होता. तरुणपणी अम्लपित्ताचा त्रास
होता पण सध्या कमी झाला आहे. तसेच आठवड्यातून दोनदा ड्रिंक्स घेतली जाते अशी
हिस्ट्री मिळाली. तेव्हा टाचेला दोन जळवा लावल्या त्यांनी आकंठ रक्त प्यायल्यावर
आणि दीड महिना उष्णता कमी करणारी औषधं घेतल्यावर त्यांचे लंगडणारे पाऊल सरळ पडू
लागले.
रुग्ण क्र. ६
कॉर्पोरेटमध्ये काम करणारी ‘बोल्ड ॲण्ड ब्युटीफुल’ युवती.
गेले काही महिने खूप अंग दुखते, थकवा येतो, फ्रेश वाटत नाही अशी लक्षणे घेऊन आली.
You know Doc, मी गुगल केलंय Its Chronic Fatigue Syndrome. असे सांगून माझ्या
ज्ञानात अमूल्य भर घातली. तेव्हा अम्लपित्ताने तिच्या शरीरातील “रसधातू” नावाचा
घटक बिघडल्याने तिचे आयुष्य ‘नीरस’ झाले आहे हे तिला पटवावे लागले. तिच्या Chronic Fatigue Syndrome ला आयुर्वेदात “क्लम” असे म्हणतात हेही सांगावे लागले. दोन महिने पथ्य पाळून
व्यवस्थित औषधे घेतल्याने ती आयुष्यात पुन्हा ‘समरस’ झाली.
मला खात्री आहे ह्या रुग्णांविषयी वाचताना आपल्यापैकी
अनेकांना ‘कही वो मै तो नहीं ?’ असे फिलिंग आले असेल.
मुखवटे आणि चेहरे
अम्लपित्त म्हणजे आंबट ढेकर, उलटी होणे, छातीत जळजळ, पोटात
मळमळ इतकीच लक्षणे आधुनिक वैद्यक सांगते. वरील तक्रारींसाठी औषध घेऊन हि लक्षणं
कमी देखील होतात. आयुर्वेदाचा अम्लपित्ताकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र अधिक व्यापक
आहे. अम्लपित्त शरीरात जास्त दिवस राहिले कि पित्ताच्या रुपात वाढलेली उष्णता
शरीरातल्या इतर अवयवात जाऊन त्यांचे तंत्र बिघडवते. समजा आपल्या घरातल्या हॉलमध्ये
लिकेज आहे त्याचा व्यवस्थित बंदोबस्त न करता वरून टाईल्स लावून घेतल्या तर काय
होईल ? हॉलमधले लिकेज बंद होईल पण कदाचित बेडरूम किंवा किचनमध्ये लिकेज सुरु होईल.
तसंच काहीसं इथेसुद्धा घडतं.
मायग्रेन, अंगावर पित्त येणे, वारंवार तोंड येणे, गाऊट,
टाचदुखी, हिरड्यांचे आजार, वारंवार उष्णतेचे फोड येणे, कपड्यांवर घामाचे डाग पडणे,
कमी वयात केस पांढरे होणे यापासून ते पाळीच्या वेळी अधिक स्राव होणे, वंध्यत्व,
वारंवार गर्भपात होणे असे आजारांचे विविध ‘मुखवटे’ असले तरी त्यामागचा छुपा ‘चेहरा’
बऱ्याचदा अम्लपित्ताचा असतो. अशा पद्धतीने अनेक विकारांचे ‘पालकत्व’ अम्लपित्ताकडे
असलेले बघायला मिळते. त्या अर्थाने हा आजार सर्व आजारांचा ‘बाप’ आहे असं म्हटल्यास
वावगे ठरणार नाही.
चिकित्सा -
अशा या ‘बहुरूपी’ अम्लपित्ताची चिकित्सा करणे हे कौशल्याचे
काम आहे. काटेकोरपणे पथ्य पालन, पंचकर्म आणि पोटातून घेण्याची औषध हा योग जुळून
आल्यास अम्लपित्त हमखास बरे होऊ शकते. त्यापैकी पथ्याचा विचार आपण या अगोदरच्या
लेखात पाहिलेला आहेच. (पथ्याविषयी सविस्तर वाचण्यासाठी लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)
पंचकर्म –
पित्ताच्या रूपाने वारंवार उसळणारी उष्णता कमी करण्यासाठी
पंचकर्माला पर्याय नाही.
वमन – वमन म्हणजे उलटी करण्याचे औषध देऊन शास्रोक्त
पद्धतीने उलटी करवणे. पण भरपूर पाणी पिऊन मग घशात बोट घालून उलटी करण्यापेक्षा हा
प्रकार वेगळा आहे. वमनामध्ये रुग्णाला ५ -७ दिवस औषधांनी सिद्ध केलेले तूप प्यायला देऊन नंतर विशिष्ट पद्धतीचा आहार
दिला जातो. त्यानंतर उलटीचे औषध दिले जाते. यामुळे जठर स्वच्छ होऊन वारंवार होणारा
अम्लपित्ताचा त्रास कमी होण्यास मदत
मिळते. (वमनाविषयी सविस्तर वाचण्यासाठी लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)
विरेचन – अम्लपित्तामुळे वाढलेली उष्णता रक्तात जाऊन
त्यामुळे मायग्रेन, डोळ्यांचे आजार, ब्लड प्रेशर वाढणे, सांधेदुखी, त्वचा विकार
उत्पन्न झाल्यास वमनापेक्षा विरेचनाचा अधिक उपयोग होतो. यामध्ये ५ – ७ दिवस
औषधांनी सिद्ध केलेले तूप देऊन विरेचन अर्थात जुलाब होण्याचे औषध दिले जाते.
त्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडण्यास मदत होते.
बस्ती – अम्लपित्ताच्या ज्या रुग्णांना जठर किंवा लहान
आतड्याच्या सुरवातीच्या भागात (Duodenum) अल्सर असेल त्यांना बस्तीने उत्तम उपयोग होतो. पित्त कमी
करणाऱ्या औषधांनी सिद्ध केलेले तूप दुधात घालून त्याचा एनिमा म्हणजे बस्ती दिल्यास
अल्सर भरून येण्यास मदत होते. (बस्तीविषयी सविस्तर वाचण्यासाठी लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)
शिरोधारा – जेव्हा चिंता, क्रोध अशा मानसिक कारणांमुळे अम्लपित्ताचा
त्रास असेल तेव्हा शिरोधारा हि चिकित्सा अधिक उपयुक्त आहे. अम्लपित्तामुळे छातीत
धडधडणे, भीती वाटणे, नैराश्य, निद्रानाश, ब्लड प्रेशर वाढणे अशी लक्षणे असताना
याचा वापर केला जातो.
औषधी चिकित्सा –
आयुर्वेदात अम्लपित्तासाठी अक्षरशः शेकडो औषधी सांगितलेली
आहेत. त्यापैकी सूतशेखर, कामदुधा, प्रवाळ, अविपत्तिकर, भूनिम्बादि काढा अशी औषधं
वाचकांना माहित देखील असतील. आवळा, ज्येष्ठमध, शतावरी, गुळवेल यासारखी साधी सोपी
औषधेही उत्तम काम करतात. पण त्यांचा उपयोग डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. आजार
जेवढा जुना तेवढा चिकित्सेचा कालावधी अधिक हे सूत्रही लक्षात ठेवावे. बहुतेक
रुग्णांना किमान ४ ते ६ महिने औषध घ्यावे लागते असा अनुभव आहे.
अम्लपित्त हे अनेक आजारांचा बाप आहे हे आपण पहिले पण आजकाल ‘बाप’
होणे काही सोपे नाही. त्याविषयी पुढच्या शुक्रवारच्या लेखात पाहूया.
© डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
आयुष आयुर्वेद क्लिनिक,
A – 5, पाम व्ह्यू, RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827
हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता शेअर करावा ही विनंती.
अम्लपित्त पथ्यापथ्य - https://drpushkarwagh.blogspot.com/2019/04/gerd.html
वमन - https://drpushkarwagh.blogspot.com/2019/03/blog-post_21.html
बस्ती - https://drpushkarwagh.blogspot.com/2019/03/blog-post_68.html
https://drpushkarwagh.blogspot.com/2019/03/basti-ac-in-monsoon-air-conditioner-has.html
Comments
Post a Comment